''लोकशाहीकरिता, स्वातंत्र्याकरिता, आक्रमणाचा निकाल लावण्याकरिता आम्ही लढतो आहोत अशी ग्रेट ब्रिटन व फ्रान्समधील सरकारांची घोषणा आहे हे या समितीला माहीत आहे.  पण तोंडाने बोलावयाची भाषा, उच्चारावयाची ध्येये व मनातले खरेखुरे हेतू व साध्ये यांच्यात किती विरोध पडत जातो त्याच्या उदाहरणांनी अगदी नुकताच घडलेला इतिहास खच्चून भरला आहे.''  यानंतर काँग्रेसच्या या निवेदनात पहिले महायुध्द चालू असताना व त्यानंतर घडलेले काही प्रकार दाखवून देऊन पुढे असे म्हटले होते, ''वरवर पाहिले तर अगदी खरा वाटावा अशा आवेशाने पुढे होऊन आणाशपथा वहाव्या व मग हळूच मागे पाय काढून त्या खुशाल मोडाव्या हेही प्रकार घडतात असे त्या काळानंतरचा इतिहास पाहिला म्हणजे स्पष्टच सिध्द होते... आता पान्हा तीच हाकाई सुरू झाली आहे की, लोकशाहीवर संकट आले आहे व म्हणून त्या लोकशाहीच्या संरक्षणाला धावून गेले पाहिजे.  कार्यकारी समितीला हे विधान अगदी मान्य आहे.  पाश्चात्य देशांतील जनता या लोकशाहीच्या ध्येयाने व संरक्षणाच्या हेतूने प्रेरित झालेली आहे हे या समितीला पटले आहे.  व त्याकरिता काही त्याग करावयालाही सकिती सिध्द आहे.  पण आतापर्यंत वारंवार असे घडत आले आहे की. लोकशाहीकरिता व स्वातंत्र्याकरिता चालविलेल्या लढ्यात ज्यांनी स्वत:ला बळी दिले त्यांची व जनतेची ध्येये आणि भावना यांची उपेक्षा झाली आहे.  विश्वासघात होत आला आहे.

''आहे तीच परिस्थिती, साम्राज्यशाहीचा राज्यविस्तार, वसाहती, विशिष्ट धंद्यांतून पक्के होऊन बसलेले स्वार्थी हितसंबंधी गट व त्यांचे नाना प्रकारे हक्क, या सगळ्यांचे संरक्षण व्हावे हा या युध्दाचा हेतू असेल तर हिंदुस्थानला ह्या युध्दाशी काही कर्तव्य नाही.  पण लोकशाही व लोकशाहीवर आधारलेले जागतिक राष्ट्रसंघटना यांच्याबद्दल हा लढा असेल तर हिंदुस्थानाला ह्या युध्दाबद्दल अत्यंत आस्था राहील.  ब्रिटिश लोकशाही व जागतिक लोकशाही यांचे हित व हिंदी लोकशाहीचे हित यांत विरोध येत नाही अशी या समितीची खात्री झाली आहे.  परंतु हिंदुस्थानात व अन्यत्रही लोकशाहीचा साम्राज्यशाही व फॅसिस्ट सोटेशाही यांच्याशी मुळातच विरोध आहे व तो कधीही नाहीसा होणार नाही.  तेव्हा ग्रेट ब्रिटनला जर लोकशाहीच्या संरक्षणाकरिता व प्रसाराकरिता लढावयाचे असेल तर त्या देशाने स्वत:च्या अंकित देशांतून साम्राज्यशाहीचे उच्चाटन प्रथम केले पाहिजे....हिंदुस्थानला स्वातंत्र्य व लोकशाही लाभली म्हणजे तो हिंदुस्थान इतर स्वतंत्र राष्ट्रांशी सहकार्य करून आक्रमणाविरुध्द एकमेकांशी एकमेकांचे संरक्षण करण्याचे व आर्थिक बाबतीत एकविचाराने चालण्याचे कार्य आनंदाने करील.  स्वातंत्र्य व लोकशाही या तत्त्वांच्या आधारावर स्थापलेल्या व सार्‍या जगातील ज्ञान आणि साधनसंपत्ती यांचा उपयोग अखिल मानवतेच्या उत्कर्षाकरिता व कल्याणाकरिता करणारा एक खरा जागतिक संघ असावा या उद्देशाने हा स्वतंत्र हिंदुस्थान सतत कार्य करीत राहील.''

