काही तत्त्वांपुरते गांधी पाषाणासारखे कितीही अचल असले तरी इतर लोकांशी, बदलत्या परिस्थितीशी जुळते घेण्याकरिता आपलेही काही सोडून देण्याची त्यांची पुष्कळ तयारी आहे असे दिसून आले आहे. इतर लोकांची, विशेषत: सामान्य जनतेची कुवत काय, त्यांचे मर्म कोणते, आपण जे सत्य मानतो त्या सत्याकरिता कोठवर जाण्याची त्यांची तयारी आहे हे हिशेबात घेऊन त्या मानाने आपल्या मतांना मुरड घालण्याची गांधींची खूपच तयारी दिसते. परंतु, जणू काय लोकाशी जुळते घेण्याच्या भरात आपण फारच वाहावलो आहोत या विचाराचे, मधूनमधून ते स्वत:ला एकदम आवरून पुन्हा पूर्वस्थळावर जाऊन आखडून बसतात. आंदोलनाची प्रत्यक्ष धुमश्चक्री चालू असेल तेव्हा जनतेशी त्यांची एकतानता झालेली दिसते, त्या जनतेची जी कुवत असेल त्या मानाने ते स्वत: चालतात, व म्हणूनच त्या वेळी काही अंशी ते स्वत:चे सोडून लोकांशी जुळते घेतात. परंतु इतर वेळी त्यांची तत्त्वनिष्ठा अधिक बळावते व ते मग आपले सोडून द्यायला तितकेसे तयार नसतात. ही त्यांची स्थित्यंतरे त्यांच्या लिखाणात व कार्यातही आढळतात. त्यामुळे गांधीजनांच्या मनात गोंधळ निर्माण होतो व त्याहीपेक्षा ज्यांना हिंदुस्थानातील ही पार्श्वभूमी अवगत नाही अशा इतरांना तर खूपच घोटाळा पडतो.
देशातील सार्या जनतेच्या ध्येयावर, सार्या जनमतावर एका व्यक्तीचा प्रभाव कितपत पडू शकेल हे सांगणे कठीण आहे. इतिहास पाहिला तर असे दिसते की, राष्ट्राची विचारसरणी, राष्ट्राचे ध्ये निश्चित करण्यात काही व्यक्तींना प्रभाव समर्थ ठरला आहे, परंतु कदाचित त्या बाबतीत असेही झाले असेल की, जनमनात अंतर्यामी जे अव्यक्त होते ते या व्यक्तींनी व्यक्त केले किंवा त्या युगात, त्या काळात, जे विचार मोघम, अस्पष्ट होते त्यांना स्पष्ट निश्चित भाषेचे रूप या व्यक्तींनी दिले. प्रस्तुत काळात हिंदुस्थानच्या जनमनावर गांधींचा प्रभाव उत्कट पडला आहे, तो पुढे किती काळ व कोणत्या स्वरूपात राहीला ते भविष्यकाळी निश्चित दिसेल. गांधींची मते ज्यांना मान्य आहेत व जे त्यांना आपल्या राष्ट्राचे नेते मानतात त्यांच्यापुरताच हा प्रभाव मर्यादित नसून ज्यांना गांधींची मते पटत नाहीत व जे त्यावर टीका करतात त्यांच्यापर्यंतही तो प्रभाव पोचला आहे. गांधींचे अहिंसातत्त्व किंवा त्यांचे आर्थिक सिध्दान्त सर्वस्वी ज्यांना पटलेले आहेत असे हिंदुस्थानात फारच थोडे, परंतु ह्या ना त्या प्रकाराने ज्यांच्यावर त्या तत्त्वाचा व सिध्दान्तांचा परिणाम झाला आहे असे लोक या देशात खूपच आहेत. दैनंदिन जीवनाच्या प्रश्नातच नव्हे, तर राजकीय प्रश्नातही आपली दृष्टी नैतिक असली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे व ते तो धार्मिक परिभाषेत मांडतात. गांधींच्या या परिभाषेचा परिणाम ज्यांचा धर्माकडे कल आहे त्यांच्यावर या धार्मिक पार्श्वभूमीमुळे विशेष झाला, परंतु त्यांच्या केवळ नैतिक दृष्टीच्या विचारसरणीचा परिणाम इतर लोकांवरही झाला आहे. गांधींच्या प्रभावाने ज्यांच्या प्रत्यक्ष कार्याची पातळी नीतीच्या व सदाचाराच्या बाबतीत पुष्कळ वर चढली असे अनेक आहेत. अनेकांना नीतीचा व सदाचाराचा निदान नुसता विचार तरी करणे भाग झाले आहे, असा विचार मनात येऊ लागला एवढ्यामुळे सुध्दा त्याचा परिणाम त्यांच्या कृत्यावर व वर्तनावर होऊ लागला आहे. राजकारण म्हणजे केवळ आपली सोय पाहणे व संधिसाधूपणा हा आजपावेतो बहुधा सर्वत्र चालत आलेला प्रकार बंध होऊन कसलीही योजना किंवा प्रत्यक्ष कार्य यांच्या अगोदर हा कर्माकर्मविवेक, हे नैतिक द्वंद्व सारखे सुरू राहते. आपल्या हिताचे, तत्काळ शक्य, व इष्ट कोणते हा विचार सोडून देणे कधीच शक्य नसते, पण इतरही विचार व दूरवरचे परिणाम लक्षात घेण्याची दूरदृष्टी यांचाही थोडाफार परिणाम होऊन केवळ स्वहिताची दृष्टी थोडीतरी सुटते.