राष्ट्रसभेच्या सरकारांवर मी पुष्कळदा टीका करीत असे.  प्रगतीचा मंदपणा पाहून मी चडफडत असे, जळफळत असे.  परंतु आज सिंहावलोकन करीत असताना सव्वादोन वर्षांच्या अत्यल्प काळात, अपरंपार अडचणी सभोवती असताना त्यांनी केलेले काम पाहून मला आश्चर्य वाटते. त्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या कार्यांना दुर्दैवेकरून फळ लागले नाही; कारण ती कार्ये पुरी करीत असतानाच त्यांना राजीनामे द्यावे लागले, आणि त्यांच्यामागून पुन्हा हाती सत्ता घेऊन बसणार्‍या ब्रिटिश गव्हर्नरांनी ती कामे तशीच बाजूला ढकलली.  राष्ट्रसभेच्या मंत्र्यांच्या कारकीर्दीत कामगार आणि शेतकरी दोघांचा फायदा झाला.  दोघांचे सामर्थ्य वाढले, एक अत्यंतमहत्त्वाची आणि दूरगामी सुधारणा म्हणजे मूलगामी शिक्षण पध्दतीची सुरुवात होय.  आज जनतेला शिक्षण देण्याची ही नवीन वर्धा-पध्दती होती.  ही पध्दती नवीनातल्या नवीन शैक्षणिक सिध्दान्तानुसार होती, एवढेच नव्हे तर हिंदी परिस्थितीला ती विशेषच अनुरूप अशी, अनुकूल अशी होती; योग्य अशी होती.

प्रत्येक वतनदारवर्ग प्रगतिपर फरक करण्याच्या आड येत होता.  कानपूरच्या कापडाच्या धंद्यातील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी संयुक्तप्रांतीय राष्ट्रसभेच्या सरकारने एक समिती नेमली.  परंतु कारखानदारांनी (विशेषत: युरोपियन, परंतु त्यांच्यात काही हिंदीही होते.) या समितीजवळ अतिउद्दामपणाचे वर्तन केले.  माहिती आणि आकडे पुरवायला त्यांनी नकार दिला.  कारखानदार आणि सरकार यांच्या संयुक्त, संघटित विरोधाला कामगारांनी कित्येक वर्षे तोंड दिले होते.  पोलिस नेहमी मालकांच्याच बाजूने असत.  राष्ट्रसभेच्या सरकारांनी जे नवीन धोरण अवलंबिले त्यामुळे मालकवर्ग चिडला.  श्री. बी. शिवराव यांना हिंदी कामगार चळवळीचा दीर्घ अनुभव आहे.  ते नेमस्त विचारसरणीचे आहेत.  हिंदी मालकशाहीच्या डावपेचाविषयी आणि कुटिल कारवाईविषयी ते आपल्या ग्रंथात पुढीलप्रमाणे लिहितात.* ''संप वगैरे झाले तर अशा प्रसंगी पोलिसांच्या साहाय्याने मालकशाही ज्या हिकमती लढविते, काही दिक्कत न वाटता जे उपाय योजते, त्यांची हिंदी परिस्थितीशी ज्यांचा परिचय नाही, त्यांना कल्पनाही येणार नाही, आणि त्या गोष्टी सांगितल्या तर त्यांचा विश्वासही बसणार नाही.''  बहुतक देशातील आजची प्रस्थापित सरकारे तरी बहुधा मालकाकडे झुकलेली असतात.  त्यांची रचनाच अशी आहे. परंतु शिवराव हिंदुस्थानच्या बाबतीत आणखीही काही कारणे देतात.  ते लिहितात, ''वैयक्तिक हेवेदावे आणि वैरे जरी दूर ठेवली तरी हिंदुस्थानातील बहुतेक सारा अधिकारी वर्ग-एखादा अपवाद सोडून द्या-भीतीने ग्रस्त झालेला आहे.  ही ट्रेड युनियन चळवळ जर वाढू दिली तर बहुजनसमाजात प्रचंड जागृती होईल; आणि असहकार, कायदेभंग अशा स्वरूपात राजकीय झगडेही पुन: पुन्हा पेटत आहेत; अशा परिस्थितीत बहुजनसमाजाची संघटना होऊ देण्याचा धोका वेळीच टाळला पाहिजे असे बहुधा त्यांना वाटत असावे.''
-----------------------
*  बी. शिवराव ''हिंदुस्थानातील कामगार''-''दि इंडस्ट्रियल वर्कर इन इंडिया'' (लंडन, १९३९).

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel