धर्मशास्त्राची विचारपध्दती विज्ञानशास्त्रपध्दतीहून अगदी वेगळी आहे. धर्मशास्त्रातील मुख्य विषयाचा शोध व बोध केवळ वस्तुनिष्ठ चर्चा करून होण्यासारखा नसल्यामुळे त्या शास्त्राचा भर भावनेवर व प्रमाणनिरपेक्ष अंत:स्फूर्तीवर आहे. आणि विचारांना असे हे वळण लागल्यामुळे धर्मशास्त्रांनी हीच विचारपध्दती जीवनाच्या प्रत्येक बाबतीत, केवळ बुध्दिप्रमाण चर्चेच्या व निरीक्षणाने निश्चित करता येण्याजोग्या बाबतीतही चालविली आहे. कर्मकांडाची सांगोपांग व्यवस्था ठरवून दिलेल्या धर्मसंप्रदायांच्या जोडीला; ईश्वरविषयक मानवी कर्तव्यांचे विवेचन करणारे शास्त्र येऊन बसले आहे. आणि या जोडीला अध्यात्म विषयापेक्षा आपले पूर्वापारचे प्रस्थापित हितसंबंध अधिक जवळचे वाटत असल्यामुळे, त्यांच्यावर श्रध्दा ठेवणार्यांची वृत्ती अशी काही होते की, विज्ञानशास्त्राने अंगी येणार्या वृत्तीच्या ती नेमकी उलट दिशेला असते. अशी सांप्रदायिक वृत्तीत संकुचित दृष्टी, हेकटपणा, वेडगळ समजुती, भोळसट श्रध्दा, भावनाविवशता, आणि साधकबाधक प्रमाणे न पाहता बुध्दिविरुध्द वागण्याच्या तर्हेवाईकपणा येतो. त्यामुळे मनुष्याच्या मनाचा विकास थांबून ते कोते बनते, आणि मनोवृत्ती एखाद्या आश्रितासारखी किंवा गुलामाची होत जाते.
व्हॉल्टेअरने म्हटले आहे की जगात ईश्वर म्हणून खरोखर पाहता नाही असे जरी ठरले तरी निदान तसा ईश्वर कल्पनेने निर्माण करणे भाग पडेल. हे त्याचे म्हणणे कदाचित बरोबरही असेल, आणि तसे पाहू गेले तर असे आढळले की, ईश्वर म्हणून काही एका मनोमन मूर्तीला, एका कल्पनेला, घाट देण्याची धडपड मानवी मन सतत करीत आले आहे, आणि मनाचा जसजसा विकास होत गेला तसा त्याबरोबरच त्या मूर्तीला, त्या कल्पनेला घाट येत गेला. पण या विचारसरणीविरुध्द जे काही आक्षेप घेण्यात येतात त्यांतही काही तथ्य आहे. आक्षेपकांचे म्हणणे असे की, देव आहे असे मानले तरी प्रत्येक गोष्टीत त्याच्या आज्ञेची वाट पाहात बसणे, त्याच्यावर भार टाकणे हेही कदाचित आपल्या हिताचे होणार नाही. निसर्गातील दैवी शक्तीवर उठल्यासुटल्या विसंबून राहात गेले तर मनुष्याचा स्वत:च्या शक्तीवरचा भरवसा कमी होत जातो. माणसाची कार्यक्षमता व निर्माणशक्ती मंदावते. ह्या आक्षेपात काही तथ्य असले तरी विचाराअंती मनाला असे वाटते की, या आपल्या जडसृष्टीच्या पलीकडच्या अध्यात्म विषयाच्या क्षेत्रात भक्तीची थोडीफार तरी आवश्यकता आहे. नैतिक, आध्यात्मिक, ध्येयात्मक कल्पनांवर थोडाफार तरी भरवसा ठेवला पाहिजे, नाहीतर मानवी जीवनाची ही नौका नांगर टाकून सुरक्षित ठेवायला भरवशाचे आश्रयस्थान, प्रवासाअंती पोचण्याची काही निश्चित ठिकाणे, अशी काहीच राहणार नाही, मानवाला जीवनहेतूच उरणार नाही. देवावर कोणाची श्रध्दा असो वा नसो, पण कशावरच माणसाची श्रध्दा नाही असे होणे अशक्य आहे, पण त्या श्रध्दास्थानाला त्याने नाव काय वाटेल ते दिलेले असो. ह्या पार्थिव सृष्टीच्याच अंगी अंतर्भूत असलेली, तिला चलनवलन, स्थितिपालट, स्वयंविकास करण्याचे सामर्थ्य देणारी शक्ती, हे आमचे श्रध्दास्थान आहे असे कोणी म्हणतील, तर कोणी म्हणतील की चराचर सृष्टीत चैतन्य खेळविणारी निर्माणशक्ती आमचे श्रध्दास्थान आहे, कोणी आणखी दुसरे काही सांगतील. पण धरायला गेले तर हाती सापडत नसले तरी ते आहे हे सत्य आहे असे प्रत्येकाला पटणारे, अचेतनतेशी ताडून पाहिली तर भिन्न म्हणून सचेतनता जशी सत्य म्हणून पटते तसे खरे म्हणून पटणारे, असे श्रध्देचे काहीतरी विषय प्रत्येक मनुष्याचे असणारच. आपणांपैकी बहुतेकजण, जाणूनबुजून म्हणा, किंवा स्वत:चे स्वत:ला नकळत म्हणा, कोठल्याना कोठल्या अज्ञात देवाच्या, कोणत्यातरी वैयक्तिक किंवा राष्ट्रीय किंवा जागतिक ध्येयाच्या, अद्दश्य देवळात जाऊन त्या देवाची त्या ध्येयाची पूजा करीत असतो, तेथे आपल्या त्यागाचा नैवेद्य अर्पण करीत असतो, साक्षात्कार घडावा म्हणून मनाने ठरवलेले हे साध्य कितीही दूरवरचे असले, व बुध्दीला त्यात फारसे तथ्य वाटत नसले, तरी त्याचा ध्यास घेऊन आपण चालतच असतो; मानवाला पूर्णत्व यावे, जग उत्तरोत्तर चांगले होत जावे अशा काही मोघम, अस्पष्ट कल्पनांची पूजाअर्चा चालतेच. पूर्णत्व हे कदाचित असाध्यही असेल, पण अंगात आलेला हा संचार, कोठलीतरी चैतन्यशक्ती, सारखे पुढे जात राहण्याची निकड आपल्यामागे लावते, व म्हणून मानवांच्या पिढ्यामागून पिढ्या त्या पूर्णत्वाकडे जाण्याची वाट तुडवीत राहतात.
ज्ञानाची जितकी प्रगती होते त्या मानाने धर्माचा (म्हणजे त्या शब्दाच्या संकुचित अर्थाने तो शब्द वापरला तर त्या अर्थाने धर्माचा) व्याप कमी होत जातो. जीवन व निसर्ग यांचे जितके अधिकाधिक ज्ञान होत जाते तितकी प्रत्येक गोष्टीत निसर्गातीत दैवी कारणे शोधात बसण्याची प्रवृत्ती कमी होते. जी जी गोष्ट आपल्याला नीट समजते, जिची किल्ली आपल्या हातात आलेली असते, ती काही गूढ म्हणून राहात नाही. शेतीची जमीन तयार करून तिच्यातून पीक काढण्याकरिता वेळोवेळी कराव्या लागणार्या कामांचा कार्यक्रम आपण खावयाचे अन्न, आपण वापरायची वस्त्रे, आपले परस्परांशी असावयाचे सामाजिक संबंध, या सार्या गोष्टींत एकेकाळी धर्मसंप्रदायांचा व त्यांतील आचार्यांचा अधिकार चालत असे. आता तो अधिकार गेला आहे. आता ह्या गोष्टी विज्ञानशास्त्रातील अभ्यासाचे विषय झाल्या आहेत. तरी अद्यापसुध्दा यांतील बर्याच गोष्टींवर त्यांच्याशी जोडून दिलेल्या भोळसट धर्मसमजुती व शकुन, मुहूर्त वगैरे लोकश्रम यांचा खूपच पगडा आहे. सृष्टीतील अंतिम गूढ गोष्टी अद्यापही मानवी आटोक्याबाहेरच राहिल्या आहेत, आणि त्या तशाच गूढ राहण्याचाही संभव आहे. पण ती अंतिम सोडून बाकीच्या कितीतरी गूढ वाटणार्या गोष्टींचा अर्थ लागण्यासारखा आहे, परंतु तो अद्याप लावावयाचा राहिला आहे.