वर पलंगावर राधाबाईंच्या मांडीवर बाळ झोपी गेला. स्वप्नात प्रेमसृष्टी पाहू लागला. खाली गादीवर मालतीच्या कुशीत छोटा बाळ झोपी गेला व छोटी आईही झोपी गेली. राधाबाईंच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते; परंतु आपला पती नाही या विचाराने त्या आनंदाश्रूंत दुःखाश्रूही होते. जगात निर्भेळ, अमिश्र आनंद आहे कोठे ? दिव्याजवळ अंधार असायचा, प्रकाशाजवळ छाया असायची ! त्यातच मौज आहे व त्यामुळेच गोडी आहे.

मालती : आता कोकणात जायचे ना ? मी पाहीन एकदा ते कोकण. ज्या कोकणात अशा माता उत्पन्न होतात ते तुमचे कोकण मी पाहीन. ते कोकणचे सौंदर्य़ पाहीन. जगदंबेची ओटी भरीन.

बाळासाहेब : ज्या कोकणात माझ्यासारखे करंटे पितृघातकी दगड निपजले त्या कोकणात दगडांशिवाय दुसरे काय दिसणार तुला माले ?

मालती : दगडांतून देव निघतात, अहिल्येसारख्या सती निर्माण होतात !

बाळासाहेब : मालती, आपण कायमचेच कोकणात जाऊ. राजापूरच्या गंगेजवळ राहू. ही नोकरी आता पुरे. आईबापांचा विसर पाडणारी ही नोकरी आता नको. स्वातंत्र्याची चळवळ सुरू होत आहे, भारताचा नवा उदय होत आहे, भारत नवा जन्म घेत आहे. आपलाही नवीन जन्म झाला आहे. आपणही स्वतंत्र होऊन निराळा संसार सुरू करू, मोटार चालवायला शिकलीस, आता खरा संसार चालवायला शीक, माले ! तू गरिबीत राहावयास तयार आहेस का ? शेणामातीत तुझे हात मळले तर चालेल का ?

मालती : खरी श्रीमंती आता मला कळून आली आहे. आपण इतके दिवस गरीब होतो. दरिद्री होतो. खरी श्रीमंती आता लाभत आहे आणि ती उत्तरोत्तर वाढतच जाईल. श्रीकृष्ण भगवानांचे हातसुद्धा जर शेणामातीत मळले, तर माझे मळायला काय हरकत आहे ? हात मळणार नाहीत, तर उलट निर्मळ होतील.  मी तयार आहे. आपण काम करू. एखादा लहान मळा तयार करू. फुलझाडे लावू. भाजी लावू. तुम्ही शेतात खपा मी तुम्हाला भाकर घेऊन येऊन. आनंद होईल. कवींनी केलेली वर्णने आपण वाचली आहेत. आता आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ. जीवनच काव्यमय करू.

बाळासाहेब  सर्व सामानासह व मंडळींसह कोकणात आले. त्यांनी रजा घेतली होती. अजून राजीनामा पाठविला नव्हता. गाव जवळ आला. त्यांनी गावाला नमस्कार केला. गाड्या त्या जुन्या घराशी उभ्या राहिल्या. इतके दिवस बंद असलेली घराची दारे उघडली. स्वच्छ हवा व प्रकाश घरात शिरला. ते लहानपणाचे घर. तुळशीचे अंगण, ती आंब्याची गगनचुंबी सर्वसाक्षी जुनी झाडे, ते उंच बेहेळ्याचे झाड, बाळासाहेबांना खूप आनंद झाला. वडिलांच्या प्राणांचे मोल देऊन तो आनंद त्यांनी विकत घेतलेला होता !

मालती पदर बांधून घर झाडू लागली. बाळासाहेबही झाडू लागले. राधाबाई आवराआवर करीतच होत्या. दिनेश-नरेश अंगणात खेळत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel