नवीन भांडवलदारवर्गाच्या वाढीबरोबर वाढत जाणार्या राष्ट्रीय आशा-आकांक्षांचेच राष्ट्रीय सभा प्रतीक होती असे नव्हे तर सामाजिक क्रांतीसाठी धडपडणार्या कामगारवर्गाच्या आशा-आकांक्षांचेही ती प्रतीक होत होती. विशेषत: क्रांतिकारक शेतकरी सुधारणांसाठी ती बध्दपरिकर होऊन उभी होती. यामुळे राष्ट्रसभेत कधी कधी अंतर्गत कुरबुरीही होत, संघर्षही होत. जमीनदारवर्ग आणि बडे कारखानदार हे बहुधा जरी बरेचसे राष्ट्रीय असले तरीही राष्ट्रसभेपासून अलिप्त राहात. त्यांना सामाजिक क्रांतीकारक फेरबदलांचे भय वाटे. राष्ट्रसभेमध्ये समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्ष होते, आणि राष्ट्रसभेच्या धोरणावर ते परिणाम करू शकत. हिंदू किंवा मुस्लिम जातीय संस्था या बहुधा सरंजामशाही आणि प्रतिगामी गटांशी संबध्द असत. कोणत्याही प्रकारचा क्रांतिकारक फेरबदल करायला त्यांचा सक्त विरोध असे. धर्माच्या पांघरुणाखाली मुख्य प्रश्न डावलला गेला तरी खरा प्रश्न धार्मिक नसून आर्थिक होता. खरा झगडा धर्माशी नव्हता. सरंजामशाही पध्दतीचे जुनाट अवशेष राखू राहणारे आणि सामाजिक स्वरूपाची क्रांती करू पाहणारे राष्ट्रीय लोकसत्तावाले यांच्यात खरा झगडा होता. जेव्हा आणीबाणीची वेळ येते, तेव्हा जुने डोलारे सांभाळू पाहणारे परकीयांच्या आधारावर विसंबून राहतात, आणि परकीयांना जैसे थे अशीच परिस्थिती हवी असते.
दुसरे महायुध्द आले आणि अंतर्गत पेचप्रसंग येऊन राष्ट्रीय सभेच्या मंत्र्यांनी राजीनामे देण्यात त्याचे पर्यवसान झाले. परंतु हे होण्यापूर्वी पुन्हा एकदा राष्ट्रसभेने जिनांकडे आणि मुस्लिम लीगकडे जायचा प्रयत्न केला. युध्द सुरू झाल्यावर सभेची जी कार्यकारिणी समितीची बैठक व्हायची होती तिला हजर राहायला जिनांना आमंत्रण देण्यात आले. परंतु त्यांना येणे जमले नाही, आम्ही नंतर त्यांना भेटलो आणि जागतिक आणीबाणीच्या परिस्थितीत काहीतरी समान धोरण अवलंबिले जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. फारशी प्रगती झाली नाही, कारण आम्ही आमची बोलणी सुरू ठेवली. मध्यंतरी राष्ट्रसभेच्या सरकारांनी राजीनामे दिले हे राजीनामे राजकीय दृष्ट्या दिलेले होते. मुस्लिम लीग किंवा जातीय प्रश्न यांच्याशी त्यांचा काहीएक संबंध नव्हता, परंतु राष्ट्रसभेवर राक्षसी हल्ला चढवायला हाच क्षण जिनासाहेबांनी पसंत केला आणि प्रांतांतील राष्ट्रसभेची सरकारे नाहीशी झाल्यामुळे ''सुटकेचा दिवस'' साजरा करा असे मुस्लिम लीगतर्फे सांगण्यात आले. राष्ट्रसभेतील राष्ट्रीय वृत्तीच्या मुसलमानांवर अश्लाघ्य आणि न शोभणारी टीका जिनांनी याच वेळेस केली. विशेषत: हिंदू आणि मुसलमान दोघांनाही ज्यांच्याविषयी अपार आदर वाटतो, त्या अबुल कलम आझादांवर त्यांनी लज्जास्पद वाक्बाण मारले. मौलाना आझाद राष्ट्रसभेचे अध्यक्ष होते. हा 'मुक्तिदिन' नीटसा पाळला गेला नाही. फजितीच झाली. मुक्तिदिनाच्या विरोधी मात्र प्रचंड निदर्शने झाली, आणि ती मुसलमानांतच होती. परंतु कटुता अधिक वाढत गेली आणि आमची पक्कीच खात्री झाली की, जिना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग यांना राष्ट्रसभेशी तडजोड करण्याची तिळभरही इच्छा नाही. हिंदी स्वातंत्र्याच्या प्रश्नाची त्यांना दरकार नाही. असलेली स्थितीच त्यांना प्रिय होती.*
---------------------------
* हे पुस्तक लिहून झाल्यावर वुइलफ्रिड कॅन्टवेल स्मिथ या कॅनेडियन पंडिताचे 'मॉडर्न इस्लाम इन इंडिया-ए सोशल अॅनलिसिस' (लाहोर, १९४३ : हिंदुस्थानातील अर्वाचीन इस्लाम-सामाजिक पृथक्करण) हे पुस्तक मी वाचले. या ग्रंथकाराने इजिप्त व हिंदुस्थान यांत काही वर्षे घालविली होती. या पुस्तकातील विवेचन आणि पृथक्करण खोल आहे. १८५७ पासून हिंदी मुसलमानांच्या विचारवाढीचा इतिहास त्याने दिला आहे. सर सय्यद अहंमद खानांच्या वेळेपासून तो आतापर्यंत झालेल्या सर्व पुरोगामी वा प्रतिगामी मुस्लिम चळवळींचा त्याने इतिहास दिला आहे. मुस्लिम लीगच्याही विविध दशांचे वर्णन त्यात आहे.