हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेच्या अनुभवाचा बंगालला सर्वांत प्रथम पुरा अनुभव आला.  एकजात सर्रास लुटीने या राजवटीचा आरंभ झाला आणि अशा प्रकारची जमीनमहसुलाची पध्दती सुरू केली की जिवंतच नव्हे, तर मेलेल्या शेतकर्‍यापासूनही शेवटी दिडकी उरेपर्यंत सारे उकळण्यात आले.  एडवर्ड थॉम्प्सन आणि जी. टी. गॅरेट हे हिंदुस्थानवरचे दोन इंग्रज इतिहासकार सांगतात, ''कोर्टिस आणि पिझरो यांच्या काळात स्पॅनिश लोकांना सोन्याचे जसे वेड लागले होते तसे वेड इंग्रजांना आता लागले होते.  अमेरिकेतील सोन्यासाठी ते स्पॅनिश ज्याप्रमाणे वेडेपिसे झाले होते, तसेच हे इंग्रज.  इंग्रजांच्या या हावेला तुलना नव्हती.''  ''हिंदुस्थानात आर्थिक बाबतीत जो राक्षसी अत्याचार कित्येक वर्षे पुढे इंग्रजांनी चालू ठेवला, त्याला क्लाईव्ह जास्तीत जास्त जबाबदार आहे.'' * आणि याच-क्लाईव्हचा साम्राज्यस्थापक म्हणून लंडनमध्ये इण्डिया हाऊससमोर पुतळा आहे.  निव्वळ लूटमार याखेरीज या प्रकाराला दुसरे नाव नाही.  बंगालचा हा कल्पवृक्ष, हे सोन्याचे, होना-मोहरांचे झाड पुन:पुन्हा हलवून हलवून सारे सोने, सारी संपत्ती पार धुऊन नेण्यात आली, त्यामुळे बंगालमध्ये त्राण राहिले नाही व भीषण दुष्काळांनी बंगाल उद्ध्वस्त झाला.  या पध्दतीला व्यापार हे नाव पुढे देण्यात आले.  परंतु नाव काहीही द्या, बंगालची हाडे उरली ही गोष्ट खरी.  सरकारी राज्य म्हणजे कंपनीचा व्यापार आणि व्यापार म्हणजे ही लूटमार.  इतिहासात अशी दुसरी उदाहरणे क्वचितच.  आणि ही लूटमार काही वर्षेच नव्हे, तर नाना मिषांनी, नाना नावांनी, नाना स्वरूपांत कित्येक पिड्या चालली.  भरमसाट लुटीला पुढे हळूहळू कायदेशीर पिळवणुकीचे व शोषणाचे स्वरूप देण्यात आले; वरपांगी लुटमार तेवढी दिसेना, परंतु वास्तविक आधीच दुष्ट असेच तिचे स्वरूप होते, अधिकच पिळवणूक व नागवणूक होऊ लागली.  हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेच्या या आरंभीच्या कित्येक पिढ्यांतील अत्याचार, भ्रष्टाचार, लाचलुचपत, वशिले, नीचपणा, द्रव्यलोभ इत्यादींचे प्रकार कल्पनातीत-वर्णनातीत होते.  हिंदुस्थानातील 'लूट' हा शब्दच मुळी इंग्रजी भाषेतील शब्द होऊन गेला, यावरूनच सारे लक्षात येईल.  एडवर्ड थॉम्प्सन म्हणतो आणि त्याचे हे म्हणणे केवळ बंगालला उद्देशून नाही, ''हिंदुस्थानातील आरंभीचा ब्रिटिश अंमल म्हणजे जगातील लटमारीची परमावधी होय.''

--------------------

* एडवर्ड थॉम्प्सन आणि जी. टी. गॅरेट यांनी लिहिलेले ''Rise and Fulfilment of British Rule in India'' (लंडन १९३५) या पुस्तकातून.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel