लोकसंख्येचा प्रश्न
जननसंख्याप्रमाणात घट व राष्ट्राचा र्‍हास


या महायुध्दाच्या गेल्या पाच वर्षांत जिकडे तिकडे जी प्रचंड घडामोड झाली व लोकवस्तीची जी मोठी उलथापालथ झाली तितकी प्रचंड घडामोड व उलथापालथ इतिहासाच्या कोणत्याही महत्त्वाच्या कालखंडता यापूर्वी बहुधा कधीच झाली नसेल.  प्रत्यक्ष युध्दात मरण पावलेल्या व अपंग झालेल्या कोट्यवधी लोकांचा हिशेब सोडला तरी इतरत्र कोट्यवधी लोकांना, विशेषत: चीन, रशिया, पोलंड व जर्मनीमधील लोकांना पाळांमुळांसकट उपटून काढल्याप्रमाणे आपली घरेदारे, आपला देशसुध्दा सोडून परागंदा व्हावे लागले आहे.  प्रत्यक्ष युध्दाच्या कामाकरिता किंवा तत्संबंधी इतर मेहनत मजुरीची कामे करण्याकरिता अनेकांना जावे लागले आहे, आणि कित्येक ठिकाणची लोकवस्ती
सक्तीने हलवावी लागली आहे. चालून आलेल्या सैन्यामुळे लोकांच्या झुंडीच्या झुंडी आपली वस्ती सोडून अन्यत्र आश्रय घेण्याकरिता पळत आहेत.  या महायुध्दापूर्वी देखील नाझी सरकारच्या धोरणापायी युरोपमध्ये या शरणार्थी लोकांचा प्रश्न वाढता वाढता प्रचंड झाला होताच.  पण महायुध्दात त्याला जे उग्र स्वरूप आले त्या मानाने तेव्हाची ती युध्दाअगोदरची संख्या अगदी किरकोळ वाटते.  युध्दाचे प्रत्यक्ष परिणाम सोडून दिले तर युरोपात घडून आलेली ही उलथापालथ, भिन्न भिन्न राष्ट्रांची व मानववंशांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती व त्यांच्यातील जन्ममृत्यूचे प्रमाण अभ्यासून त्यावर आधारलेल्या काही शास्त्रीय निष्कर्षानुसार नाझी सरकारने हेतुपुर:सर जे काही धोरण कठोरपणे चालविले त्याचाच मुख्यत्वे परिणाम आहे.  नाझी लोकांनी कैक दशलक्ष ज्यू लोक मारून टाकले आहेत व नाझी राजसत्तेने व्यापलेल्या अनेक देशांतून तेथील लोकांचा वस्तीच्या दृष्टीने असलेला एकजीवपणा हेतुपुर:सर मोडून लोकवस्तीत उलथापालथ केली आहे.  सोव्हिएट युनिअनमध्ये कैक दशलक्ष लोक आपली मूळ वस्ती सोडून पूर्वेकडच्या प्रदेशात उराल पर्वताच्या पलीकडे जाऊन तेथे त्यांनी नव्या वसाहती स्थापल्या आहेत आणि त्या वसाहती आता कायमच्याच होणार असाच रंग दिसतो.  चीनमध्ये सुमारे पाच कोटी लोकांना त्यांच्या मूळ वस्तीतून उपटून फेकून दिल्यासारखे आपली घरेदारे कामधंदा सोडून दुसरीकडे जाऊन पडणे प्राप्त झाले आहे असा हिशेब निघतो.

परागंदा झालेल्या या लोकांना किंवा या महायुध्दाच्या घालमेलीतून जगून वाचून जे काही अखेर उरतील त्यांना तरी त्यांच्या मूळच्या ठिकाणी आणून त्यांचा तेथे जम बसवून देण्याचे कार्य मोठे अवघड असले तरी त्याकरिता प्रयत्न करण्यात येतील हे नि:संशय आहे.  त्यांच्यापैकी पुष्कळसे लोक आपल्या जुन्या घरादारांकडे परततील, पण ज्यांना आपल्या नव्या ठिकाणी नव्या परिस्थितीत राहणेच इष्ट वाटेल असेही खूप निघतील.  दुसर्‍या दृष्टीने विचार केला तर असेही शक्य दिसते की, युरोपातील राजकीय घडामोडींमुळे तेथील लोकांची आणखीही स्थानांतरे व लोकवस्तीची देवाणघेवाण होण्याचा संभव अद्यापही आहे.

पण वर वर्णन केलेल्या घडामोडींपेक्षाही अधिक खोलवर व दूरवर चाललेल्या विशालव्यापी मानवी घडामोडींची चिन्हे, पृथ्वीवरच्या सार्‍याच लोकांत काही अंशी शारीरशास्त्राच्या दृष्टीने तर काही अंशी प्राणिशास्त्राच्या दृष्टीने झपाट्याने घडत चाललेल्या स्थित्यंतरात आढळतात.  यांत्रिक युगामुळे घडलेली क्रांती व वस्तुनिर्मिती कला-विज्ञानात झालेली आधुनिक प्रगती यामुळे युरोपात, विशेषत: वायव्य व मध्ययुरोपात, लोकसंख्येची वाढ फार झपाट्याने झाली.  हे कलाविज्ञान पूर्वेकडे सोव्हिएट युनियनमध्ये पसरत गेले आहे आणि त्याबरोबर तेथील नव्या आर्थिक व्यवस्थेचे व इतर कारणांचे साहाय्य मिळाल्यामुळे तेथील लोकसंख्येत जी आश्चर्यकारक वाढ झाली आहे, ती वायव्य व मध्य युरोपातील वाढीपेक्षाही अधिक प्रमाणात आहे.  हे कलाविज्ञान व त्याबरोबरच वाढते शिक्षण, रोगप्रतिबंधक राहणी, व एकंदर जनतेचे वाढते आरोग्य हेही पूर्वेकडे पसरतच चाललेले आहे, आशियामध्ये अनेक देशांत त्यांचा व्याप पसरणार.  त्यांपैकी हिंदुस्थानसारखे असे काही देश आहेत की, तेथे लोकसंख्येची वाढ तर नकोच, उलट लोकसंख्या कमी झाली तरच त्यांची स्थिती काही अधिक बरी होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel