रशियाचा दौरा

७ ते २३ जून १९५५ पर्यंत रशियन सरकारच्या खास आमंत्रणावरून नेहरू रशियाला गेले होते. तिथें त्यांचें अपूर्व स्वागत झालें. या दौर्‍याचा चित्रपट तयार झाला आहे. रशियामधल्या १५ दिवसांत नेहरूंनीं दहा हजार मैलांचा प्रवास करून १४ प्रमुख शहरांना भेटी दिल्या, ११ औद्योगिक कारखाने व ५ शेतकी संस्था पाहिल्या. येतांना त्यांनीं युरोपांतील ८ देशांचाहि दौरा केला. रशियांतील जनतेलाहि त्यांचे पंतप्रधान व मंत्री दिसले नव्हते. नेहरूंच्या स्वागतसमारंभांत उघड्या मोटारींत नेहरूंमुळेंच रशियन जनतेला त्यांच्या पुढार्‍यांचेंहि दर्शन झालें ! त्यांच्या शांतिकार्याबद्दल राष्ट्राध्यक्षांनीं त्यांना ‘ भारतरत्‍न ’ ही सर्वोच्च मानाची पदवी अर्पण केली.

येतांना त्यांनीं बुल्गानिन व क्रूशेव्ह यांना भारतभेटीचें आमंत्रण दिलें. त्याप्रमाणें ते भारतांत येऊन गेले. नेहरूंचे रशियन जनतेनें जें स्वागत केलें त्या स्वागताला शोभेंसें स्वागत बुल्गानिन व क्रूशेव्ह यांचें भारतीय जनतेनें केलें.

प्रत्येक वर्षीं भारतांत त्यांचा वाढदिवस १४ नोव्हेंबरला मोठ्या उत्साहानें साजरा होतो. विशेषत: लहान मुलांच्या उत्साहाला तर पारावारच राहत नाहीं. १९५४ चा त्यांचा वाढदिवस मुंबईंला साने गुरुजी कथामालेच्या वतीनें साजरा झाला. नेहरूकाका स्वत: या समारंभाला हजर होते. त्यामुळें तर मुलांना अत्यानंदच झाला. १४ नोव्हेंबर हा आतां आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशीं संबंध जगभर मुलांचे कार्यक्रम होतात. मुलांसाठीं खास समारंभ केले जातात. नेहरूकाकांना मुलें फार आवडतात. त्यामुळेंच कीं काय संबंध जगानें त्यांचा वाढदिवस जागतिक बालदिन म्हणून ठरविला आहे.

नेहरूंना भूदानाबद्दल आस्था व कळकळ आहे. विनोबांच्याबद्दल त्यांच्या मनांत प्रेमादर आहे. जेव्हां आवश्यक वाटेल तेव्हां आपलीं इतर कामें तात्पुरतीं बाजूला ठेवून नेहरू विनोबाजींच्या भेटीला जातात. त्यांच्याशीं देशांतील नाना प्रश्नांवर विचारविनिमय करतात.

‘मी जर पंतप्रधान नसतों तर खांद्यावर तिरंगी झेंडा घेऊन मी गोव्यांत शिरलों ’ असें ते एकदां म्हणाले. गोवा हा भारताचाच एक भाग आहे व तो भारतांत विलीन होईल याबद्दल त्यांना तिळमात्र शंका नाहीं. सैन्यबळावर गोव्याचा प्रश्न चुटकीसरसा सोडवितां येईल इतकी भारताची शक्ति आहे, पण हा प्रश्न सामोपचारानें, शांततेच्या मार्गानें सुटावा अशी नेहरूंची इच्छा आहे. आपण जगाला शांततेचा उपदेश करीत असतांना आपले प्रश्न मात्र सैन्यबळावर सोडवावेत हें योग्य नाहीं. शांततेच्या, वाटाघाटीच्या मार्गानें गोवा स्वतंत्र होईल अशी त्यांची मनोमन खात्री असल्यानें प्रसंगीं टीका पत्करूनहि त्यांनीं आपली भूमिका सोडलेली नाहीं.

ऑक्टोबर १९५५ मध्यें भाषावार प्रांतरचनेचा अहवाल प्रसिद्ध झाला. एवढा मोठा प्रचंड देश, अनेक प्रांत, एकाच विभागावर अनेक लोकांचे हक्क इत्यादि गोष्टींमुळें सर्वांना संपूर्णपणें समाधान होईल असा निर्णय होणें अशक्यच ! दुर्दैवानें महाराष्ट्रावर अन्याय झाला. मुंबई महाराष्ट्राची असूनहि महाराष्ट्राला देण्यांत आली नाहीं. मुंबईत प्रचंड प्रमाणांत दंगली झाल्या. देशाच्या ऐक्याला तडा जातो की काय अशी भीती वाटूं लागली. अतिरिक्त प्रांताभिमान, संकुचित वृत्ति यामुळें देशहिताची हानि होऊं लागली. या प्रकारांमुळें नेहरू अस्वस्थ झाले. त्यांनीं महाराष्ट्रीय पुढार्‍यांना चर्चेला बोलावलें. या अहवालामुळें ज्यांचें ज्यांचें समाधान झालें नाहीं त्या सर्वांना त्यांनीं वाटाघाटींना बोलावून त्यांच्याशीं चर्चा केली. काहीं ना कांहीं मार्ग निघाला. अकाली शिखांचें समाधान झालें, पण महाराष्ट्राबद्दल कोणाशीं वाटाघाटी कराव्यात याचीच नेहरूंना पंचाईत पडली. त्यांना अतिशय दु:ख झालें. त्यांच्या हृदयाला तीव्र वेदना झाल्या. ‘ महाराष्ट्राच्या प्रश्नांत मी अपेशी ठरलों ’ अशी खंत त्यांना सारखी व्यग्र करूं लागली होती. पण अखेर विशाल द्वैभाषिकाचा पर्याय पार्लमेंटनें मान्य करून कांहीं काल तरी हा प्रश्न सोडविला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel