हिंदू आणि मुसलमानांतील सुधारणाविषयक व इतर चळवळी
उद्योगधंद्यांतील यांत्रिक सुधारणा आणि त्या चालनेने घडलेले परिणाम यामुळे एकोणिसाव्या शतकात हिंदुस्थानला पश्चिमेची खरीखुरी धडक बसली. विचाराच्या क्षेत्रातही धक्के बसले; फेरबदल होऊ लागले. आतापर्यंत लहानशा मर्यादित कोंडलेले क्षितिज विशाल, विस्तृत झाले. या धक्क्याची पहिली प्रतिक्रिया इंग्रजी शिकलेल्या सुशिक्षित वर्गापुरतीच झाली. त्यांना जे काही पश्चिमेकडचे दिसेल त्याचे कौतुक वाटे व त्याचे अनुकरण करावेसे वाटे. हिंदुधर्मातील काही रूढी व चालीरीती यांचा तिटकारा वाटून अनेक हिंदू, ख्रिश्चन धर्माकडेही झुकू लागले व बंगालमध्ये धर्मांतराची असली काही प्रसिध्द उदाहरणे घडली. म्हणून हिंदू धर्मालाच नवीन काळाला, परिस्थितीला अनुरूप असे स्वरूप देण्याचा राममोहनसारख्यांनी खटाटोप आरंभिला. त्यांनी विचारप्रधान आणि सामाजिक सुधारणेला अनुकूल असा ब्राह्मसमाज स्थापन केला. त्यांच्यामागून येणार्या केशवचन्द्र सेनांनी त्याला ख्रिस्ती वळण दिले. बंगालमधील उदयास येणार्या नवीन मध्यमवर्गावर ब्राह्मसमाजाची बरीच छाप पडली, परंतु धर्म या दृष्टीने फारच थोड्या लोकांपुरता तो मर्यादित होता. मात्र या थोड्या लोकांत काही थोरथोर माणसे आणि सुप्रसिध्द घराणी होती. परंतु धार्मिक आणि सामाजिक सुधारणेची तीव्र उत्कंठा असणार्या या ब्राह्मपंथी घराण्यांचाही वेदान्तातील भारतीय प्राचीन ध्येयाकडेच ओढा होता.
हिंदुस्थानात इतरत्रही ह्या असल्याच वृत्तीचे कार्य सुरू होते. हिंदुधर्माच्या कडक वर्णव्यवस्थेमुळे आणि त्यातील शेकडो पंथांमुळे व भेदांमुळे अनेकांना असमाधान वाटत होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गुजराथेत जन्मलेल्या एका व्यक्तीने-स्वामी दयानंद सरस्वतींनी एक संस्मरणीय चळवळ सुरू केली. परंतु दयानंदांच्या चळवळीने जो जोर धरला तो पंजाबमधील हिंदूंत. दयानंदांनी जो पंथ स्थापिला त्याला आर्यसमाज हे नाव आहे. ''पुन्हा वेदाकडे चला,'' हे या पंथाचे घोषवाक्य होते. वास्तविक या घोषणेचा हा अर्थ होता की, वेदानंतर आर्यधर्मात जे काही फेरबदल झाले असतील ते सारे सोडून द्यावे, ते अधिकृत मानू नये. वेदकालानंतर विकास पावलेले वेदान्त तत्त्वज्ञान व अद्वैत मताची त्यातील मध्यवर्ती कल्पना, सर्वांभूती चराचरात परमेश्वर आहे, सृष्टिरूपाने तो प्रकट आहे हे मत व यातून निघालेले कनिष्ठ धर्मप्रकार आर्यसमाजाने अगदी निषिध्द ठरविले. वेदांचाही विशिष्ट रीतीने अर्थ लावण्यात आला. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म विशेषत: इस्लाम धर्म यांच्या वाढत्या परिणामाविरुध्द आर्यसमाज ही प्रतिक्रिया होती. अंत:शुध्दी करून प्राचीन धर्माचे पुनरुज्जीवन करणे व बाहेरून धर्मावर होणार्या आघातांपासून धर्माचे रक्षण करणे असे या पंथाचे दुहेरी कार्य होते. अन्य धर्मीयांना शुध्द करून हिंदू धर्मात घेण्याची प्रथा आर्यसमाजाने सुरू केल्यामुळे धर्मप्रसार करणार्या दुसर्या धर्मांशी त्यांचे खटके उडू लागले. आर्यसमाज अगदी इस्लामच्या धर्तीवर जाऊ पाहात होता. पुढे त्याने जे काही हिंदू म्हणून ओळखले जात असेल त्या गोष्टींचे रक्षण करण्याचा चंग बांधला. तो विशेषत: त्यांच्या मते परधर्मीयांनी हिंदुधर्मावर जे आक्रमण चालविले होते ते थांबविण्याकरता होता. पंजाब आणि संयुक्तप्रांतातील मध्यमवर्गात विशेषेकरून हा पंथ परसला. या घटनेत विशेष अर्थ आहे. राजकीय दृष्ट्या ही क्रांतीकारक चळवळ आहे असा एकेकाळी सरकारी समज झाला होता. परंतु सरकारी नोकरीतील कितीतरी माणसे यात असल्यामुळे समाज सरकारी दृष्टीने सोवळा सुप्रतिष्ठित ठरला. मुलांमुलींत शिक्षणप्रसाराचे मोठे कार्य आर्यसमाजाने केले आहे; स्त्रियांची स्थिती सुधारणे व अस्पृश्य वर्गाची उन्नती करणे या बाबतीतही स्पृहणीय कार्य आर्यसमाजाने बजावले आहे.