१८५७ चे स्वातंत्र्ययुध्द : वंशाभिमान

ब्रिटिश सत्ता सुरू होऊन शंभर वर्षे झाली होती.  बंगालने या नवीन सत्तेशी जुळवून घेतले होते दुष्काळाने आणी नविन आर्थिक ओझ्यांनी शेतकरीवर्ग चिरडून गेला होता, मेटाकुटीस आला होता; आणि नवीन सुशिक्षित वर्ग पश्चिमेकडे तोंड वळवून इंग्रजांच्या उदारमतवादामुळे आपली प्रगती होईल अशी आशा करीत बसला होता.  दक्षिणेकडे व पश्चिमेकडे, मद्रास-मुंबईकडे थोडी फार अशीच स्थिती होती.  परंतु उत्तरेकडच्या प्रांतांत शरणागतीची भावना नव्हती; नवीन सत्तेशी जुळवून घेणे, तिला जागा देणे ही वृत्ती नव्हती; उलट बंड करण्याची वृत्तीच बळावत होती.  विशेषत: सरंजामशाही सरदार, अमीर-उमराव आणि त्यांचे अनुयायी यांच्यात ही वृत्ती वाढत होती.  बहुजनसमाजातही असंतोष सर्वत्र होता; ब्रिटिशद्वेष होता.  परकीयांच्या उध्दटपणामुळे, मगरूर वृत्तीमुळे वरिष्ठ वर्ग चिडला होता, तर बहुजनसमाज कंपनीच्या नोकराचाकरांच्या लाचलुचपतीमुळे आणि अज्ञानामुळे रंजीस आला होता.  हे नोकरचाकर परंपरागत चालीरीतींकडे दुर्लक्ष करीत; लोकांच्या म्हणण्याकडे, त्यांच्या भावनांकडे काडीइतकेही लक्ष देत नसत.  कोट्यवधी लोकांवर निरंकुश सत्ता मिळाल्यामुळे या अधिकार्‍यांची डोकी जशी फिरून गेली होती.  त्यांना कोणी शास्तापुस्ता नव्हता.  ब्रिटिशांनी सुरू केलेल्या नव्या न्यायदानपध्दतीची लोकांनी धास्ती घेतली.  कारण त्यात अनेक गुंतागुंती असत व न्यायाधीशांना देशातील भाषा किंवा रीतिरिवाज माहीत नसल्यामुळे सारा गोंधळच होता.

१८१७ मध्येच सर थॉमस मन्रो, गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्ज यांस लिहितात की : ''ब्रिटिश सत्तेपासून काही फायदे झाले असले तरी त्यांच्यासाठी हिंदी जनतेला अपार किमत द्यावी लागली आहे.  स्वातंत्र्य, राष्ट्रीय चारित्र्य व ज्या ज्या गोष्टींमुळे राष्ट्रास मोठेपणा प्राप्त होतो, त्या त्या सर्व गोष्टी यांची किंमत देऊन हे ब्रिटिश फायदे मिळालेले आहेत.  याचा परिणाम असा होईल की, ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकून घेतला त्यामुळे हे राष्ट्र वर न जाता रसातळासच जाईल, उन्नती न होता अवनतीच होईल.  जिंकून घेतलेल्या देशात एतद्देशीयांना राज्यकारभारात मुळीच भाग नाही असे ब्रिटिश हिंदुस्थानाशिवाय दुसरे उदाहरण बहुतेक कोठेही आढळणार नाही.''

राज्यकारभारात हिंदी लोकांना नेमावे अशाविषयी मन्रो रदबदली करीत होता.  एक वर्षानंतर पुन्हा त्याने लिहिले, ''विदेशी जेत्यांनी अत्याचार केले असतील; येथील लोकांना निर्दयपणे वागविले असेल, परंतु आपण जितक्या तुच्छतेने त्यांना वागवतो तसे कोणीच केले नव्हते; तुमच्यात प्रामाणिकपणा नाही, तुम्ही नालायक आहात असे त्यांना कोणी हिणवले नव्हते.  आम्हाला तुमच्याशिवाय जमणारच नाही तेथेच फक्त आम्ही तुम्हाला नेमू असे त्यांना कोणी म्हटले नव्हते.  आपले हे वर्तन असभ्य व अनुदार आहे एवढेच नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही चुकीचे आहे.  आपल्या अधिसत्तेखाली आलेल्या लोकांच्या चारित्र्याची विटंबना मांडणे हे गैर मुत्सद्देगिरीचे आहे.'' *

-------------------------

* एडवर्ड थॉम्प्सनने आपल्या 'The Making of Indian Princes -हिंदुस्थानातील संस्थानांची निर्मिती' या पुस्तकात दिलेले उतारे—पृष्ठे २७३, २७४.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel