भारत आपल्या इतिहासात प्रथमच आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या दुसर्‍या देशाचे उपांग होतो.

भारतावर अनेकांनी आजवर स्वार्‍या केल्या.  अनेक राजकीय व आर्थिक फेरबदल आजपर्यंतच्या दीर्घकालीन इतिहासात झाले.  परंतु येथे ब्रिटिश सत्ता स्थापन होण्याचा प्रकार असा अपूर्व होता की, पूर्वी त्याला तुलनाच नाही.  भारत पूर्वीही जिंकला गेला होता.  परंतु जिंकणारे येथेच राहिले आणि येथील जीवनाचेच भाग बनले.  (ज्याप्रमाणे नॉर्मन लोक इंग्लंडात किंवा मांचू चीनमध्ये तद्वत) भारताने कधीही स्वातंत्र्य गमावले नव्हते; कधी गुलामी आली नव्हती.  म्हणण्याचा अर्थ हा की, ज्या आर्थिक किंवा राजकीय पध्दतीचा मध्यबिंदू बाहेर देशात आहे अशा कोणत्याही पध्दतीत भारत आजपर्यंत गुंतला गेला नव्हता; स्वभावाने आणि जन्माने जे कायमचे विदेशीच राहिले अशांची राजकीय सत्ता भारताने कधी पूर्वी अनुभविली नव्हती. *

पूर्वीच्या प्रत्येक सत्ताधारीवर्गाने—मग तो येथला असो वा आरंभी विदेशीय असो— हिंदी जीवनाची सामाजिक आणि आर्थिक एकता मान्य केलेली असे; ते सारे सत्ताधारी वर्ग येथील जीवनाशी एकरूप होण्याची खटपट करीत.  ते येथे दृढमूल होत, संपूर्णपणे हिंदी होऊन जात.  परंतु हे नवीन गोरे जेते निराळेच होते.  त्यांचे बूड येथे नसे.  त्यांच्यात आणि सर्वसाधारण भारतीय माणसात असलेले अपार अंतर दुर्लंघ्य होते.  परंपरा, दृष्टी, जीवनाची पध्दती, उत्पन्न— सार्‍याच बाबतींत जमीनअस्मानाचा फेर होता.  भारतातील आरंभीच्या ब्रिटिशांनी इंग्लंडपासून फार दूर पडल्यामुळे भारतीय जीवनपध्दतीतील अनेक गोष्टी उचलल्या होत्या.  परंतु ते सारे वरपांगी होते, व इंग्लंड आणि भारत यांतील दळणवळणाच्या साधनांत सुधारणा होताच ते त्यांनी जाणूनबुजून सोडून दिले.  ब्रिटिश सत्ताधारीवर्गाने स्वत:ची प्रतिष्ठा भारतीय लोकांपासून दूर राहून, तुटकपणाने वागून, स्वत:च्या श्रेष्ठ अशा जगात अलग, अप्राप्य अशा रीतीने राहून संभाळली पाहिजे अशी त्यांना जाणीव उत्पन्न झाली.  भारतात दोन जगे होती, दोन दुनिया होत्या.  सत्ताधारी ब्रिटिश अधिकार्‍यांची एक दुनिया आणि कोट्यवधी भारतीय जनतेची दुसरी दुनिया.  एकमेकांविषयी अप्रीती.  याशिवाय दोघांत समान असे काहीच नव्हते.  पूर्वी भारतात येणार्‍या नाना जातिजमाती येथे जनतेत मिसळून जात किंवा येथील परस्परावलंबी, सहकारी सामाजिक व्यवस्थेत एकरूप होत.  परंतू वांशिक श्रेष्ठता हा आता मान्य असा नवा धर्म आला; आणि सत्ताधारी लोकांना राजकीय व आर्थिक सत्ता-अमर्याद व अनियंत्रित असल्यामुळे त्यांची ही श्रेष्ठता शतगुणित, तीव्रपणे भासू लागली.

नवीन भांडवलशाहीमुळे जगाची एक नवीनच बाजारपेठ तयार होत होती, आणि काही झाले असते तरी हिंदी आर्थिक पध्दतीवर या गोष्टीचा परिणाम झालाच असता.  पूर्वीची स्वावलंबी, स्वाश्रयी ग्रामीण अर्थयोजना, तिच्यातील परंपरागत श्रमविभागाचे तत्त्व हे सारे आता पूर्वीच्या स्वरूपात राहणे शक्य नव्हते.  परंतु येथे जो फरक झाला तो आपापत: —सहज अशा रीतीने झाला नाही.  एक पध्दती जाऊन हळूहळू उत्क्रांत होत दुसरी येणे असे काही एक झाले नाही.  त्यामुळे भारतीय समाजरचनेचा पायाच ढासळून सारे आर्थिक जीवन विस्कळीत झाले.  येथील समाजरचना म्हणजे परंपरागत सांस्कृतिक वारसा होता.  त्यात सामाजिक विधिनिषेध असत; नियंत्रणे असत.  परंतु हे सारे एकाएकी उद्ध्वस्त होऊन परकीयांकडून जिणे नियंत्रित केले जाते अशी नवीन एक आर्थिक व सामाजिक रचना आमच्यावर लादण्यात आली.  भारत जगाच्या बाजारपेठेत स्वतंत्रपणे न येता ब्रिटिशांच्या आर्थिक पध्दतीवर अवलंबून असलेला एक कृषिप्रधान, परतंत्र, वासाहतिक प्रदेश असे ब्रिटिशांचे उपांग झाला.

पूर्वी प्रत्येक गाव आर्थिक व राजकीय दृष्ट्या स्वायत्त असे व त्या दृष्टीने त्यांच्या आधारावर देशाची अर्थव्यवस्था चालली होती.  ही स्वायत्तता मोडल्यामुळे या ग्रामसंस्थांकडे असलेले आर्थिक व राजकीय अधिकार नाहीसे झाले.  सर चार्ल्स मेटकाफ हा एक अत्यंत हुषार व कर्तबगार असा ब्रिटिश अंमलदार होऊन गेला.  १८३० मध्ये त्याने पुढीलप्रमाणे ग्रामसंस्थांचे वर्णन केले आहे.  ''भारतीय ग्रामसंस्था म्हणजे छोटी छोटी लोकसत्ताक राज्येच आहेत.  गावाला जे जे जरूर असेल ते त्या गावातच मिळते व दुसर्‍यावर अवलंबून राहण्याचा संबंध त्यात क्वचितच येतो.  दुसर्‍या कशाचाही नाश झाला तरी ग्रामसंस्था अखंड राहते असे आढळते.  अशा अनेक ग्रामसंस्थांचा संघ-त्यात प्रत्येक गाव आपल्यापुरते स्वतंत्र असल्यामुळे गावच्या लोकांचा संसार सुखाने चालतो व सर्वांना भरपूर स्वातंत्र्य आणि मोकळेपणा मिळतो.''

-------------------

* के. एस. शेलवणकर ''हिंदुस्थानचे कोडे'' —'The Problem of India' (पेनग्विन स्पेशल लंडन, १९४०.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel