बहुला व डुबा कोणी बोलत नव्हते, बोलणे त्यांना शक्यच नव्हते. भरलेल्या अंत:करणाने, भरलेल्या डोळयांनी दोघे मुकाटयाने चालली होती. दोघे वाघाच्या जवळ आली. वाघ करकर दाढा खात होता. वाघाला पाहून डुबा जरा घाबरला. तो बहुलेच्या अंगाला बिलगला. बहुला त्याला म्हणाली, 'बाळ माघारी जा.' डुबा म्हणाला, 'मी भ्यायलो नाही काही, हा बघ पुढं होतो.' असे म्हणून उडया मारीत डुबा वाघासमोर जाऊन उभा राहिला. तो वाघाजवळ बोलू लागला.
डुबा: तूच का रे तो वाघोबा? माझ्या आईला खाणारा तूच ना? वाघोबा, माझ्या आईला खाऊ नकोस. तू मला खा. माझी प्रार्थना ऐक.

बहुला: नको रे वाघोबा. त्या वेडयांच काय ऐकतोस? तू आपला मला खा हो.

वाघ: बहुले, इतका उशीर का झाला? मी म्हटलं, तू येतेस की नाही? न येण्याचं ठरवीत होतीस ना?

बहुला: नाही रे वाघोबा. हा डुबा ऐकेना. रोज सांगितलेलं ऐकतो. इवलासुध्दा हट्ट धरून बसत नाही; परंतु आज ऐकेना. म्हणे, 'मलाच जाऊ दे.' त्याची समजूत घालण्यात वेळा गेला. शेवटी तो आलाच बरोबर. रागावू नकोस नाही. फसवण्याचं स्वप्नातसुध्दा माझ्या मनात आलं नाही. ही मी तयार आहे. तुझी वाघीण, तुझी पिलं भुकेली असतील. त्यांना लौकर माझा ताजाताजा घास नेऊन दे.'

डुबा: वाघोबा, नको रे आईला खाऊ. माझं अंग बघ कसं लोण्यासारखं मऊमऊ आहे. माझं अंग तुला आवडेल, तुझ्या पिलांना आवडेल.

बहुला: त्याला खाऊन सार्‍यांची भूक कशी शमणार? वाघोबा, तू मलाच खा. मी हाडापेरानं मोठी आहे, तुम्हा सर्वांचं पोट भरेल.

वाघ: मी तुम्हांला दोघांना मारून टाकतो. तुम्हा दोघांना आमच्या पोटात ठेवतो. गोठयात एके ठिकाणी असता, आता पोटात एके ठिकाणी राहा. डुब्याचं मांस-कोवळं कोवळं-माझ्या पिलांना फारच आवडेल. तुझं वाघिणीला आवडेल. चला. तयार व्हा. आता उशीर नको. बहुला, डुबा, माना खाली घालून तिथं बसा. देवाचं स्मरण करा.

मायलेकरे खाली माना घालून बसली; परंतु डुबा पुन्हा उठून म्हणाला, 'वाघोबा, खायचंच तर मला आधी खा. आईला फाडलेलं माझ्यानं पाहावणार नाही; परंतु आई मोठी आहे. धीराची आहे. तिच्या सत्त्वाला सीमा नाही. मला फाडलेलं पाहाण्याचं धैर्य तिच्याजवळ आहे.'

वाघ: गप्प बस. बोलणं पुरे. मरायची वेळ आली तरी चुरूचुरू बोलतच आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel