या सर्वांचा परिणाम म्हणजे अगदी आरंभीच्याच काळात इ.स. १७७० मध्येच बंगाल आणि बिहारमध्ये भयंकर दुष्काळ पडला.  जवळजवळ तिसरा हिस्सा प्रजा मृत्युमुखी पडली, परंतु हे सारे प्रगतीच्या उत्कर्षासाठी होत होते आणि इंग्लंडातील औद्योगिक क्रांतीला जन्म देण्यासाठी बंगालने अपार बलिदान केले याचा वास्तविक बंगालला अभिमान वाटावा !  अमेरिकन लेखक ब्रूक अ‍ॅडम्स याने हे सारे कसे घडले ते फार व्यवस्थितपणे, नेटके सांगितले आहे.  ''हिंदुस्थानातून येणार्‍या संपत्तीच्या पुरामुळे इंग्लंडमधील रोख भांडवल वाढले. भांडवल वाढले एवढेच नव्हे, तर ते गतिमान झाले, सर्वत्र जाऊ-येऊ लागले.  झपाट्याने पसरू लागले.  प्लासीच्या लढाईनंतर लौकरच बंगालची लूट लंडनमध्ये येऊ लागली, आणि त्याचे परिणाम तत्काळ दृग्गोचर होऊ लागले.  इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती १७७० पासून सुरू झाली असे सारे मानतात.  प्लासीची लढाई १७५७ मध्ये झाली आणि तेव्हापासून भराभर जे फेरबदल होत गेले ते केवळ अतुलनीय आहेत.  कितीतरी झपाट्याने घटना घडत गेल्या.  १७६० मध्ये धावत्या धोट्याचा शोध लागला आणि भट्टीसाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला.  १७६४ मध्ये हारग्रीव्हजने सूत कातण्याच्या यंत्राचा शोध लावला.  १७७६ मध्ये क्राँप्टनने त्यात आणखी भर घातली आणि १७८५ मध्ये वॅटने वाफेचे एंजिन पुरे केले.  परंतु या यंत्रामुळे त्या काळातल्या प्रेरणेला तोंड फुटले असले तरी ती मूळ प्रेरणा या यंत्राची नव्हे.  यंत्रे स्वत: निष्क्रिय आहेत.  त्यांना कार्यप्रवृत्त करायला पुरेशी शक्ती पाठीमागे असावी लागते, हा शक्तिसंचय नेहमी द्रव्यरूपात असावा लागतो आणि हे द्रव्य संचित असून भागत नाही तर गतिमान असावे लागते; पदोपदी वाढणार्‍या भांडवलाच्या स्वरूपात ते असावे लागते.  हिंदुस्थानातून संपत्तीचा पूर येऊ लागण्यापूर्वी आणि भरपूर पत वाढण्यापूर्वी, या यंत्रांना कार्यप्रवृत्त करायला पुरेशी धनशक्ती इंग्लंडात नव्हती.  हिंदी लुटीपासून ब्रिटिशांनी जो अपरंपार फायदा मिळविला, हिंदी लुटीचे भांडवल करून त्यावर जो कल्पनातीत नफा मिळविला त्याला जगाच्या आरंभापासून तुलना नाही....असा फायदा कधी कोणी मिळवला नाही.  कारण जवळजवळ ५० वर्षे ग्रेट ब्रिटनला जगात कोणी प्रतिस्पर्धीच नव्हता.'' *


---------------------

* Brooke Adams : 'The Law of Civilisation and Decay' (1928), quoted by Kate Mitchel : 'India' (1943), pages 259-60.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel