अक्षरांष्ट्रांशी चाललेल्या या युध्दात संयुक्त राष्ट्रांना आपल्याकडून शक्य तितके साहाय्य करण्याची हिंदुस्थान सरकारला मोठी तळमळ लागली होती हे खरे, पण हिंदुस्थान सरकारच्या दृष्टीने अक्षराष्ट्रांवर मिळवायचा विजय, त्याबरोबरच दुसरा एक विजय मिळाल्याखेरीज अपुरा राहणारा-त्या बाहेरच्या शत्रूच्या जोडीला ही राष्ट्रीय चळवळ आणि तिचे विशेष प्रतीत बनलेली काँग्रेस हा अंत:शत्रूही ठेचून काढलाच पाहिजे.  क्रिप्स वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा हिंदुस्थान सरकार मनोमनी अस्वस्थ झाले होते, ते त्या वाटाघाटी फिसकटल्यावर मोठे आनंदून गेले.  काँग्रेस व काँग्रेसच्या सारखी ज्या कोणाची मते असतील त्या सर्वांना एक अखेरचा तडाखा मारून भुईसपाट लोळविण्याला आता कोणी आडवे उरले नव्हते.  या मंगल कार्याला मुहूर्तही चांगला निघाला होता, कारण व्हॉइसरॉय व त्यांच्या हाताखालचे बडेबडे अधिकारी यांच्या हाती आजपर्यंत कधी काळी नव्हती इतकी अमर्याद सत्ता या सुमारास केंद्रित झाली होती.  चाललेल्या महायुध्दात तेव्हा मोठी कठीण वेळ आली होती, आणि अशा वेळी हिंदुस्थान सरकारला विरोध किंवा देशात काही गडबड होणे अनिष्ट, म्हणून कोणाचीही गय करू नये हे सयुक्तिक वाटण्याजोगे होते.  इंग्लंड व अमेरिका या देशांतून ज्या कोणाला हिंदुस्थानाचे काही सुखदु:ख होते ते सारे, क्रिप्स वाटाघाटी व त्यानंतर इंग्लंड-अमेरिकेत करण्यात आलेला प्रचार यामुळे थंडे पडले होते.  इंग्लंडमधील लोकांना हिंदुस्थानबाबत आपण किती न्याय्य रीतीने, किती योग्य प्रकारे, कसे चांगुलपणाने वागतो, अशी भावना नेहमीच असे ती आता ह्या प्रकाराने व प्रचाराने वाढली.  तेथे असे बोलले जाई की, गांधींच्या लेखावरून व भाषणावरून ते किती दुराराध्य आहेत हे स्पष्टच दिसते, तेव्हा हा सारा प्रकार थांबवायला उपाय उरला आहे तो एवढाच की हा गांधी आणि ही काँग्रेस यांना एकदा कायमचे ठेचून टाकले पाहिजे.

प्रचंड धामधूम व तिची दाबादाबी
तारीख ९ ऑगस्ट १९४२ रोजी मोठ्या पहाटेच हिंदुस्थानभर जिकडेतिकडे खूप लोकांना अटक करण्यात आली.  त्यानंतर काय घडले ?  त्याची त्रुटक, इकडची तिकडची किरकोळ वार्ता जेमतेम थेंबाथेंबांनी झिरपत कैक आठवड्यांची आमच्यापर्यंत येऊन पोचली, आणि देशभर जिकडे तिकडे जे काय घडले त्याचे आज घटकेला देखील आम्हाला काहीतरी अर्धवट चित्र कसेतरी काढणेच शक्य आहे.  ठिकठिकाणच्या मोठमोठ्या पुढार्‍यांना एकाच वेळी एकदम उचलून नेऊन लोकांच्या दृष्टीआड ठेवले होते, आणि आता पुढे काय करावयाचे ते कोणालाच माहीत नव्हते.  अर्थात याचा जनतेकडून निषेध होणे प्राप्तच होते व त्याप्रमाणे लोकांनी स्वयंस्फूर्तीने जागजागी निदर्शने केली.  त्याकरिता जमलेल्या लोकांचे जमाव सरकारने गोळीबार करून व अश्रुवायु वापरून उधळून लावले आणि लोकमताचे प्रदर्शन करण्याचे जनतेचे नेहमीचे साधे प्रकार बंद पाडले, आणि मग ह्या सार्‍या तुंबलेल्या भावनांचा आवेग उसळी मारून बाहेर पडला व शहरोशहरी, खेडोखेडी लोकांचे जमाव जमू लागले आणि त्यांचा सरकारचे पोलीस व लष्कर यांच्याशी संघर्ष होऊ लागला.  जनतेच्या दृष्टीला ब्रिटिश सत्तेच्या व सरकारच्या शक्तीच्या ज्या खुणा वाटल्या त्यावर या जमावांनी हल्ले केले, त्यांनी पोलिस ठाणी, पोस्ट कचेर्‍या व रेल्वेची स्टेशने यांची नासधूस चालवली, तारखात्याच्या व टेलिफोनच्या तारा तोडल्या.  पुढाकार घ्यायला कोणी पुढारी नाही व प्रतिकार करायला हातात शस्त्र नाही अशी स्थिती या जमावांची होती, पण सारकारी हिशेबाप्रमाणे या असल्या जमावांनी ५३८ प्रसंगी पोलिसांच्या व लष्कराच्या गोळीबाराला तोंड दिले, व काही ठिकाणी तर विमाने अगदी जमिनीजवळ चालवून ह्या जमावावर विमानातून मशिनगनचा भडिमार झाला.  देशभर नाना ठिकाणी हे दंगे सुमारे एक दोन महिने चालले होते, नंतर ते हळूहळू कमी होत जाऊन अखेर मधूनच कोठेतरी तुरळक दंगा होई अशी स्थिती आली.  ''हिंदुस्थान सरकारने आपले सारे बळ एकवटून हे दंगे चिरडून टाकले आहेत.''  असे विन्स्टन चर्चिल ह्यांनी हाऊस ऑफ कॉमन्स (लोकसभागृह) मध्ये सांगितले व पुढे त्यांनी ''शूर हिंदी पोलिसांचे इमान, त्यांचा कर्तव्य करण्याचा निश्चय व हिंदी अधिकारीवर्गाचे या प्रसंगी एकंदर वर्तन अत्यंत स्तुती करण्याजोगे झाले आहे.''  अशीही शाबासकी दिली. पुढे त्यांनी अशीही माहिती दिली की, ''आणखी खूप सैन्य हिंदुस्थानात पाठवले आहे, ब्रिटिशांचा त्या देशाशी संबंध आल्यापासून कधीही नव्हते इतके गोरे सैन्य हल्ली तेथे आहे.''  खरे आहे.  या गोर्‍या फौजांनी आणि हिंदी पोलिसांनी खेड्यापाड्यातल्या नि:शस्त्र शेतकर्‍यांविरूध्द मोठी लढाई कित्येक वेळा मारली, आणि त्यांचे बंड मोडून टाकले; आणि या कामी हस्ते परहस्ते, अधिकारीवर्ग म्हणजे ब्रिटिशा राज्याचा दुसरा मोठा आधारस्तंभ, याचेही मोठे साहाय्य झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel