युगायुगातून अनेक लोकोत्तर नरनारी रत्ने ती प्रसवत आली आणि तिच्या त्या पुत्रांनी व कन्यांनी प्राचीन परंपरा पुढे चालविताना त्या परंपरेला त्या त्या युगाला उचित असे वळण लावण्याचे कार्य सतत चालू ठेवले. या थोर परंपरेत शोभणार्या रविंद्रनाथ टागोरांच्या अंगी या आधुनिक युगाची वृत्ती व आकांक्षा होत्या त्याबरोबरच त्यांची भारताच्या प्राचीन तत्त्वावरही दृढनिष्ठा होती आणि त्यांनी स्वत:च्या जीवनात ह्या नव्याजुन्याचा समन्वय साधला होता. ते म्हणतात, ''केवळ भौगोलिक मूर्तिपूजेच्या भावनेने किंवा या भूमीत योगायोगाने मला जन्म लाभला म्हणूनच नव्हे, तर भारतीय महापुरुषांच्या प्रज्ञादीपतीने उजळलेल्या चित्तात स्फुरलेली जिवंत वाणी भारताने युगानुयुगे अनेक उत्पातांतून तिचे रक्षण करून संभाळली आहे म्हणून भारतावर माझी भक्ती जडली आहे.'' पुष्कळांना असेच वाटत असेल, तर पुष्कळ इतर भारतीय आपल्या मातृभूमीवरील भक्तीची दुसरी काही कारणे देतील.
या हिंदमातेला मंत्रमुग्ध स्थितीत ठेवणार्या त्या मंत्रांचा प्रभाव आता संपलेला दिसतो ती आपल्या स्वत:च्या भोवती काय काय आहे ते पाहू लागली आहे, शुध्दीवर आली आहे. पण तिच्यात कितीही पालट झाला (आणि तो होणारच) तरी तिच्यातही जादू नाहीशी होणार नाही. तिच्या लोकांची तिच्यावरील भक्ती तशीच पुढेही राहणार. तिने आपली वेषभूषा बदलली तरी अंतर्यामी ती पूर्वीची तीच राहणार आणि भोवतालचे हे जग निष्ठुरता, द्वेष, अभिलाषा यांनी भरलेले असले तरी आपल्याजवळ जे काही सत्य, शिव व सुंदर असेल ते ती, तिने आजपर्यंत साठवलेल्या ज्ञानसंचयाच्या बळावर घट्ट धरून राहील, ते हातचे जाऊ देणार नाही.
आजच्या या आधुनिक जगाने खूप कामगिरी करून दाखविली आहे, पण मानवताप्रेमाची घोषणा त्या जगाने कितीही केली असली तरी मानवाला माणुसकी प्राप्त करून देणार्या गुणापेक्षा ह्या जगाने विशेष भर द्वेषावर व हिंसेवरच दिलेला आहे. युध्द म्हणजे सत्य व मानवता यांचा आभाव. युध्द केव्हा केव्हा अपरिहार्य ठरत असेल, पण त्या युध्दाचे परिणाम पाहू गेले तर ते फार भेसूर दिसतात. नुसत्या जीवहत्येचे एवढे विशेष नाही, कारण मनुष्य कधीतरी मरणारच, पण युध्दापायी द्वेष व धडपडीत खोट्या गोष्टींचा हेतुपूर्वक सतत प्रचार चालतो आणि मग हळूहळू लोकांच्या अंगी ती नित्याची सवय होऊन बसते त्याचे त्यांना काही वाटेनासे होते. द्वेषाच्या तिरस्कराच्या भावनांचे वळण आपल्या जीवनाच्या दिशेला लागू देणे अनिष्ट आहे, त्यात धोका आहे. कारण तसे वागण्यात आपली शक्ती वाया जाते, आपले मन कोते व विपरीत बनते, आणि त्यामुळे त्या मनाला सत्य दिसेनासे होते. दुर्दैव असे की आज हिंदुस्थानात द्वेषाची भावना पसरली आहे, तिरस्कार फार आहे, कारण भूतकाल आपला पिच्छा सोडीत नाही, आणि वर्तमानकालही त्याहून काही वेगळा नाही. एका मानधन मानववंशाच्या प्रतिष्ठेचा वारंवार अवमान होऊ लागला तर तो विसरणे सोपे नाही. सुदैव इतकेच की, द्वेषाची भावना हिंदी लोकांच्या मनात टिकवू म्हटले तरी फार काळ टिकत नाही, त्यांच्या मनात अधिक सात्त्विक भावनाच पुन्हा पूर्ववत् येतात.
हिंदुस्थान स्वतंत्र होऊन पुढे नवी नवी क्षितिजे राष्ट्राच्या दृष्टीस पडू लागली म्हणजे हिंदुस्थानला स्वत:चे मूळ स्वरूप पुन्हा लाभेल आणि निराशा व अपमानाने भरलेल्या या स्वातंत्र्यपूर्वकाळापेक्षा भविष्यकाळ रमणीय वाटून राष्ट्राचे लक्ष त्या भविष्यकाळाकडे लागेल. आपले मूळचे ते न सोडता इतरांपासून शिकण्यासारखे असेल ते शिकण्याची व इतरांशी सहकार्य करण्याची उत्कंठा राष्ट्राला लागून ते निर्भयपणे प्रगतीच्या मार्गाला लागेल. एकतर आपल्या जुन्या रूढींना अंधश्रध्देने कवटाळून डोळे मिटून चालावे, नाहीतर परकीयांच्या आहारी जाऊन त्यांच्या रीतिभातींची निर्बुध्दपणे नक्कल करीत राहावे या दोन परस्परविरोधी पंथांमध्ये आज राष्ट्राचे मन हेलकावे खाते आहे. यांपैकी कोणतेही एक काय ते पत्करण्यात राष्ट्राला तरणोपाय सापडणार नाही, राष्ट्राच्या जिवंतपणाचे ते लक्षण नव्हे, त्याने राष्ट्राची वाढ होणार नाही. निरुपयोगी झालेल्या जुन्या कवचाबाहेर पडून आधुनिक युगाच्या जीवनात व आधुनिक जगाच्या धामधुमीत शिरण्याखेरीज राष्ट्राला गत्यंतर नाही हे स्पष्ट आहे, पण राष्ट्राची खरी खरी सांस्कृतिक व अध्यात्मिक वाढ करावयाची झाली तर ती इतरांची नुसती नक्कल करून होणे शक्य नाही हेही तितकेच स्पष्टपणे लक्षात आले पाहिजे. जनतेशी, व राष्ट्रीय जीवनाच्या जिवंत निर्झराशी ज्यांनी आपले असलेले संबंध पार तोडून टाकले आहेत, ज्यांना त्या जनतेशी व राष्ट्रीय जीवनाशी काही कर्तव्य नाही, अशा मूठभर लोकांपुरतीच ह्या असल्या नक्कल करण्याच्या प्रवृत्तीची व्याप्ती असणार. खरीखरी संस्कृती सार्या जगातून मिळेल तेथून नवे स्फूर्तिदायक विचार घेत राहते, पण प्रत्येक संस्कृतीचे संवर्धन मात्र स्वदेशीच होते व ते देशातील सामान्य जनतेच्या विशाल आधारावरच होऊ शकते. लोकांचे लक्ष जर परकीय आदर्शाकडेच लागले तर त्यांच्या कलेत, त्यांच्या साहित्यात, अस्सल जिवंतपणा येत नाही. संस्कृती म्हणजे चारचौघा चोखंदळ लोकांपुरतीच तिची व्याप्ती, असे संस्कृतीचे कोते रूप होते ते आता उरलेले नाही. आता आपल्याला संस्कृतीचा विचार सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनेच केला पाहिजे आणि ती संस्कृती म्हणजे त्यांच्यात पूर्वीपासून चालत आलेल्या विचारधारा पुढे वाहत्या ठेवून त्यांचे संवर्धन करणारी, व त्यांच्या नव्य आकांक्षा, निर्मितीची त्यांची नवी प्रवृत्ती दर्शविणारी अशीच प्रचलित झाली पाहिजे.