''आम्ही सौंदर्याचे भोक्ते आहोत पण त्यात अतिरेक टाळून, आणि आम्हाला ज्ञानलालसाही आहे पण ती आमचे पौरुष सांभाळून. आम्ही संपत्ती म्हणजे एक केवळ तोरा मिरविण्याचे साधन मानीत नसून, संपत्ती म्हणजे महत्कार्य करण्याची एक आलेली संधी असे आम्ही समजतो आणि दारिद्र्य मान्य करण्यात आम्हाला काही कमीपणा वाटत नाही, पण ते दारिद्र्य घालवून देण्याकरिता काही यत्न न करणे लाजिरवाणे आहे असे आम्ही मानतो. युध्दात शौर्य दाखविणे म्हणजे केवढे भूषण आहे, असल्या युक्तिवादांची पुन्हा पुन्हा नुसती उजळणी करून आपली शक्ती वाढणार नाही, त्या शक्तीला आवाहन करायचे असेल, तिचा संचार आपल्या अंगी आणावयाचा असला, तर आपल्या ह्या विशाल नगरीचे समृध्द जीवन प्रतिदिनी कसे अव्याहतपणे चालते ते पाहिले पाहिजे, ते पाहता पाहता आली तिच्यावर भक्ती जडली पाहिजे, योध्दयांचे साहस, ज्ञानवंतांची कर्तव्यजागृती, त्या कर्तव्याच्या आचरणाप्रीत्यर्थ सज्जनांना करावा लागणारा आत्मसंयम असले गुण ज्यांच्या अंगी वसत होते, ज्यांनी कोणतेही दिव्य करण्याचा प्रसंगी त्यांना अपयश आले तर त्यामुळे कच खाऊन नगरीच्या सेवेत अंतर करणे ते तुच्छ मानले व तिने रणकुंडात आपल्या हस्ते द्यावयाची सर्वोत्कृष्ट आहुती म्हणजे आपले स्वत:चे प्राण ह्या भावनेने मृत्युमुखात उडी घेतली त्या महाभागांच्या त्या गुणामुळे ह्या आमच्या नगरीला ही सारी समृध्दी व महती लाभते आहे ह्याची जागृत आठवण ठेवूनच आपण त्या शक्तीचे आवाहन केले पाहिजे. त्या महाभागांनी या अशा भावनेने आपले देह या राज्याकरिता वेचले व त्याकरिता त्यांना प्रत्येकाला वेगवेगळे स्मृतिचिन्ह म्हणून त्यांचा प्रत्येकाचा असा गुणगौरव झाला की, तो कालत्रयीही नष्ट होणार नाही. या गुणगौरवाबरोबरच त्यांच्या अत्यंत वैभवशाली समाधीही उभारल्या गेल्या, पण त्या त्यांच्या क्षणभंगुर अस्थीवर उभारलेल्या समाधी नव्हेत, तर जेथे त्यांचे विमल यश निरंतर विराजत असते आणि प्रसंगी लोकांच्या वाणीला व कार्याला स्फूर्ती नव्याने देते ते लोकांच्या हृदयात त्यांना लाभलेले निवासस्थान. कारण, कीर्तिमंतांची समाधी म्हणजे ही सारी पृथ्वी. त्यांच्या यशाचा गौरव नुसता त्यांच्या मायभूमीत पाषाणावर कोरलेला नसतो, तर तो त्याहूनही अधिक दूरवर जिकडे तिकडे कोणत्याही दृश्य चिन्हावाचून इतर लोकांच्याही जीवनपटात ओतप्रोत भरलेला असतो. त्या महाभागांच्या तोडीचा पराक्रम तुम्हाला अद्याप करून दाखवावयाचा आहे, तेव्हा सुखाचे रहस्य स्वातंत्र्य, व स्वातंत्र्याचे रहस्य शूराचे हृदय, हे ओळखून आता तुम्हाला तुमच्यावर तुटून पडणार्या शत्रूंच्या धडकीला निधड्या छातीने भिडले पाहिजे, नुसते पाहात राहता कामा नये.''*
-----------------------
* थ्युसिडायडिसचे हे उतारे आल्फ्रेड झिमर्न यांच्या ''दी ग्रीक कॉमनवेल्थ'' (१९२४) (ग्रीकांचे संयुक्तराज्य) या पुस्तकातून घेतलेले आहेत.