भारतातील मुल्की कारभारही असाच नबाबी थाटाचा, भरमसाट खर्चाने चालला व त्यातील बड्या पगाराच्या सार्या जागा गोर्यांसाठी राखून ठेवल्या. राज्यकारभाराचे भारतीयीकरण इतके मंदगतीने होत होते की, विसाव्या शतकात कोठे तुरळक तुरळक भारतीय लोक दिसू लागले. परंतु ह्या 'भारतीयीकरणामुळे भारतीयांच्याकडे सत्ता न येता ब्रिटिश सत्ता दृढतर करण्याची ती एक शक्कल होती. कारण खर्या महत्त्वाच्या जागा ब्रिटिशांच्याच हाती असत. राज्यकारभारातील भारतीय लोक ब्रिटिशांचे हस्तक म्हणूनच कामे करू शकत.
ब्रिटिशांच्या सर्व अमदानीत जी भेदनीती जाणूनबुजन सदैव अवलंबिली गेली तिचाही येथे उल्लेख केला पाहिजे. भारतीय लोकांत त्यांनी भांडणे लावली- या पक्षाचे काढून त्या पक्षाला देऊन, एकाला मागे ओढून दुसर्याला पुढे करण्याचा डाव सुरू ठेवला. ही भेदनीती ते आरंभी आरंभी उघडपणे कबूल करीत व साम्राज्यशाहीच्या दृष्टीने ही भेदनीती साहजिकच आहे. देशात जसजशी राष्ट्रीय चळवळ वाढू लागली, तसतसे या भेदनीतीला वक्र, सुक्ष्म आणि घातकी स्वरूप येऊ लागले. तोंडाने नाही म्हणता म्हणता हातून अधिकच जोराने भेदनीती वापरली जाऊ लागली.
आज देशात जे काही अडचणीचे प्रश्न उत्पन्न झाले आहेत ते ब्रिटिश राजवटीतच आणि त्यांच्या धोरणाचा परिणाम म्हणून उत्पन्न झाले आहेत. संस्थानिक, अल्पसंख्याकांचा प्रश्न, देशी-विदेशी मिरासदार वर्ग, मागासलेले उद्योगधंदे व उपेक्षित शेती, समाजोपयोगी नोकरवर्गाचा अतिशय मागासलेपणा; आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जनतेचे कमालीचे दारिद्र्य, हे सर्व या राजवटीचा व धोरणाचा परिपाक आहेत. शिक्षणाच्या बाबतीतील दृष्टीही लक्षात घेण्यासारखी आहे. 'के' याने लिहिलेल्या मेटकाफच्या चरित्रात पुढीलप्रमाणे विचार आहेत : ''ज्ञान सर्वत्र मोकळेपणाने असे पसरू लागले तर काय होईल या चिंतारोगाने राज्यकर्ता अधिकारीवर्ग असा काही पछाडला गेला की, युरोपात छापखाने निघाल्यावर व बायबलचे भाषांतर झाल्यावर जी लोकजागृती झाली होती तिची त्याला आठवण होऊन त्याला रात्रंदिवस भेसूर स्वप्नात छापखाने व ग्रंथ दिसत आणि त्या स्वप्नातल्या दहशतीने त्याच अंगाचा थरकाप होऊन भीतीने अंगावर शहारे येत. त्या काळातले आमचे धोरण हे की, या देशातील लोकांना अडाणी, रानटीच ठेवावे व त्यांना काही दिसू देऊ नये. ज्ञानाचा प्रकाश त्यांना दिसावा म्हणून आमच्यापैकी किंवा स्वतंत्र संस्थानांपैकी कोणी काही जराशी जरी खटपट चालविली तर त्याला विरोध केला जाई, त्याचा संताप येई.'' *
साम्राज्यशाहीला या प्रकारेच वागावे लागते, नाहीतर ती साम्राज्यशाही राहणार नाही. आजचा साम्राज्यवाद हा भांडवलशाही आहे. प्राचीन काळी नसलेले पिळवणुकीचे, शोषणाचे अनेक प्रकार या अर्वाचीन भांडवलशाही साम्राज्यवादात असतात. एकोणिसाव्या शतकातील भारतातील ब्रिटिश राजवटीच्या इतिहासाने कोणाही भारतीय माणसास चीड येणे व उद्वेग वाटणे साहजिकच आहे. परंतु या इतिहासावरूनच अनेक क्षेत्रांतील ब्रिटिशांची श्रेष्ठताही मान्य करायला हवी. भारतीय लोकांतील भांडणे आणि दुबळेपणा यांचा पुरेपूर फायदा त्यांनी करून घेतला. दुबळ्या राष्ट्राला, काळाप्रमाणे पुढे न जाता मागे रेंगाळणार्या राष्ट्राला शेवटी आपत्तींना तोंड द्यावे लागते आणि त्याचा दोष स्वत:कडेच असतो. जर परिस्थितीच अशी होती की ब्रिटिश साम्राज्यशाही येथे येणे अपरिहार्य होते, तर मग त्यांच्याशी राष्ट्रीय विरोध वाढणे हीही क्रमप्राप्तच गोष्ट होती व साम्राज्यवाद आणि राष्ट्रवाद यांतील लढा अटळ होता. निकराची घटना यायचीच होती.
-------------------------
* एडवर्ड थॉम्प्सनने 'लॉर्ड मेटकाफचा जीवनवृत्तान्त' ('The Life of Lord Metcalfe') या पुस्तकातून उद्धृत केलेला उतारा