ब्रिटिश सत्ता ज्या आधारावर उभी होती ते आधार म्हणजे लोकांना सरकारची वाटत असलेली भीती. लोक सरकारला देत असलेला मान, लोकांकडून, त्यातल्या त्यात विशेषत: ज्यांचे पिढ्यापिढ्यांचे हितसंबंध ब्रिटिश राज्याभोवती घोटाळत होते अशा वर्गाकडून सरकारला मिळत असलेले खुषीचे वा नाखुषीचे सहकार्य होय, हे ओळखून गांधींनी हे आधार उखडून टाकण्याकरता त्या आधारावर हल्ला चढवला. सरकारने दिलेल्या पदव्या, मानमरातब, लोकांनी सोडून द्यावे असे ठरले, व काही थोड्याशाच किताबवाल्यांनी हा ठराव मानून तसे केले तरी एकंदरीत परिणाम असा झाला की, लोकांत ह्या किताबांना मान होता तो गेला, हे किताब म्हणजे अध:पाताचे चिन्ह होऊन बसले. माणसाचा मोठेपणा ठरविण्याची वेगळी नवी मूल्ये, नव्या कसोट्या आल्या. व्हाईसरॉयचा दरबार, राजेरजवाडे यांचा दिमाख, त्यांचे वैभव पाहून लोकांचे डोळ दिपत, त्याऐवजी अवतीभोवती पसरलेल्या दैन्यदारिद्र्याकडे नजर जाऊन अशा भोवतालच्या देखाव्यात ह्या पात्रांचा दिमाख, त्यांचे वैभव म्हणजे शुध्द गावंढळ थाट, थट्टेचा विषय आहे असे लोकांना वाटू लागले. श्रीमंत लोकांना आपली श्रीमंती लोकांपुढे मिरवावी असे वाटेनासे झाले; निदान देखाव्यापुरती पुष्कळ श्रीमंतांची राहणी साधी होऊ लागली व वेषापुरते त्यांना गरिबापासून वेगळे ओळखणे अवघड झाले.
गांधींच्या अगोदरचे काँग्रेसमधले पुढारी होते ते एका वेगळ्याच, जास्त निश्चल परंपरेत वाढलेले होते. त्यामुळे ते या नव्या तंत्रात रुळेनात, व त्यांचे मन अडाणी सामान्य जनतेत उठलेल्या कल्लोळामुळे अस्वस्थ झाले. परंतु स्वत:च्या स्थितीची आलेली जाणीव व जाग्या झालेल्या भावनांची अशी काही प्रचंड लाट देशभर उसळली की त्यातला काही उन्माद त्यांच्याही अंगात आला. वेगळे पडले असे फारच थोडे पुढारी निघाले. त्यातच श्री. महमद अली जिना हेही काँग्रेसमधून बाहेर पडले. ते बाहेर पडले ते त्यांचा व काँग्रेसचा हिंदु-मुसलमान प्रश्नावर काही मतभेद झाला म्हणून नव्हे. तर त्यांना ह्या नव्या, अधिक पुढे गेलेल्या विचारसरणीशी जुळते घेता येईना व त्याहीपेक्षा जास्त म्हणजे गबाळ कपडे घालून हिंदुस्थानी भाषेत बोलणार्या लोकांचे थवेच्या थवे काँग्रेसमध्ये गर्दी करीत होते ते जिनांना आवडेना म्हणून जिना बाहेर निघाले. त्यांची राजकारण करण्याच्या रीतीची कल्पना जरा भारी दर्जाची होती. ती विधिमंडळाच्या सभागृहाला किंवा निवडक मंडळीच्या समितीच्या छोट्या बैठकीला शोभण्यासारखी होती. ह्यानंतर काही वर्षे ह्या चित्रात आपल्याला कोठे जागा नाही असे त्यांना वाटे व हिंदुस्थान कायमचे सोडून दुसर्या देशात जाऊन राहण्याचेही त्यांनी ठरविले होते. ह्याप्रमाणे ते इंग्लंडमध्ये जाऊन वस्ती करून राहिले व त्यांनी कैक वर्षे तिकडेच घालविली.
भारतीयांच्या मनोवृत्तीला मुख्य सवय मन:स्वास्थ्य, निवांत, निर्वेध असण्याची आहे असे म्हणतात, व मला ते म्हणणे खरे वाटते. कदाचित असेही असेल की जुन्या मानववंशाची मनोवृत्ती परिणत होता होता जीवन असे निवांत असावे अशी त्यांची वृत्ती बनत असेल; किंवा त्या मानववंशाची तत्त्वज्ञानपरंपरा हजारो वर्षे चालता चालता अखेर याच वृत्तीला जाऊन पोचत असेल. पण तसे म्हणावे तर भारतीय वळणाचा खास नमुना असे ज्यांना म्हणता येईल ते गांधी मात्र ह्या स्वस्थतेच्या, निवांतपणाच्या विरुध्द टोकाला असलेल्या मनोवृत्तीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा उत्साह दांडगा, कामाला ते राक्षस आहेत, स्वत:च्या नव्हे तर इतरांच्या मागेही त्यांचा सारखा कामाचा लकडा लागलेला असतो. भारतीयांच्या ह्या असल्या संथ मनोवृत्तीशी झगडून ती पार बदलून टाकण्याचे काम मला माहीत असलेल्या दुसर्या कोणत्याही माणसापेक्षा गांधींनीच अधिक केले आहे.