परकीयांचा द्वेष देशात होता, आणि पुढे ही विरोधी भावना अधिकच बळावली. परंतु सर्व देशभर एकच राष्ट्रीय भावना सर्वत्र भडकली आहे, असे कधीच झाले नाही. पार्श्वभूमी सरंजामशाही होती आणि स्थानिक पुढार्यांविषयी निष्ठा वाटे. चीनमधील युध्दप्रभूंच्या काळातल्याप्रमाणे देशभर येथे बेकारी आणि हलाखी असल्यामुळे जो कोणी वेळच्या वेळी तनखा देईल, लुटीतील भाग देईल त्याचे शिपाई व्हायला, अपरिहार्य म्हणून लोक पुढे येत. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजा प्रामुख्याने देशीच होत्या. फक्त मराठ्यांतच थोडी राष्ट्रीयता, व्यक्तिनिष्ठेपेक्षा जास्त व्यापक ध्येयदृष्टी, राष्ट्रनिष्ठा होती. परंतु ही भावनाही संकुचित व मर्यादित होती. शूर रजपुतांना चिरडून त्यांना त्यांनी दुखविले, त्यामुळे हे रजपूत मराठ्यांचे मित्र होण्याऐवजी, त्यांचे शत्रू बनले, किंवा कुरबुरी करणारे असंतुष्ट, नाराज मांडलिक होऊन राहिले. स्वत: मराठ्यांतही कटू स्पर्धा होती व प्रसंगविशेषी आपसांत लढाईही होई. पेशव्यांच्या प्रभुत्वाखाली मोघम ऐक्य होते तरीसुध्दा असे युध्दाचे प्रसंग येत. आणीबाणीच्या वेळेस ते एकमेकांच्या साहाय्यास गेले नाहीत आणि सर्वांचा अलग अलग पराजय झाला.
तरीही मराठ्यांत कितीतरी कर्तबगार मुत्सद्दी, नामवंत योध्दे झाले. पहिला बाजीराव, नाना फडणीस, महादजी शिंदे, इंदूरचे यशवंतराव होळकर, आणि ती थोर राणी अहिल्याबाई ही सारी नावे डोळ्यांसमोर येतात. एकंदरीत सर्वसाधारणपणे मराठा शिपाई चोख, इमानी, शूर लढवय्या होता. आपली जागा तो सहसा सोडीत नसे, मरण नक्की ठरलेले अशी कामगिरीसुध्दा त्याने काडीमात्र न डगमगता अंगावर घेतली व लढता लढता मेला असे अनेक प्रसंग आहेत. परंतु या सर्व शौर्यधैर्याच्या पाठीमागे युध्दात वा तह करताना एक प्रकारची साहसी महत्त्वाकांक्षा, एक प्रकारचा नवशिकेपणा दिसे, याचे खरोखर नवल वाटते. जगाविषयी त्यांचे ज्ञान हास्यास्पद होते. नुसत्या हिंदी भूगोलाचेही त्यांचे ज्ञान फार मर्यादित असे. ह्याहीपेक्षा वाईट म्हणजे अन्यत्र काय घडत आहे, आपले शत्रू काय करीत आहेत ते जाणून घेण्याचे फारसे प्रयास त्यांनी केलेले दिसत नाहीत. अशा परिस्थितीत दूरगामी मुत्सद्देगिरी किंवा परिणामकारक कारवाई मराठ्यांकडून शक्य नव्हती. ते घोडदौडी करीत, त्यांच्या वायुसमान भरार्यांनी शत्रू चकित होऊन खचून जाई. परंतु युध्द म्हणजे मधून मधून केलेले जोरदार हल्ले अशी त्यांची कल्पना होती. ते आदर्श गनिमी लढवय्ये होते. पुढे त्यांनी पध्दतशीर फौजा उभारल्या. परंतु शस्त्रास्त्रसंपन्न झाले आणि वेग व चपळाई गमावून बसले. नवीन युध्दतंत्र त्यांच्या नीट अंगवळणी पडेना. ते स्वत:ला हुषार समजत, ते होतेही; परंतु तह करताना किंवा युध्दात त्यांच्यावर सरशी करणे कठीण नव्हते. कारण त्यांचे विचार जुनाट, बुरसटलेल्या दुनियेतच वावरत असत. त्याच्यापार त्यांना जाता आले नाही.
परकीयांनी शिकवून तयार केलेल्या कवायती फौजा, कडवी शिस्त आणि श्रेष्ठ तंत्र यांची कल्पना हिंदी राज्यकर्त्यांना बर्याच आधीपासून आली होती. स्वत:च्या सैन्याला शिक्षण देण्यासाठी फ्रेंच किंवा इंग्रज अंमलदार ते नेमीत. फ्रेंच आणि ब्रिटिश यांची स्पर्धा असल्यामुळे हिंदी फौजा तयार होण्याला या स्पर्धेची मदत झाली. हैदर आणि टिपू यांना आरमारी बळाचीही जाणीव झाली होती, म्हणून त्यांनी समुद्रावर ब्रिटिशांना आव्हान देण्यासाठी आरमार उभारण्याचे प्रयत्नही केले. परंतु ही सारी आयत्या वेळची म्हणून निरुपयोगी जमवाजमव ठरली. मराठ्यांनीही या बाबतीत प्रयत्न केले होते, परंतु ते अपुरे पडले. त्या वेळेस गलबते बांधण्याचा धंदा हिंदुस्थानात भरभराटीत होता, परंतु गलबते बांधणे निराळे, आणि थोड्या अवकाशात प्रबळ आरमार उभे करणे निराळे, त्यातच शत्रूकडून पुन्हा पाठीवर सारखा पाठलाग व विरोध होत असतानासुध्दा फ्रेंच निघून गेल्यावर त्यांचे हिंदी फौजांतील अंमलदारही निघून गेले. जे कोणी विदेशी अंमलदार राहिले ते ब्रिटिश होते. ते आणीबाणीच्या वेळेस सोडून जात किंवा फितुरी करून, स्वामिद्रोह करून बरोबरचा खजिना व फौज घेऊन धन्याचे शत्रू जे ब्रिटिश त्यांना जाऊन मिळत. परदेशी अंमलदारावर विसंबून राहावे लागे. हे फौजा तयार करण्याच्या तंत्रात हिंदी राज्यकर्ते किती मागासलेले होते त्याचे स्पष्ट लक्षण होते, आणि परकीय अंमलदार दगा देतील हा धोका नहेमी असे. हिंदी राजांच्या कारभारात आणि सैन्यात ब्रिटिशांचा पंचम स्तंभ बहुतेक असेच.