पुढे गांधीजी आणि आमाच्यातील इतर मंडळीही अनेकदा जिनांना भेटली. तासन् तास त्यांची बोलणी होत, परंतु प्रास्ताविकापलीकडे प्रगती होईल तर शपथ. आमची अशी सूचना होती की, राष्ट्रसभेचे आणि मुस्लिम लीगचे प्रतिनिधी एकत्र भेटावेत आणि परस्परांच्या प्रश्नांची त्यांनी सांगोपांग चर्चा करावी. जिना म्हणाले, ही गोष्ट तेव्हाच होईल जेव्हा हिंदुस्थानातील सर्व मुसलमानांची मुस्लिम लीग हीच एक प्रातिनिधिक संस्था आहे आणि राष्ट्रसभा केवळ हिंदूंची संस्था आहे असे तुम्ही मान्य कराल तर. अर्थात सहजच पेचप्रसंग आला. मुस्लिम लीगचे महत्त्व आम्ही मान्य करीत होतो म्हणून तर तिच्याकडे गेलो होतो. परंतु देशातील इतर मुस्लिम संस्थांचे काय, आणि राष्ट्रसभेशी सहकार करणार्या मुसलमानांची आम्ही अशी उपेक्षा करायची ? राष्ट्रसभेतही मुसलमान पुष्कळ होते आणि काही आमच्या सर्वश्रेष्ठ कार्यकारिणी समितीतही होते. जिनांचा दावा मान्य करणे याचा अर्थ आमच्या मुस्लिम सहकार्यांना आमच्यातून आम्ही ढकलून घालविण्याप्रमाणे होते. जा बाहेर, राष्ट्रसभेचा दरवाजा तुम्हाला बंद आहे असे त्यांना सांगण्याप्रमाणे होते. राष्ट्रीय सभेचे मूलभूत स्वरूपच बदलायला हवे होते. सर्वांना जिचे दरवाजे मोकळे असत अशा राष्ट्रीय संघटनेचे एका जातीय संघटनेत रूपांत करण्याप्रमाणे ते होते. आम्ही या गोष्टीची कल्पनाही करू शकत नव्हतो; राष्ट्रसभा नसती तर सर्वांना, सर्व हिंदी माणसांना येता येईल अशी नवीन राष्ट्रीय संस्था आम्हांला उभी करावी लागली असती.
जिनांचा हा हट्ट आम्ही समजू शकत नव्हतो. ही गोष्ट मान्य केल्याशिवाय दुसर्या कोणत्याच गोष्टीची चर्चा करायला त्यांची तयारी नाही हेही आम्हाला समजू शकत नव्हते. आम्ही पुन्हा एकच निर्णय घेतला की, त्यांना तडजोड नको आहे किंवा कोणत्याही प्रकारे गुंतून जायला ते तयार नाहीत, वार्यावर सर्व गोष्टी सोडून देण्यात त्यांना समाधान होते. अशा रीतीनेच ब्रिटिशांपासून आपण अधिक मिळवू शकू अशी अपेक्षा ते करीत राहिले.
जिनांची मागणी त्यांनी नवीनच पुरस्कारलेल्या व्दि-राष्ट्रवादावर उभारलेली आहे. दोनच का हे मला कळत नाही. राष्ट्रीयता जर धर्मावरच आधारायची असे म्हटले तर हिंदुस्थानात अनेक राष्ट्रे होतील. दोन भावांपैकी एक हिंदू असला आणि एक मुसलमान असला तर ते दोघे दोन निरनिराळ्या राष्ट्रांचे व्हायचे. हिंदुस्थानातील बहुतेक खेड्यांतून अशी दोन राष्ट्रे मग दिसून येतील. ही अशी दोन राष्ट्रे आहेत की ज्यांना मर्यादाच नाहीत. त्यांच्या सीमा, मर्यादा एकमेकांवर चढायच्या. बंगाली मुसलमान आणि बंगाली हिंदू एक भाषा बोलणारे असूनही, समान परंपरा असूनही दोघे दोन निरनिराळ्या राष्ट्रांचे व्हायचे. हे सारे समजणे खरोखर शक्तीच्या बाहेरचे आहे. एखाद्या मध्ययुगीन विचारसरणीकडे आपण जात आहोत असे वाटते. राष्ट्र म्हणजे काय ? याची व्याख्या करणे खरोखर कठीण आहे. आपण सारे एक आहोत आणि सारे मिळून सार्या जगाला तोंड देऊ अशी जाणीव असणे हे राष्ट्रीय भावनेचे एक महत्त्वाचे गमक म्हणून सांगता येईल. सर्व हिंदुस्थानात ही भावना कितपत आहे याविषयी मतभेद असू शकतील. असेही सांगण्यात येईल की, भूतकाळात अनेक राष्ट्रकांचा संघ या रीतीनेच हिंदुस्थानची वाढ होत होती, आणि हळूहळू त्यातून राष्ट्रीय एकतेची भावना वाढीला लागली. परंतु या सार्या अमूर्त काथ्याकुटात काही अर्थ नाही. जगातील आजची अत्यंत बलाढ्य अशी दोन राष्ट्रे अनेक राष्ट्रकांमिळून झालेली आहेत आणि असे असूनही एकराष्ट्रीयत्वाची जाणीव त्यांना येत आहे. आलेली आहे. ही दोन राष्ट्रे म्हणजे अमेरिकन संयुक्त संस्थाने आणि सोव्हिएट राष्ट्र-संघ ही होत.
जिनांच्या व्दिराष्ट्र सिध्दान्तातून पाकिस्तानची म्हणजेच हिंदुस्थानची फाळणी करण्याची कल्पना पुढे आली. परंतु त्यामुळे व्दिराष्ट्र सिध्दान्त सुटणार कसा ? कारण दोन राष्ट्रे तर हिंदुस्थानभर आहेत. परंतु पाकिस्तान या शब्दामुळे आध्यात्मिक आणि अमर्त कल्पनेला काही मूर्त स्वरूप आले. परंतु पाकिस्तानची आणि हिंदुस्थानची फाळणी करण्याची कल्पना मांडली जाऊ लागताच हिंदुस्थान एक राहिलाच पाहिजे म्हणून दुसर्या बाजूने उत्कट भावनेची प्रतिक्रिया सुरू झाली. सामान्यत: राष्ट्रीय ऐक्य ही गोष्ट गृहीतच धरून आपण चालत असतो. ज्या वेळेस या ऐक्यावर कोणी आघात करतो, हल्ला चढवितो, ते ऐक्य नष्ट करण्याची खटपट करतो, त्या वेळेसच त्या ऐक्याची खरी जाणीव आपणांस होते आणि ते ऐक्य टिकविण्यासाठी मग जोराची प्रतिक्रिया सुरू होते. अशा रीतीने कधीकधी ऐक्यविघातक प्रयत्नातून ते ऐक्य अधिक दृढ व्हायलाच अप्रत्यक्ष मदत होते.