काँग्रेसची कार्यकारी समिती राष्ट्रीय वृत्तीची असूनही युध्दासंबंधी विचार करताना तिची दृष्टी आंतरराष्ट्रीय होती व युध्द म्हणजे नुसती सशस्त्र सैन्यांची लढाई एवढाच या युध्दाचा अर्थ नसून त्याच्या पलीकडचा इतर गोष्टीही त्यात अभिप्रेत आहेत असे समितीचे म्हणणे होते.  ''युरोपावर हल्ली जो संकटप्रसंग येऊन ठेवला आहे तो केवळ युरोपवर नसून अखिल मानवजातीवर आला आहे.  इतर युध्दे आली व गेली तसे हे युध्द नुसते आले व गेले, आजच्या जगाची घडण मुळात जशीच्या तशीच पुढेही अबाधित राहिली असे होणार नाही.  जगाची राजकीय, आर्थिक व सामाजिक घडी या युध्दामुळे पार बदलण्याचा संभव आहे, मग ती अधिक चांगली होवो की अधिक बिघडून जावो.  गेल्या महायुध्दपासून जगातील आर्थिक व सामाजिक विरोध आणि भांडणे भयदायक गतीने वाढत गेली त्यांचाच हा अटळ परिणाम आहे व हा विरोध, ही भांडणे नाहीशी करून एक नवा समतोल जगात आणल्याखेरीज ह्या युध्दाचा पेच उकलणार नाही.  अशी नवी समतोल घडी जगभर बसवावयाची असेल तर एका देशाने दुसर्‍या देशावर वर्चस्व चालवावे, परिस्थितीचा अन्याय्य उपयोग करून स्वत:चा लाभ करून घ्यावा हे प्रकार बंद करून सर्वांच्या कल्याणाकरिता अधिक न्याय्य प्रकारे आर्थिक संबंधांची नवी घडी घालणे हा एकच उपाय आहे.  ह्या प्रश्नातला सर्वांत बिकट भाग म्हणजे हिंदुस्थान आहे, कारण आधुनिक साम्राज्यशाहीचे काय परिणाम होतात याचे सर्वांत उत्तम उदाहरण हा देश आहे, व म्हणून ह्या देशाचा महत्त्वाचा प्रश्न बाजूला टाकून जगाची नवी घडी बसवू म्हटले तर त्या प्रयत्नात यश नाही.  हिंदुस्थानची साधनसंपत्ती फार मोठी असल्यामुळे जगाची नवी घडी बसविण्याची कोणतीही योजना झाली तरी त्या योजनेत ह्या देशाचा भाग फार महत्त्वाचा राहणार, ह्या देशाला चांगली मोठी कामगिरी पार पाडणे शक्य आहे.  परंतु स्वातंत्र्य मिळून देशातील सर्व उत्साहाचा ओघ या जागतिक कार्याकडे लागावयाचा म्हटले तर हिंदुस्थान स्वतंत्र होऊनच हे साधेल.  आजच्या जगात स्वातंत्र म्हणजे सर्वच देश स्वतंत्र असले पाहिजेत, एका देशाला आहे तर एकाला नाही असे जागतिक स्वातंत्र्याचे खंड पाडता येणार नाहीत; व जगातल्या कोणत्याही प्रदेशावरचे साम्राज्यशाही वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न कोठेही झाला तर त्यामुळे पुन्हा सार्‍या जगावर नवे संकट कोसळेल.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel