हिंदुस्थानची व्यथा : दुष्काळ

हिंदुस्थानला फार मोठी व्यथा लागली होती ती देहाला तशीच मनोवृत्तीलाही जडली होती. महायुध्दाच्या कालात काही लोकांना अतोनात पैसा मिळाला, परंतु बाकीच्या लोकावरचे ओझे असे काही वाढले की, ते अगदी डबघाईला आले.  त्यांच्या भयानक स्थितीची साक्ष सारा बंगाल व देशातील दक्षिणेकडचे व पूर्वेकडचे सारे प्रदेश एवढ्या मोठ्या विस्तारावर पसरलेल्या भीषण दुष्काळाच्या रूपाने येऊ लागली. ब्रिटिश राजसत्तेच्या १७० वर्षांच्या राजवटीत एवढा मोठा, इतका भयंकर दुष्काळ कधी पडला नव्हता, त्या राजसत्तेच्या आरंभालाच नव्या राजवटीच्या तत्काळ परिणाम म्हणून इसवी सन १७६६ ते १७७० पर्यंत बंगाल व बिहारमध्ये जे भयानक दुष्काळ पडले त्यांच्याशी काय ती या नव्या दुष्काळाची तुलना थोडीफार होऊ शकेल.  दुष्काळाच्या पाठोपाठ त्या प्रदेशात साथीचे रोग, विशेषत: पटकी व हिवताप आला आणि ते रोग तेथून दुसर्‍या प्रांतातून असे काही पसरत गेले की हल्ली सुध्दा त्यांच्यापायी हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.  आतापर्यंत लाखो लोकांचे बळी ह्या दुष्काळाने व साथीच्या रोगांनी घेतलेच आहेत, आणि अजूनही ही भुते हिंदुस्थानवर घिरट्या घालीत आहेत, अद्यापही दुष्काळ व या रोगांपायी अनेकांना मृत्यू येतो आहे.*
--------------------------
*    सन १९४३-४४ च्या दुष्काळामुळे बंगालमध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची एकूण संख्या किती भरेल याबद्दल जी निरनिराळी अनुमाने करण्यात आली आहेत त्यांत भेद पुष्कळच आहे.  मानवजातीची विविध प्रकारे माहिती मिळवून त्यावरून मानवजातीसंबंधी सांगोपांग ज्ञान शास्त्रीय पध्दतीने प्रस्थापित करण्याचे जे मानुष्यक शास्त्र त्याचा अभ्यास करण्याकरिता कलकत्ता विद्यापीठात एक शाखा आहे.  ह्या शाखेने हा दुष्काळ ज्या प्रदेशात पडला होता तेथील काही गट नमुने म्हणून निवडून त्यांची शास्त्रीय पध्दतीने सांगोपांग पाहणी केली आहे.  बंगालमध्ये दुष्काळामुळे झालेली मृत्युसंख्या अजमासे चौतीस लक्ष होते असे त्या पाहणीवरून त्या शाखेच्या मताने ठरते.  ह्या पाहणीवरून असेही दिसून आले की, सन १९४३ व १९४४ ह्या दोन वर्षात बंगालमधील लोकसंख्येपैकी शेकडा ४६ टक्के लोक ज्यांना गंभीर स्वरूपाचा रोग म्हणता येईल अशा रोगांनी व्याधिग्रस्त होते.  गावोगावच्या पाटील पटवार्‍यांनी पुरवलेल्या माहितीवरून मुख्यत: टरविलेला दुष्काळी मृत्युसंख्येचा बंगाल सरकारचा अंदाजी आकडा ह्यापेक्षा खूपच कमी आहे.  सरकारने सर जॉन वुडहेड यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ चौकशी समिती नेमली होती.  या समितीने असे ठरविले आहे की, ''प्रत्यक्ष दुष्काळात अन्न नाही म्हणून किंवा त्या दुष्काळानंतर आलेल्या साथीच्या रोगामुळे'' सुमारे पंधरा लक्ष लोकांना मृत्यू आला.  हे वर दिलेले सर्व आकडे नुसते बंगालपुरते आहेत, परंतु हिंदुस्थानातील इतर प्रांतांतूनही प्रत्यक्ष दुष्काळामुळे किंवा त्यानंतर आलेल्या साथीच्या रोगांमुळे पुष्कळ हानी झाली आहे.

आर्थिक दृष्ट्या भरभराट झालेल्या मूटभर वरच्या लोकांमुळे वरवर दिसायला समाजावर जो भरभराटीचा पापुद्रा आलेला होता त्याच्याखाली असलेल्या समाजाच्या वस्तुस्थितीचे दर्शन अतक्या पिढ्या ब्रिटिश राज्याखाली काढून कंगाल, हीनदीन, जराजर्जर झालेल्या हिंदी जनतेचे चित्रा या दुष्काळामुळे सर्वांच्या डोळ्यांसमोर उघडे उभे राहिले.  ब्रिटिशांनी हिंदुस्थानवर राज्य चालविले त्याचा परिपाक हा, राज्याचे सार्थक केले ते हे.  आणि हा दुष्काळ आला तो काही भौतिक आपत्तीमुळे, निसर्गाच्या पाण्यापावसाच्या छंदीलहरीमुळे नव्हे किंवा युध्दामुळे प्रदेश उद्ध्वस्त होऊन किंवा शत्रूने वेढा दिल्यामुळेही नव्हे.  त्या दुष्काळाच्या कारणाबद्दल मत द्यायला पात्र म्हणून जे जे कोणी होते त्या सर्वांचे एकमतहे की, हा दुष्काळ मनुष्यनिर्मित होता, त्याची कल्पना आगाऊ येण्यासारखी होती व तो टाळता येणे शक्य होते; शिवाय सर्वांचे आणखी एकमत या मुद्दयावर की, याबाबतीत काही करण्याचा ज्यांना काही अधिकार होता तो सारे अधिकारी कमालीच्या बेपर्वाईने वागले, ते अगदी नालायक होते, ते खुशाल उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहात स्वस्थ राहिले.  शेवटी अगदी कहर उडून भुकेपायी मेलेले हजारो लोक रोजच्या रोज भररस्त्यावर पडलेले अशी स्थिती आली तरी अखेरच्या घटकेपर्यंत सरकार म्हणतच राहिले की दुष्काळ नाही.  वर्तमानपत्रांतून दुष्काळाचा काही उल्लेख होता कामा नये असे सक्त वार्तानियंत्रण सुरूच होते.  उपासमारीने खंगलेल्या, व मरणाच्या दारी पडलेल्या बायकामुलांची भयानक प्रेतकळा आलेली खुद्द कलकत्ता शहराच्या रस्त्यावरची चित्रे कलकत्त्याच्या स्टेटसमन पत्राने प्रसिध्द केली तेव्हा मध्यवर्ती कायदेमंडळात सरकारतर्फे बोलणार्‍या एका सरकारी प्रवक्त्यांनी अशी तक्रार केली की, परिस्थिती साधून वर्तमानपत्रांनी हे असे नाटक करणे योग्य नाही.  खरे आहे, कारण या अधिकार्‍यांचे मत असे असावे की, उपासमारीने रोज हजारो लोक मरणे ही हिंदुस्थानात नित्याचीच गोष्ट, नवल म्हणून तिचा एवढा गाजावाजा करण्याचे कारण नाही.  दुष्काळाच्या वार्ता खोट्या आहेत अशी विधाने व त्याबाबतीत वक्तव्ये करण्यात लंडनमधील हिंदुस्थान कचेरी (इंडिया ऑफिस) चे प्रमुख मि.अमेरी ह्यांनी अग्रमान घेतला होता.  हा अक्राळविक्राळ पसरलेला दुष्काळ अस्तित्वातच नाही असे म्हणणे किंवा तो झाकून दृष्टीआड करणे जेव्हा अशक्य होऊन बसले, तेव्हा मात्र अधिकार्‍यांचे गट त्याचे खापर एकमेकावर फोडू लागले.  हिंदुस्थान सरकार म्हणू लागले की, हा दोष सारा प्रांतिक सरकारकडे, आणि ते प्रांतिक सरकार पाहावे तर सारा कळसुत्री बाहुल्यांचा कारभार तेथला मुख्य गव्हर्नर व त्याच्या हाताखाली सारी राज्यव्यवस्था सरकारी सनदी नोकरां (सिव्हिल सर्व्हिस) पैकी नेमलेल्या अधिकार्‍यांकडे, वस्तुत: दोष होता सर्वांचाच आणि विशेषत: हुकुमशाही राज्यपध्दतीचा. ह्या राज्यपध्दतीचे प्रमुख प्रतिनिधी स्वत: व्हॉइसरॉयच होते.  त्यांना सबंध हिंदुस्थानात वाटेल ते करण्याचा अधिकार होता.  लोकशाही किंवा तत्सम राज्यपध्दती चालू असलेल्या कोठल्याही देशावर अशी आपत्ती आली असती तर तिच्यापायी सार्‍या संबंधी अधिकार्‍यांना एकजात झाडून काढून फेकून देण्यात आले असते.  पण हिंदुस्थानात तर्‍हा काही औरच होती, जणू काही घडलेच नाही असे सर्व काही पूर्ववत चालले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel