देशाची प्रगती होण्याच्या मार्गावर फक्त दोनच प्रमुख अडचणी येण्याचा संभव दिसतो. पहिली अडचण अशी की, देशाबाहेरच्या जगात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी होऊन त्यांचे दडपण हिंदुस्थानवर येईल, व दुसरी अडचण अशी की, देशातल्या देशातच पुढचे साध्य काय असावे याबद्दल एकमत होणार नाही. त्यातल्या त्यात विशेष महत्त्व देशातील विविध राजकीय पक्षांची वेगवेगळी साध्ये असणे याच अडचणीला अखेर येईल. हिंदुस्थानची फाळणी होऊन त्याचे अखेर दोन किंवा अधिक भाग करण्यात आले तर सबंध देश मिळून एक राजकीय व आर्थिक घटक या भूमिकेवरून देशाचे कार्य चालणारे नाही, आणि देशाची प्रगती त्यामुळे फार मंदावेल. देशाची फाळणी करण्याचा प्रत्यक्ष परिणाम देशाच्या शक्तीचा क्षय होईल हा तर आहेच, पण त्याहीपेक्षा वाईट परिणाम असा की, फाळणी रद्द करून देश एक अखंड करावा अशी आकांक्षा असलेले, व त्यांचे विरोधी यांच्यामध्ये अंतर्यामीच्या विरूध्द मन:प्रवृत्तींचा संघर्ष येईल. नवे नवे हितसंबंध वेगवेगळ्या भागांत निर्माण होऊन ते मूळ धरतील व पक्के होत जातील, व असलेल्या परिस्थितीत काही पालट करायला किंवा प्रगती करायला त्यांचा विरोध होत राहील. याप्रमाणे एक नवे संकट येऊन त्या रूपाने देशापुढे देशाचे कर्म उभे राहील, आणि भविष्यकाळात ते सारखे या देशाचा पिच्छा पुरवीत राहील. एक पाऊल चुकले की त्याच्यापुढचे दुसरे हुकते. आतापर्यंत हेच होत आले आहे आणि कदाचित पुढेही हेच होत राहील. पण विचार करून पाहिले तर असे दिसते की, केव्हा केव्हा सरळ वाट सोडून वाकडे पाऊल टाकणेही भाग होते, ते अशाकरिता, की तसे केले नाही तर याहीपेक्षा एखादे अधिक वाईट संकट आपल्यावर येण्याचा संभव टाळावा. अखेर पुढे जे काय व्हायचे ते होऊन गेल्यावर, आज आपण आपल्या सुरक्षिततेकरिता आडवाटेला लागलो तर ते बरे झाले असे ठरले, हे कोणाही मनुष्याला आज निश्चित सांगता येणे अशक्य आहे. हाच राजकीय क्षेत्रातला मोठा विपरीत विरोधाभास आहे. बेकीपेक्षा एकी अर्थातच चांगली, पण ती सक्तीने लादली गेली तर ते केवळ ढोंग आहे, त्यात मोठा धोका आहे, केव्हा भडका उडेल त्याला नेम नाही. एकी सर्वतोपरी, अगदी मनापासून असली पाहिजे, आपण एकमेकांचे आहोत, आपल्या एकीवर जर कोणी हल्ला करू लागले तर दोघांनी मिळून त्याचा प्रतिकार केला पाहिजे ही भावना त्या एकीत असली पाहिजे. माझी स्वत:ची अशी पक्की खात्री झाली आहे की ही अशी मूलभूत एकी हिंदुस्थानात आहे, परंतु इतर काही प्रेरणांचे आवरण त्या एकीवर येऊन ती काही अंशी झाकली गेली आहे. या प्रेरणा कदाचित तात्पुरता व कृत्रिमही असतील, त्या कदाचित नाहीशा होतीलही, पण निदान आजच्यापुरते तरी त्यांना महत्त्व आहे, आणि त्यांच्याकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही.
अर्थात हा दोष आमचा आहे, आणि त्यापायी जे काय भोग उभे राहतील ते आम्ही सोसले पाहिजेत. पण हिंदुस्थानात दुही निर्माण करण्यात ब्रिटिश सत्ताधिकार्यांनी जो मुद्दाम योजून भाग घेतला तो दृष्टीआड करणे व त्याबद्दल त्यांना क्षमा करणे मला अशक्य आहे. ब्रिटिशांनी केलेले इतर अपकार कालांतराने नाहीसे होतील, पण त्यानंतरही कितीतरी दीर्घकालपर्यंत ही दुही आम्हाला छळीत राहील. हिंदुस्थानविषयी मी विचार करू लागलो म्हणजे अनेक वेळा चीन व आयर्लंड हे देश मला आठवतात. अर्थात त्यांच्या भूतकाळातल्या व हल्लीच्या अडचणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, आणि हिंदुस्थानात त्या अडचणी आणखी काही वेगळ्याच आढळतात, पण त्यात साम्यही बरेच आढळते. चीन व आयर्लंडला जो मार्ग पत्करावा लागला तोच पत्करणे हिंदुस्थानलाही भाग पडेल की काय ?
जिम फेलान नावाच्या एका ग्रंथकर्त्याने 'जेलयात्रा' या पुस्तकात बंदिवासाचा मानवी स्वभावावर काय परिणाम होतो त्याचे वर्णन केले आहे, आणि दीर्घकाल बंदिवासात काढलेल्या कोणाही माणसाला ते अगदी पटण्याजोगे आहे. ''तुरुंग म्हणजे माणसाच्या स्वभोवातल्या अगदी बारीकसारीक खाचाखोचा दृष्टोत्पत्तीला आणणारे एक सूक्ष्मदर्शक यंत्रच ठरतो. त्याच्या स्वभावातले एकून एक सूक्ष्म दोष स्पष्ट दिसायला लागून ते विशेष मोठे वाटून, पाहणार्याच्या डोळ्यात भरतात ते इतके की अखेर काही दोष असलेला कैदी असे त्याचे स्वरूप न राहता कैद्याचे कपडे चढविलेला मूर्तिमंत दोष असे त्याचे स्वरूप, पाहणाराला दिसू लागते.'' परकीय राजवटीच्या बंदिवासात पडलेल्या देशाच्या राष्ट्रीयत्वाच्या स्वरूपासंबंधी असाच काहीसा चमत्कार घडतो.