शिखांशी दोन युध्दे झाल्यावर १८५० मध्ये ब्रिटिश सत्ता पंजाबमध्येही स्थापन झाली. शिखांचे राज्य पंजाबभर पसरविणारा महाराणा रणजितसिंग १८३९ मध्ये मरण पावला होता. १८५६ मध्ये अयोध्येचे राज्य खालसा झाले. ते राज्य पन्नास वर्षे मांडलीकच होते व तेथील नावाचा राजा दुबळा व व्यसनी असून ब्रिटिश रेसिडेंट हाच सर्वसत्ताधीश होता. त्या राज्याची अगदी वाईट अवस्था झाली होती व तैनाती पध्दतीतील सारे विष कसे उमटते याचा ते राज्य एक नमुनाच झाले होते.
१८५७ च्या मे महिन्यात मीरत येथील हिंदी सैन्याने बंडाचा झेंडा उभारला. पुढार्यांनी गुप्तपणे बंडाची चांगली तयारी केली होती. परंतु अवेळी स्फोट झाल्यामुळे पुढार्यांचे बेत ढासळले. ते केवळ फौजेचे बंड नव्हते म्हणून हा वणवा झपाट्याने पसरत चालला, व अखेर त्याला देशातील जनतेने केलेल्या बंडाचे—स्वातंत्र्ययुध्दाचे रूप आले. मात्र हे त्याचे रूप दिल्ली, संयुक्तप्रांत, मध्य हिंदुस्थानचे काही भाग, बिहार इत्यादी ठिकाणी काय ते राहिले. हे युध्द मुख्यत: सरंजामशाही वर्गात भडकले. सरंजामशाही अमीर-उमराव, सरदार हे या युध्दात सेनापती झाले. सर्वत्र पसरलेल्या ब्रिटिशविरोधी वातावरणाचे त्यांना पाठबळ होते. बंडाचे पुढारी सरंजामदारवर्गातले असल्यामुळे दुबळा, म्हातारा, सत्ताहीन परंतु अद्यापही दिल्लीच्या राजवाड्यात बसलेल्या, मोगल वंशाच्या अवशेष राहिलेल्या बादशहावर त्यांची नजर वळली व ते त्याला मान देऊ लागले. हिंदु-मुसलमान दोघांनीही या स्वातंत्र्ययुध्दात भरपूर भाग घेतला.
या बंडाने ब्रिटिशांच्या सत्तेला खूपच ताण पडला, परंतु शेवटी हिंदी लोकांच्या मदतीनेच हा वणवा विझविण्यात आला. जुन्या राजवटीची परकी सत्तेला घालविण्यासाठी ही अखेरची धडपड होती आणि तिच्यातील सर्व प्रकारचा दुबळेपणा या वेळेस स्पष्ट दिसून आला. सरंजामशाही प्रमुखांना जनतेचा सर्वत्र पाठिंबा होता, परंतु या प्रमुख पुढार्यांत तितकी कर्तबगारी नव्हती, त्यांच्यात नीट संघटना नव्हती, एखादे निश्चित विधायक ध्येय किंवा हितसंबंधाची ध्येयवाक्यता नव्हती. सरंजामदारवर्गाचे ऐतिहासिक कार्य संपलेले होते व पुढे भविष्यकाळात त्याला स्थान नव्हते. त्यांच्यातील अनेकांची ओढ मनातून बंडवाल्यांकडे होती. परंतु पराक्रमापैकी धाडसापेक्षा धूर्तपणाचा भागच त्यांनी अधिक चांगला ठरवून विजय कोणाला मिळतो याची ते वाट पाहात बसले. पुष्कळांनी फितुरी करून परकीयांना घरात घेतले. हिंदी राजेरजवाडे होताहोईतो तटस्थ राहिले, काहींनी ब्रिटिशांना मदतही केली. त्यांना जे मिळाले होते किंवा त्यांचे जे शिल्लक उरले होते ते धोक्यात घालायला ते तयार नव्हते. या उठावाचे पुढारी होते त्यांच्यात एकजूट राहण्याइतकी फारशी राष्ट्रीय भावना नव्हती. इंग्रजांचा द्वेष आणि आपले सरंजामशाहीचे हक्क राखण्याची इच्छा एवढ्याने खर्या राष्ट्रीयतेच्या भावनेची जागा भरून येण्यासारखी नव्हती.
ब्रिटिशांना गुरख्यांचे साहाय्य झाले, आणि आश्चर्य हे की शीखही त्यांच्या बाजूने उभी राहिले. शीख हे वास्तविक त्यांचे शत्रू, थोड्या वर्षांपूर्वीच इंग्रजांनी त्यांचा पराजय केला होता, असे असूनही शिखांना इंग्रजांनी आपल्या बाजूला ओढून घेतले हे इंग्रजांना भूषणावह असले तरी शिखांना ते होते की नाही हे आपण जी दृष्टी ठेवू तिच्यावर अवलंबून राहील. एक गोष्ट खरी की, सर्व हिंदी जनतेला एकत्र जोडणार्या राष्ट्रीय भावनेचा त्या वेळेला अभाव होता. अर्वाचीन स्वरूपाचा राष्ट्रवाद अद्याप जन्मायचा होता. खरेखरे स्वातंत्र्य कसे मिळेल याचा धडा शिकण्यासाठी देशाला अद्याप कितीतरी दु:ख व आपदा भोगायच्या बाकी राहिल्या होत्या. अगोदरच मार खाऊन हरलेल्या सरंजामशाही पध्दतीसाठी लढून स्वातंत्र्य येणार नव्हते.