सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचे हिंदुस्थानात आगमन

सिंगापूर व पेनांग जपानी सेनांच्या हाती पडून जपानी फौजा मलायात जसजशा पुढे चाल करीत चालल्या तसतसे तिकडच्या हिंदी व इतर परस्थ लोकांचे लोंढेच्या लोंढे तिकडून बाहेर पडले ते हिंदुस्थानात येऊन धडकले.  त्यांना एकाएकी घरेदारे सोडून पळावे लागल्यामुळे अंगावरच्या कपड्यांखेरीज त्यांच्याजवळ काहीच नव्हते.  त्यांच्या मागोमाग ब्रह्मदेशातून तसेच लक्षावधी लोक जीव घेऊन पळून आले.  त्यांतले बहुतेक हिंदीच होते.  ह्या सार्‍या निर्वासितांना तिकडच्या मुलकी कव इतर सरकारी अधिकार्‍यांनी आयत्या वेळी कसा दगा दिला त्यामुळे निराधार पडलेल्या या लोकांना ज्याला जे जमले त्या मार्गाने आपापली कशीबशी तरतूद कशी पाहावी लागली, याबद्दलच्या हकीकती कर्णोपकर्णी सार्‍या हिंदुस्थानभर पसरल्या.  त्यांना हिंदुस्थान गाळायला शेकडो मैल डोंगर-दर्‍यांतून रानावनांतून दरकूच दरमजल करीत हळूहळू प्रवास करावा लागला; त्यातच चोहोकडे वैरी पसरलेले, व त्यातून वाट चालता चालता कैक लोक कोणी दगाफटक्याने तर कोणी आजारी पडून व कोणी अन्नावाचून भुकेने मेले.  लढाई म्हटली की तिचा असा काही घोर परिणाम व्हायचा हे एक वेळ लोकांनी मानले असते, पण लढाई म्हटली तरी ह्या निर्वासितांत हिंदी व ब्रिटिश असा जो भेदभाव तिकडून निघताना दिसला तो कोणाला पटण्यासारखा नव्हता.  ब्रिटिश निर्वासितांची शक्य तेवढी सोय अधिकार्‍यांनी केली, ठिकठिकाणी वाहनांची व इतर मदतीची तरतूद त्यांच्याकरता होती.  ब्रह्मदेशात एक ठिकाण असे होते की तिकडून हिंदुस्थानात यायला निघालेले हजारो निवा्रसित तेथे जमले होते.  तेथून हिंदुस्थानकडे यायला त्या ठिकाणी दोन रास्ते होते त्यांपैकी त्यातल्या त्यात बरा रस्ता होता तो अधिकार्‍यांनी खास ब्रिटिश व युरोपियन लोकांकरता स्वतंत्र राखून ठेवला.  पुढे हा रस्ता पांढरा रस्ता या नावाने ओळखला जाऊ लागला.

काळी गोरे असा जो भेदभाव पाळला गेला या निर्वासितांचे जे हाल झाले त्याबद्दल अनेक भयानक हकीकीत कानांवर येऊ लागल्या.  ह्या सार्‍या हालअपेष्टांतून कसेबसे जीव बचावून आलेले जे उरलेसुरले निर्वासित हिंदुस्थानापर्यंत येऊन पोचले ते उपासमारीने खंगून गेले होते.  ते हिंदुस्थानात देशभर पसरले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या ह्या हकीकतीही जिकडे तिकडे पसरल्या व त्यामुळे लोकांच्या मनावर त्याचा जबरदस्त परिणाम झाला.

याच सुमारास ब्रिटिश सरकारच्या युध्दसमितीने केलेली हिंदुस्थानाबाबची योजना घेऊन काही जमत असले तर पाहावे म्हणून सर स्टॅफर्ड क्रिप्स इकडे आले.  या योजनेचा किसून काथ्याकूट गेल्या अडीच वर्षात झाला आहेच, त्याचे काय व्हायचे ते होऊन गेले आहे.  त्या योजनेसंबंधी ज्या वाटाघाटी चालल्या होत्या त्यांत प्रत्यक्ष स्वत: भाग घेतलेल्या माणसाने त्यातल्या तपशिलात आज शिरणे जरा अवघड आहे, कारण त्यात अशा काही गोष्टी आहेत की, त्या आज उजडात न आणता पुढे कधीतरी सांगणे अधिक बरे.  वस्तुत: त्यासंबंधी वादाचे प्रश्न व त्याबाबत झालेला विचार हे सारे आता प्रसिध्द झालेच आहे.

मला आठवते की, ही योजना जेव्हा मी प्रथम वाचून पाहिली तेव्हा मी फार खिन्न होऊन गेलो, त्याचे कारण मुख्यत्वे असे की परिस्थिती गंभीर, प्रसंग आणीबाणीचा व आलेला मनुष्यय सर स्टॅफर्ड क्रिप्स यामुळे माझी जी काही अपेक्षा होती त्या मानाने त्या योजनेत काही फारसे नव्हते.  त्या योजनेत जे काही देऊ केले होते ते जसजसे मी अधिक वाचून पाहू लागलो व त्यातून जे अनेक अर्थ परिणामी निघत होते त्यांचा विचार कनू लागलो तसतशी माझी खिन्नता वाढतच चालली.  हिंदुस्थान म्हणजे काय प्रकरण आहे याची ज्याला पुरी माहिती नाही अशा माणसाची, आमच्या मागणीपैकी पुष्कळसे या योजनेत देऊ केलेले आहे अशी कल्पना झाली असती तर, ते एकवेळ मला पटले असते.  पण पुरी माहिती असलेल्या मनुष्याने जर त्या योजनेची छाननी केली तर त्याला त्या योजनेत जागोजाग अडवणूक व अपार बंधने आढळली असती.  स्वयंनिर्णयाचे तत्त्व मान्य करतानासुध्दा त्या योजनेत त्या तत्त्वाला कोलदांडे व कुंपणे इतकी घालून ठेवली होती की, त्यापायी भविष्यकाळात आम्हाला धोका यावा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel