वैयक्तिक सविनय कायदेभंग

एवंच, आता स्वातंत्र्य आले या विचाराने आमचे बाहू स्फुरण पावून स्वातंत्र्याच्या धुंदीत सबंध राष्ट्राने आपले बळ एकवटून या जागतिक रणसंग्रामात उडी ठोकावी त्याऐवजी या नकाराने निराश होऊन वैतागाच्या वेदना सोसण्याची पाळी आमच्यावर आली; आणि या नकाराखेरीज त्याबरोबर, मगरूरीची भाषा, ब्रिटिशांचे राज्य व त्यांचे धोरण यांची त्यांनी स्वत:च गायिलेली स्तुतिस्तोत्रे व स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पुर्‍या झाल्याच पाहिजेत अशा मनाला येतील तितक्या भरमसाट अटींची यादी, हीही आली.  आतापावेतो पार्लमेंटात चाललेले सशास्त्रविधी, वादविवादांचे व सविस्तर भाषणांचे सारे सव्यापसव्य, गोल गोल वाक्यप्रयोग, तोंडभर उद्‍गार हे केवळ राजकारणातील फसवाफसवीचे खेळ चालले होते,  शक्य असेल तोपावेतो हिंदुस्थानच मानगुटी बसून तेथे आपले साम्राज्य चालवावे, भोगवटा सुरू ठेवावा, हा मनातला पक्का हेतू जेमतेम झाकण्यापुरते पांघरलेले ते एक वस्त्र होते.  हिंदुस्थानच्या जिवंत देहात खुपसलेली ही साम्राज्यशाहीची नखे तितकीच खोल खुपसलेली राहणार आणि ज्या जागतिक स्वातंत्र्याच्या व लोकशाहीच्या नावावर इंग्लंडने हे युध्द चालविले होते ते आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य व ती लोकशाही इंग्लंड हिंदुयस्थानला या मापाने मोजून देणार.

याच सुमारास घडलेली एक घटना मोठी सूचक होती.  युध्द संपल्यानंतर आपल्याला साम्राज्यांतर्गत स्वराज्य देण्यात येईल असे तूर्त नुसते आश्वासन आपल्याला मिळावे एवढीच छोटीशी मागणी ब्रह्मदेशाने केली होती.  प्रशांत (पॅसिफिक) महासागरात युध्दाला आरंभ होण्यापूर्वीची, पुष्कळ अगोदरची ही मागणी होती, व काहीही झाले तरी त्या मागणीमुळे युध्दकार्यात काही व्यत्यय येण्यासारखे नव्हते, कारण जे काही मिळावयाचे ते युध्द संपल्यानंतर मिळावे असे मागणे होते.  मागणे होते ते साम्राज्यांतर्गत स्वराज्य, पूर्ण स्वातंव्य नव्हे.  हिंदुस्थानाप्रमाणेच ब्रह्मदेशालाही वारंवार असे सांगितले जात होते की, ब्रिटिशांच्या धोरणाचे ध्येय साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे आहे.  हिंदुस्थानाहून ब्रह्मदेशाची अशी भिन्न स्थिती होती की, तेथील जनता हिंदुस्थानच्या मानाने बरीचशी जास्त एकजातीय होती, व त्यामुळे ब्रिटिशांनी हिंदुस्थानबाबत ज्या काही खर्‍याखोट्या अनेक अडचणी सांगितल्या होत्या त्याही तेथे सांगता येत नव्हत्या.  तरीसुध्दा ब्रह्मदेशातील सर्वांनी एकमताने केलेली ही मागणी ब्रिटिशांनी फोटाळून लावली, त्यांना तसे वचन देण्याचे नाकारले.  साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे भविष्यकाळात कधीतरी दूरवरच्या परलोकात मिळावयाचा जिन्नस; ती एक मोघम छायारूप नुसती तात्विकक कल्पना, व तीही कोठल्यातरी इहलोकावेगळ्या जगात, प्रस्तुतचे युग सोडून दुसर्‍या कोठल्यातरी युगात विचारात घ्यायची.  मि. चर्चिल यांनी दाखवून दिले त्याप्रमाणे हे साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे पोकळ शब्दावडंबर, नुसती शोभा; त्याचा प्रस्तुत काळाशी किंवा जवळच्या भविष्यकाळाशी काही संबंध नाही.  पण मग हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याच्या कामी ज्या अडचणी दाखवल्या जात होत्या, ज्या विचित्र अटी घालण्यात येत होत्या त्याही नुसत्या शब्दावडंबरच होत्या, त्यात काही अर्थ नाही, सत्य नाही हेही सगळे जाणूनच होते.  त्यातले अखेर सत्य एवढेच की, काही झाले तरी हिंदुस्थानवरही आपली पकड सोडावयाची नाही असा ब्रिटनचा निश्चय होता, व ती पकड आपण तोडून उठवणार असा हिंदुस्थानचा निश्चय होता.  बाकीचा सारा प्रकार म्हणजे निव्वळ चर्पटपंजरी, कायदेपंडितांचे पांडित्य, राजकारणी मुत्सद्दयांचा कावा.  या परस्परविरोधी मतांच्या झटापटीत अखेर काय होणार ते भविष्याच्या उदरात गुप्त होते. 

त्या भविष्यकाळाने लवकरच ब्रिटिशांच्या या धोरणाचे ब्रह्मदेशातले परिणाम काय ते दाखविले.  हिंदुस्थानातही हा भविष्याचा पट हळूहळू उलगडता उलगडता त्यातून कलह, कटूता, क्लेश एकसारखे बाहेर पडत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel