गनिमी काव्याने लढाई चालविण्याला लायक ठरले असे अनेक सेनापती या युध्दामुळे चमकले. अशा नाव घेण्याजोग्या सेनापतींमध्ये दिल्लीच्या बहादुरशहाचा नातलग फेरोजशहा हा एक होता. पण त्यातल्या त्यात, पराजय उघड डोळ्यांसमोर दिसत असताही कैक महिने ब्रिटिशांना हैराण करून सोडणारा तात्या टोपे याचे तेज काही औरच होते. शेवटी नर्मदा ओलांडून तो मराठी मुलखात शिरला. तो आपले लोक आपल्याला आश्रय देतील, खुषीने घरात घेतील या आशेने, परंतु त्याचे स्वागत तर नाहीच, उलट दगलबाजी मात्र झाली. त्या काळातील एक नाव सर्वांहून अधिक तेजाने अद्याप तळपते, अजूनही ते नाव वंदनीय म्हणून लोकांच्या आठवणीत आले. ते नाव म्हणजे अखेरपर्यंत लढतालढता धारातीर्थी पडलेल्या एका वीस वर्षाच्या मुलीचे, झांशीची राणी—लक्ष्मीचे, 'बंडवाल्यांच्या सेनानींमध्ये सर्वांहून थोर, शूर', असे तिचे वर्णन ती ज्याच्याशी लढली त्या इंग्रज सेनापतीने केले आहे.
कानपूर व अन्य ठिकाणी ब्रिटिशांनी बंडाची स्मारके उभारली आहेत. परंतु मेलेल्या हिंदी लोकांचे स्मारक कोठेच नाही. बंडखोर हिंदी लोकांनी कोठे क्रूरपणा, रानटीपणा दाखविला असेल, परंतु त्यांच्यात नीट शिस्त व संघटना नव्हती, व ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराच्या गोष्टी कानावर येऊन तेही चिडत. परंतु या चित्राची दुसरी एक बाजूही आहे व हिंदी मनावर तिचाच ठसा कायमचा उठलेला आहे. विशेषत: माझ्या प्रांतातील खेड्यापाड्यांतून, शहरांतून ती आठवण अद्याप ताजी आहे. ते सारे प्रकार मनातून काढून टाकावे अशी इच्छा होते, कारण ते सारे भयंकर, अघोर चित्र आठवले की माणसासारखी माणसे कशी राक्षस बनतात त्याची जाणीव होते. अर्वाचीन युध्द, नाझी संप्रदाय यांनी रानटीपणाची नवीन हद्द गाठली असली तरी ब्रिटिशांनी त्या वेळेस केलेले प्रकार त्याहीपेक्षा क्रूर होते. ते सारे प्रकार खरोखरच मागे पडले व त्यांचा चालू काळात मागमूसही राहिला नाही, तरच ते विसरणे किंवा निदान आपल्या मनाची चलबिचल न होता सहज डोळ्यांपुढून जाणे शक्य होईल. ह्या प्रकारांनी चालू काळाशी जोडणारे दुवे, त्यांची स्मारके जोपर्यंत शिल्लक आहेत, समोर आहेत आणि त्या घडामोडीपाठीमागची वृत्तीही अद्याप जोवर तशीच रोज दिसून येत आहे तोपर्यंत ही स्मृती राहणार आणि लोकांच्या मनावर त्याचा परिणामही होणारच. ते चित्र दडपून टाकायचे प्रयत्न जास्त केल्याने ते चित्र उलट अधिकच तीव्रतेने मनात राहील. झाले गेले ते सहजगत्या घडले म्हणून, त्याचा गाजावाजा, स्मारके न करता, ते सोडले तरच त्याचा परिणाम कमी करणे शक्य आहे.
हे बंड व त्याचा मोड याबद्दल खोटा आणि विकृत इतिहास वाटेल तेवढा लिहिण्यात आला आहे. या युध्दाविषयी हिंदी लोकांना काय वाटते ते क्वचितच मोठे छापले जाते. तीस वर्षांपूर्वी सावरकरांनी 'हिंदी स्वातंत्र्ययुध्दाचा इतिहास' म्हणून पुस्तक लिहिले. परंतु तत्काळ ते जप्त केले गेले आणि जप्ती अद्यापही आहे. काही नि:पक्षपाती सामान्य इंग्रज इतिहासकारांनी त्या घटनांवरचा पडदा थोडाबहुत मधूनमधून दूर केला आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या मनात त्या वेळी वर्णद्वेष कसा भिनला होता, न्याय-अन्याय न पाहता गर्दी करून वाटेल त्याला जीवे मारण्याची घिसाडघाई कशी चालली होती, त्यांचे मधूनमधून ओझरते दर्शन होते. के आणि मालेसन यांच्या 'बंडाचा इतिहास' (हिस्टरी ऑफ दि म्युटिनी) या पुस्तकातील किंवा थॉम्प्सन् आणि गॅरेट यांच्या 'हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेचा उदय आणि पूर्णता' या पुस्तकातील वृत्तान्त वाचून अंगावर शहारे येतात. ''जो कोणी ब्रिटिशांच्या बाजूने लढत नसेल तो 'बायकापोरांची कत्तल करणारा' मानण्यात येई...दिल्लीत सर्रास कत्तलीचा हुकूम देण्यात आला. तेथील बहुतेक लोक आम्हांस यश चिंतीत असे आम्हांस माहीत होत, तरीही हा जाहीरनामा लागला.'' तैमूर आणि नादिरशहा यांच्या स्वारीचे पुन्हा स्मरण झाले. परंतु इंग्रजी हत्याकांडापुढे तीही हत्याकांडे फिकी ठरली. त्यांच्यापेक्षा अधिक दिवस कत्तल चालली होती, अधिक विस्तृत प्रमाणात होत होती. एक आठवडाभर लूट करण्याची अधिकृत परवानगी होती. परंतु प्रत्यक्षात ती महिनाभर चालू होती आणि नुसतीच लूट चालू नव्हती तर तिच्याबरोबर सर्रास कत्तलही चालली होती.