संयोजन समितीने काम चालू ठेवले. पोटसमित्यांचे सारे अहवाल जवळजवळ तिने चर्चून निकालात काढले. अद्याप त्यांच्यासंबंधी थोडेसे काम राहिले होते. ते संपवून आम्ही आमच्या बृहत् अहवालाचा विचार करू लागणार होतो. परंतु १९४० च्या ऑक्टोबर महिन्यात मला अटक झाली आणि दीर्घकालीन शिक्षा देण्यात आली. संयोजन-समितीतील अनेकांना अटक होऊन शिक्षा झाल्या, संयोजन-समितीचे काम चालू राहावे असे मला फार फार वाटत होते आणि काम चालू ठेवा असे बाहेर असणार्या सहकार्यांना मी विनविले. परंतु माझ्या गैरहजेरीत काम करायला ते तयार नव्हते. संयोजन-समितीचे कागदपत्र, अहवाल इत्यादी सामग्री तुरुंगात मला मिळावी म्हणून मी खटपट केली. त्या सर्वांचा अभ्यास करून मी एक खर्डा तयार करणार हातो; नमुन्यादाखल अहवालाचा खर्डा लिहून काढणार होतो. परंतु हिंदुस्थान सरकार आड आले आणि हे कागदपत्रही मला मिळू दिले नाहीत. कागदपत्र मला देण्यात आले नाहीत, एवढेच नव्हे तर या विषयावर भेटीगाठी घेण्याचीही मला परवानगी नव्हती.
माझे तुरुंगात दिवस जात होते आणि इकडे राष्ट्रीय संयोजन-समिती शरपंजरी होती. आम्ही केलेले काम जरी अपूर्ण होते तरी ते युध्दोपयोगी निर्मितीसाठी कितीतरी उपयोगी पडले असते. परंतु आमच्या कचेरीच्या कपाटात आमचे काम पडून राहिले होते. १९४१ च्या डिसेंबरात मला सोडण्यात आले. तुरुंगाच्या बाहेर काही महिने मी होतो. परंतु या काळात मला काय किंवा कोणाला काय क्षणाची फुरसत नव्हती. सारे प्रक्षुब्ध होतो. सर्व प्रकारच्या नवीन घडामोडी घडून आल्या होत्या. प्रशांत महासागरातील युध्द सुरू झाले होते. हिंदुस्थानला धोका निर्माण झाला होता. स्वारी होते की काय अशी भीती वाटू लागली होती. अशा काळात जुने धागेदोरे पुन्हा हाती घेऊन संयोजन-समितीचे अपुरे कार्य पुन्हा पुढे चालविणे केवळ अशक्य होते. राजकीय परिस्थिती निवळल्याशिवाय, स्वच्छ झाल्याशिवाय हे काम कसे करता आले असते ? परंतु नंतर पुन्हा मी तुरुंगात परतलो.