मला स्वत:ला असे वाटते की, ही भावना कृत्रिम आहे, ती कृत्रिमपणे निर्माण करण्यात आली आहे. एतद्देशीय मुसलमान जनतेच्या मनात तिने मूळ धरलेले नाही. पण एखादी तात्पुरती भावनासुध्दा इतकी उत्कट असू शकते की, तिच्यामुळे त्या वेळी घडणार्या गोष्टीवर तिची छाया पडते व त्यामुळे काही एक नवीच परिस्थिती निर्माण होते. सामान्यत: व्यवहारात असे घडते की, उभयपक्षी काही देवाणघेवाण करून नवी घडी बसविली जाते, पण हिंदुस्थानावरील सत्ता सर्वस्वी परक्यांच्या हाती आहे ही गोष्ट या बाबतीत काही विशेषच असल्यामुळे त्यात मधेच काय निघेल त्याचा काही नेम नाही. वाद मिटवण्याकरिता खरीखरी तडजोड करायची झाली तर त्या तडजोडीने सगळ्यांचे भले व्हावे अशी बुध्दी मुळात पाहिजे, व सर्वांचे एकच साध्य धरून त्याकरिता सर्वांनी एकमेकांशी सहकार्य करावे अशी इच्छा मनात पाहिजे. मग व्यवहार मर्यादा पाळून त्या कामाकरिता कोणी आपले काही सोडले, तर तो त्याचा त्याग महाग पडत नाही. जनतेतल्या प्रत्येक लोकसमूहाला तत्त्व म्हणून व प्रत्यक्षातही स्वातंत्र्य व समानसंधी असलीच पाहिजे, पण शिवाय त्या स्वातंत्र्याची व समानसंधीची जाणीवही त्यांच्या मनात राहिली पाहिजे. भलत्या विकाराच्या किंवा अविवेकी भावनांच्या आहारी गेले नाही तर असले स्वातंत्र्य व समानसंधी सर्वाना मिळेल अशी व्यवस्था करणे व त्याबरोबरच देशातील विविध प्रांतांना व संस्थानांना संपूर्ण स्वायत्तता देऊनही त्यांना एकत्र ठेवणारे काही एक मध्यवर्ती बलिष्ठ बंधन निर्माण करणे कठीण नाही. सोव्हिएट रशियामध्ये केले आहे त्याप्रमाणे मोठमोठ्या प्रांतांत व संस्थानांत असले वेगवेगळे स्वायत्त घटकही असू शकतील. इतकी सारी व्यवस्था करून त्याशिवाय आणखी तरतूद म्हणून संबंध देशाच्या राज्यघटनेतच अल्पसंख्याकांना संरक्षण व त्यांच्यावर काही अन्याय होऊ नये अशी हमी देण्याकरिता कल्पना चालवून शक्य तितके निर्बंधही घालता येतील.
हे सारे करता येण्यासारखे आहे खरे. पण या प्रश्नात आणखी कोणकोणती कारणे निघतील, कोणते बलाबल, विशेषत: ब्रिटिशांचे धोरण कोणते व कितपत प्रभावी ठरेल हे अनिश्चित असल्यामुळे, भविष्यकाळाचे रूप मला तूर्त कळत नाही. कदाचित असेही होईल की, एकमेकापासून अलग झालेल्या विभागांना जोडणारे एखादे अगदी बारीकसे बंधन काय ते ठेवून देशाचे सक्तीने तुकडे पाडण्यात येतील. अशी काही एक फाळणी झाली तरी देश एक असल्याबद्दलची लोकांतील मूलभूत भावना व सार्या जगावर परिणाम घडविणार्या जागतिक घटना यामुळे पुढच्या काळात देशाचे हे पडलेले विभाग मनाने एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येतील व अशा तर्हेने त्यांच्यात खरी एकी उत्पन्न होईल, असे मला निश्चित वाटते.
खरोखर पाहिले तर प्रादेशिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा कोणत्याही दृष्टीने तशी एकी आहेच, आणि अशी एकी राहायला सर्वात प्रभावी कारण म्हणजे जागतिक घटनांचा ओघच त्या एकीला अनुकूल आहे. सबंध हिंदुस्थान मिळून मूलत: एकच राष्ट्र आहे असे आमच्यापैकी अनेकांना वाटते, पण मि. जीना यांनी आपला एक व्दिराष्ट्र सिध्दान्त काढला आहे; आणि त्या सिध्दान्तात व राजकारणातील भाषासंपत्तीत भर घालून ते अलीकडे देशातील काही समूहांना त्यांच्यातले धर्मभेदाच्या आधाराने उपराष्ट्रे म्हणूही लागले आहेत, मग ह्या नव्या संज्ञेच्या अर्थ, ही उपराष्ट्रे काय असतील ती असोत. मि. जिनांच्या मते धर्म व राष्ट्रीयत्व हे समानार्थी शब्द आहेत. धर्म म्हणजेच राष्ट्रीयत्व. पण हल्लीच्या युगात त्या प्रश्नाचा विचार करताना सर्वसामान्यपणे ही दृष्टी कोणी ठेवीत नाहीत. पण हिंदुस्थानचे वर्णन करताना त्या देशाला एकराष्ट्रीय म्हणावे का व्दिराष्ट्रीय म्हणावे का अनेकराष्ट्रीय म्हणावे याला खरोखर महत्त्व काहीच नाही. कारण राष्ट्रीयत्वाबद्दलच्या आधुनिक कल्पनेचा राज्य कशाला म्हणावे या कल्पनेशी आता काही फारसा संबंध राहिलेला नाही, त्या दोहीचे काही नाते उरलेले नाही.
पूर्वीचे एक राष्ट्र म्हणजे एक राज्य अशा हिशेबाने मानलेले राज्य हल्लीच्या काळातल्या जगाचा फारच लहान घटक ठरतो, व हल्ली लहान राज्यांना आपले स्वतंत्र अस्तित्व राखणे अशक्य आहे. मोठमोठ्या राष्ट्रीय राज्यांनासुध्दा इतरांशी संबंध न ठेवता स्वतंत्रपणे वागण्याचे खरेखुरे स्वातंत्र्य कितपत असेल याची शंकाच आहे. सारांश, एक राष्ट्र म्हणजे एक राज्य. ह्या राज्याच्या कल्पनेच्या जागी, अनेक राष्ट्रे मिळून एक राज्य किंवा मोठमोठे राष्ट्रसंघ बनविण्याची कल्पना येते आहे. प्रत्यक्षात तसे घडते आहे. या वाढत्या कल्पनाक्रमाचे नमुनेदार उदाहरण म्हणजे सोव्हिएट युनियन हे राज्य. अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हे राज्य राष्ट्रीयत्वाच्या प्रबल बंधनामुळे एकत्र राहिले तरी वस्तुत: ते अनेक राष्ट्रीय जनतेचे राज्य आहे.