“सर्वेऽत्र सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:।”

“सारे सुखी असोत, सारे निरोगी असोत” असे मंत्र पुटपुटल्याने सुख व आरोग्य निर्माण होत नसते. मंत्र म्हणजे ध्येय. ते ध्येय कृतीत आणण्यासाठी मरावयाचे असते. झिजावयाचे असते. हे मंत्र पुटपुटताना किती लोकांना सुख नाही, किती लोकांना औषध नाही, किती लोकांना घाणेरड्या खोलीत राहावे लागते. किती लोकांना स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही, किती लोकांना आरोग्याचे ज्ञान नाही, याचा विचार तरी मनात येतो का? आपल्या लोकांत सर्वत्र दंभ बोकाळला आहे. महान वचने ओठांवर, पोटात काही नाही! परंतु धर्म जीवनात आल्याशिवाय जीवन सुंदर होत नाही. भाकरीचा तुकडा नुसता ओठांवर ठेवून भागत नाही; तो पोटात जावा लागतो, तेव्हाच शरीर सतेज व समर्थ होते. थोर वचने जेव्हा कृतीत उतरतील तेव्हाच समाज सुखी व आरोग्यसंपन्न होईल.

साम्यवादी हे मंत्र पुटपुटत बसणार नाहीत. या महान मंत्राचा आचार केव्हा सुरू होईल याची उत्कट तळमळ त्यांना लागली आहे. यासाठी ते तडफडत आहेत. धर्मबिर्म आम्हांला कळत नाही असे ते म्हणतात. परंतु खरा धर्म तेच आचरू पाहात आहेत. सर्वांना खायला-प्यायला देऊ पाहात आहेत. समाजातील अन्याय, दैन्य, दास्य दूर करू पाहात आहेत. समाजातील दुर्गुण दूर करावयाचे असतील, तर अद्वैत जीवनात आणा; आपणावरून दुस-याला ओळखावयास शिका, असे ते सांगत आहेत. ते स्वत:ला भाई म्हणवून घेत आहेत. आपण सारे भाई भाई. “अमृतस्य पुत्र:” – त्या अमृतरूपी चैतन्याची आपण सारी लेकरे. या, एके ठिकाणी शिकू, गाऊ, हसू- असे हे साम्यवादी म्हणत आहेत.

ऋषींच्या आश्रमातील प्रेमाच्या प्रभावामुळे साप व मुंगूस एके ठिकाणी राहात. दे ध्येय आपणांपासून पुष्कळ दूर करूत आहे, हे ध्येय कदाचित आपल्या दृष्टीत येत नसेल, परंतु सर्व मानवजातीने तरी प्रेमाने एकत्र नांदावे यात काय कठीण आहे? या भरतभूमीत हा प्रयोग ऋषी करू पाहात होते. अद्वैताचा तारक-मंत्र देऊन हे प्रेमैक्य निर्माण करू पाहात होते. परंतु त्यांची परंपरा पुढे चालवू पाहणारे सर्वच भेदभाव माजवीत आहेत, वैषम्य वाढवीत आहेत.

ही सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवीत आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वत:च्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसू या, पिकवू या. परंतु मनुष्य त्यातील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष-मत्सर उत्पन्न होतात. स्वत:ला समाजात बुडविले पाहिजे. पिंडाला ब्रह्मांडात बुडविले पाहिजे. व्यक्ती शेवटी समाजासाठी आहे. दगड इमारतीसाठी आहे, बिंदू सिंधूसाठी आहे, हे अद्वैत कोण पाहतो? कोण अनुभवतो? हे अद्वैत जीवनात आणणे म्हणजे केवढा आनंद!

ज्याला लाखो भाऊ सर्वत्र दिसत आहेत, त्याला केवढी कृतकृत्यता वाटेल! संतांना हीच तहान होती, हेच वेड होते:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel