“त्या तेजस्वी प्रेरणा देणा-या सूर्याच्या परमश्रेष्ठ तेजाची आम्ही उपासना करतो. तो सूर्य आमच्या बुद्धीस चालना देवो!” विश्वामित्र ऋषीने देवाजवळ आपल्या समाजासाठी निर्मळ बुद्धीची देणगी मागितली. वेदांमध्ये गायी दे, पुत्र दे, यश दे, इत्यादी शेकडो याचना देवाजवळ केलेल्या आहेत परंतु त्या सर्व मंत्रांपेक्षा हा लहान मंत्र परमश्रेष्ठ ठरला. यावरून भारतीय पूर्वज कोणत्या वस्तूला सर्वांत अधिक महत्त्व देत होते ते दिसून येईल.

मनूने एके ठिकाणी स्वच्छ सांगितले आहे की, “माझे म्हणणे तर्कास पटत असेल तर घ्या; नाही तर फेकून द्या.” शंकराचार्य म्हणतात, “शेकडो श्रुती येऊन अग्नी थंड आहे म्हणून सांगू लागल्या तरी त्याला कोण महत्त्व देईल?” तर्काच्या कसोटीवर घासून घासून जे शंभर नंबरी असेल, तेच ज्ञानधन पूज्य माना, असे ते प्राचीन कवी सांगत आहेत.

महाभारतात “कोऽयं धर्म: कुतो धर्म:” असा भीष्माला प्रश्न करण्यात आलेला आहे. हा धर्म कोठून येतो? हा धर्म का ईश्वर कानात येऊन सांगतो? भीष्मांनी सांगितले की, विचारवंत लोक चिंतन करून, अभ्यास करून हा धर्म निर्माण करतात. “मतिभिरुद्धृतम्।” आपापल्या मतींनी ते तत्त्वे शोधून काढतात. वेदधर्म म्हणजे विचारधर्म. वेदधर्म म्हणजे बुद्धीप्रधान धर्म. श्रुतीचे श्रुतीला पटत नाही, याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की, प्रत्येकजण स्वतंत्रपणे विचार करी. त्याच्या त्याच्या काळात जी परिस्थिती असे. त्याप्रमाणे तो विचार करी. ऋषी आंधळे नव्हते, ते पोपट नव्हते. ते तेजस्वी गायत्री मंत्राची उपासना करणारे होते. पदोपदी ते फरक करीत. “बाबावाक्यं प्रमाणम्”ची त्यांना अपार चीड येई. ते चर्चा करीत. बैठका भरवीत. ज्ञानाचा शांतपणे खल करीत.

प्राचीन काळात सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्कायार्यांच्या नुसत्या निरुक्तात पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टींच्या शेकडो मंडळींची नावे त्यात आलेली आहेत. इतिनैरुक्तिता:, इति आख्यायिका:, इति एतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. प्रांजलपणे वाद करीत आहेत, पटले तर घेत आहेत, त्याप्रमाणे वागू लागत आहेत, असा तो देखावा दिसतो. नि:शंकपणे विचारांची मांडणी करण्यात येत असे. त्या चर्चा एकावयास लोक जमत असत.

मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टी परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडो मते होती; परंतु कोणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे.

ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेच्या तपे देत. उपनिषदांत अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनात गढून जात, ते आले आहे. ज्ञान मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्येकडे ज्ञानासाठी नम्रपणे जाई. ज्ञान कोठेही असो, ते पवित्र आहे. सूर्याचा प्रकाश कोठूनही आसा तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाची दृष्टी हवी. देवांचा कच दैत्यांच्या गुरूकडेही जाईल आणि दैत्यांचा गुरूही शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु-मित्र नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel