हिंदुस्थान म्हणजे परस्परविरोधी गोष्टी एकाच ठिकाणी असलेला एक मासलेवाईक देश असे नेहमी म्हटले जाते. तेथे काही लोक अत्यंत श्रीमंत तर बहुतेक सारे बाकीचे अत्यंत दरिद्री, काही अद्ययावत् आधुनिक तर काही मध्ययुगीन सनातनी, सत्ताधीश राजांची लत्ताधीश प्रजा, ब्रिटिशांसमोर हिंदी, अशा जोड्या पाहायला सापडतात. पण सन १९४३ च्या शेवटच्या सहा महिन्यांत या दुष्काळाच्या काळात कलकत्ता शहरात हा विरोध जितका भडक दिसला तितका पूर्वी कधीही नव्हता. समाजाचे हे दोन भाग साधारणपणे नेहमी एकमेकापासून अगदी अलग, प्रत्येकाचे जगच वेगळे, एकाची दुसर्याला काही वार्ता नाही असा प्रकार, पण या दुष्काळामुळे एकाएकी असा प्रसंग आला की, या दोन परस्परविरोधी जगांची प्रत्यक्ष देहरूपाने गाठ पडली व एकाच ठिकाणी एकाच वेळी या दोन्ही जगांचे अस्तित्व चालू लागले. तो विरोध लक्षात आला की पाहणाराला धक्काच बसे, पण त्याहीपेक्षा अचंबा वाटे तो हा प्रकार पाहून भयचकित न होणारे, हा विचित्र विरोध लक्षातसुध्दा न येणारे, आपल्या नेहमीच्या जीवनाच्या चाकोरीतून नेहमीप्रमाणे वावरणारे अनेक लोक पाहून वाटे. मनोमनी त्यांना काय वाटत असेल ते सांगणे शक्य नाही, पण त्यांची परीक्षा ते वागत होते कसे त्यावरून करता येणे शक्य आहे. हे असे जे लोक होते त्यांपैकी जे इंग्रज होते त्यांना ह्या प्रकाराचे मनाला फारसे वाटून न घेणे सोपे गेले असेल कारण त्यांचे जीवन बाकीच्या जनतेपासून अगदी अलग पडे आणि त्यांनी आपली स्वत:ची जशी काही एक वेगळी जात करून ठेवलेली असल्याने, काही व्यक्तींच्या मनात नित्याच्या क्रमात काही बदल करावा असे ये असले तरी, त्यांना आपला नित्याचा क्रम पालटता आला नसेल, पण हिंदी लोकांपैकी काहींनी आपला नित्यक्रम जसाच्या तसा चालवला त्यावरून त्यांच्यात व त्यांच्या ह्या दुष्काळग्रस्त देशबांधवांत केवढे मोठे अंतर पडले होते व काही माणुसकी किंवा औचित्याचे विचार मनात येऊन हे अंतर तुटण्यासारखे कसे नव्हते याचे प्रत्यंतर आले.
कोणतेही मोठे संकट ओढवून माणसावर निकराचा प्रसंग येऊन बेतला की, त्यामुळे त्याच्या अंगातले गुण व दोष दोन्हीही आपोआप बाहेर पडतात, तोच प्रकार या दुष्काळाच्या निमित्ताने हिंदी लोकांचा होऊन त्यांचे गुणावगुण उघड झाले. त्यांच्यापैकी खूपच लोक व त्यातच महत्त्वाची पुढारी मंडळी तुरूंगात पडली होती व त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे शक्य नव्हते. असे असूनही दुष्काळपीडितांना साहाय्य करण्याकरिता सरकारच्या मदतीवाचून खाजगी रीतीने चालवलेल्या कार्यांलयातून काम करण्याकरिता समाजाच्या सर्व वर्गांतले अनेक पुरुष व स्त्रिया पुढे सरसावून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपले काम उत्तम प्रकारे कष्ट करून स्वार्थाचा विचारही मनात येऊ न देता एकमेकांशी सहकार्य करण्याच्या वृत्तीने चालविले. परंतु त्या प्रसंगाच्या निमित्ताने हिंदी लोकांचे अवगुणही दिसून आले. काही काही मंडळी वैयक्तिक स्पर्धेच्या व मत्सराच्या विचारांनी अशी भारली होती की, त्यांना एकमेकांशी सहाकार्य करता आले नाही, काहींजण काही एक न करता स्वस्थ राहिले. त्यांनी कसलेही काम करून कोणालाही मदत केली नाही, आणि काही असेही निघाले की, ज्यांना हिंदुस्थान देशाबद्दल आपलेपणा किंवा साध्या माणुसकीची सुध्दा जाणीव नसल्यामुळे, चाललेल्या दुष्काळाच्या कहराचे त्यांना काहीच वाटत नव्हते.
हा दुष्काळ आला तो महायुध्दाच्या परिस्थितीमुळे व ज्यांच्या हाती राज्याचा अधिकार त्यांच्या निष्काळजीपणामुळे व पुढे काय होणार ते अगोदरच तर्काने जाणून त्याकरिता आगाऊ तरतूद करून ठेवण्याला जी अक्कल पाहिजे ती या राज्यकर्त्यांना मुळीच नसल्यामुळेच आला. सामान्य बुध्दीच्या कोणाही माणसाने थोडाफार विचार केला तर देशात अन्न-पुरवठ्याबाबत असा काहीतरी बिकट प्रसंग येतो आहे हे त्या वेळी कळत होते, असे असूनही ह्या अधिकार्यांनी त्या प्रश्नाकडे डोळेझाक कशी केली हे काही समजत नाही. युध्दाच्या आरंभीच्या काही वर्षांतच ही अन्नपुरवठ्याची बाब व्यवस्थितपणे सरकारने हाती घेतली असती तर हा दुष्काळ टाळता आला असता. युध्दात सापडलेल्या बाकीच्या देशांपैकी प्रत्येक देशाच्या राज्यकर्त्यांनी युध्दाकरिता कराव्या लागणार्या काटकसरीच्या व्यवस्थेतील एक अत्यंत महत्वाचे अंग या दृष्टीने या अन्नव्यवस्थेकडे प्रत्यक्ष युध्द सुरू होण्यापूर्वीपासूनच विशेष लक्ष ठेवले होते.