मोठेमोठी यंत्रे व त्यांच्यावर चालणारे उद्योगधंदे ह्यांच्या हिशेबाने एक प्रकारची अर्थव्यवस्था व केवळ ग्रामोद्योगापुरती दुसर्‍या प्रकारची अर्थव्यवस्था ह्या अगदी दोन भिन्न व्यवस्था एकाच वेळी एकाच देशात चालविता येतील काय ?  ते काही शक्य कोटीतले दिसत नाही, कारण त्यांपैकी कोणती तरी एक व्यवस्था अखेर दुसरीला मारक होऊन एकटीच शिल्लक राहणार आणि ती म्हणजे मोठ्या यंत्रावर आधारलेली यात शंका नाही.  अर्थात, कायद्याच्या जोरावर ती दडपून टाकली, साधी चढाओढ होऊ दिली नाही तरच ती दडपली जाईल.  सारांश असा की उत्पादन व अर्थव्यवस्था यांचे हे जे दोन प्रकार आहेत हे दोन्ही प्रकार एकाच वेळी चालू ठेवून त्यांचा मेळ कसा घालावयाचा इतक्यापुरताच साधा असा हा प्रश्न नाही.  ह्यातला एक जोरात-वरचढ राहणार व दुसरा म्हणजे काही उरलेसुरले असेल तेवढे काम करण्यापुरता कशीबशी मिळेल तेवढी जागा धरून राहणार.  यंत्रविद्योत जे अगदी अद्ययावत शोध लागले असतील ते उपयोगात आणून त्यावर आधारलेली जी अर्थव्यवस्था असेल तीच अर्थात प्रभावी ठरणार.  यंत्रांचा उपयोग करून घेताना मोठमोठी यंत्रे वापरण्यात अधिक लाभ आहे म्हणून तीच वापरणे अवश्य आहे असे शास्त्राच्या दृष्टीने ठरले तर तसलीच यंत्रे वापरणे व त्यांच्यामुळे होणारे सारे परिणाम व परिस्थिती पत्करणे भाग आहे.  हल्ली शास्त्रीय दृष्ट्या मोठी यंत्रे वापरणेच योग्य ठरले आहे.  तेव्हा त्याबरोबरचे सारे आलेच.  यंत्रांचा वापर करण्यात हिशेबाने कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी चालवावे असे ठरले तर ते तसे करणे चांगले, पण काहीही ठरवावयाचे असले तरी शास्त्रीय दृष्ट्या जो प्रकार अद्ययावत असेल तोच घेतला पाहिजे, काहीही झाले तरी, उत्पादनाच्या बाबतीत निरुपयोगी झालेले जुनाट प्रकार वापरणे म्हणजे उत्पादनात सुधारणा व वाढ थांबविणे होय.  फार तर तात्पुरता, वेळ मारून नेण्यापुरता उपाय म्हणून जुन्या पध्दतीच्या यंत्रविद्या व अर्थव्यवस्था काही काळ वापरलेली चालेल.

आजकालचे जग व त्या जगाला ज्या परिस्थितीला तोंड द्यावयाचे आहे त्या परिस्थितीत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावरून उद्योगधंद्यात वापरावयाची यंत्रे विशालच असणे अवश्य आहे हे निश्चित दिसत असताना लहानसहान यंत्रे सोईची की विशाल यंत्रे सोईची हा वाद घालीत बसणे म्हणजे तर्‍हेवाईकपणा वाटतो.  परिस्थितीतील महत्त्वाच्या गोष्टींमुळेच हिंदुस्थानातसुध्दा हल्ली विशाल यांत्रिक कारखान्यांची आवश्यकता सिध्द झालेली आहे आणि तेथे अगदी जवळच्या भविष्यकाळात यांत्रिक उद्योगधंद्यांचे युग येणार याबद्दल कोणालाच शंका उरली नाही.  त्या मार्गाने हिंदुस्थान देशाची प्रगती पुष्कळच झालेली आहे.  यांत्रिक उद्योगधंदे जे विशाल प्रमाणावर व्हायचे ते काही योजना न करता वाटेल तसे स्वैरपणे होऊ दिले तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते हल्ली स्पष्ट ओळखता येऊ लागले आहे.  हे वाईट परिणाम मोठ्या प्रमाणावर कारखाने चालविल्यामुळे होतात का त्या कारखान्यांच्या पाठीमागे त्यांचा आधार म्हणून जी सामाजिक व आर्थिक व्यवस्था असते त्यातून उद्‍भवतात हा प्रश्न वेगळा.  आर्थिक व्यवस्थेमुळे जर हे वाईट परिणाम होत असतील तर खरोखर म्हणजे ती अर्थव्यवस्था बदलण्याची तजवीज करायला लागले पाहिजे, उद्योगधंद्यांत तंत्राच्या दृष्टीने जी अवश्य व इष्ट सुधारणा होत जाते तिला दोष देत बसण्यात अर्थ नाही.

खरोखर महत्त्वाचा प्रश्न आहे तो देशात मालाचे उत्पादन करण्याच्या कामी परस्परविरोधी अशा वेगवेगळ्या साधनांपैकी व पध्दतींपैकी प्रत्येक प्रकार किती प्रमाणात घेऊन योग्य मेळ बसवावा कसा हा नसून देशात जी साधने, ज्या पध्दती उत्पादनाकरता वापरीत यांच्याहून अंगच्या गुणाने अगदी वेगळ्या, नव्या साधनांचा व पध्दतींचा उपक्रम सुरू करावा की काय असा प्रश्न आहे.  हे अगदी नवे वेगळे प्रकार आले की त्याबरोबर समाजरचनेवर होणारे त्यांचे परिणाम आलेच.  नव्या प्रकारांत जे भिन्न गुण येतात ते राजकीय व आर्थिक दृष्ट्या तर महत्त्वाचे आहेतच पण शिवाय सामाजिक व मानसिक दृष्ट्याही ते तितकेच महत्त्वाचे आहेत.  विशेषत: हिंदुस्थानापुरते पाहिले तर इतका काळ लोटून गेला तरी अद्याप आम्ही विचार व आचारांच्या बाबतीत जुन्या प्राचीन वळणाला इतके जखडून बांधलेले राहिलो आहोत की नव्या कल्पना आम्हांला सुचण्याकरता, नवी क्षितिजे डोळ्यांसमोर येण्याकरता काही नवे अनुभव, नवी विचारसरणी आम्हांला अवश्य आहे.  आमच्या जीवनात जी निष्क्रियतेची वृत्ती आली आहे ती या नव्या अनुभवांनी, नव्या विचारसरणींनी पालटेल व त्या वृत्तीत चैतन्य सक्रियता येऊन आमची बुध्दी कार्यप्रवण व साहसी बनेल.  परिस्थितीत जसजसे नवे प्रसंग उद्‍भवतील तसतसे आपल्या बुध्दीला या नव्या प्रसंगांना तोंड देणे भाग झाल्यामुळे आपल्याला या नव्याशी जुळवून घ्यावे लागेल व नवे अनुभव येत जातील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel