मांगल्याची पूजा करणारे माझे कर्म आहे की नाही हे पाहणे म्हणजे सत्स्वरुपी स्मरण. तसेच माझे कर्म ज्ञानविज्ञानयुक्त आहे की नाही हे पाहणे म्हणजेच चित्स्वरुपी परमेश्वराचे स्मरण ; आणि हे कर्म करताना माझे हृदय उचंबळत आहे की नाही, मला अपार आनंद होत आहे की नाही, हे पाहणे म्हणजे आनंदस्वरुपी परमेश्वराचे स्मरण. कर्मात समाजाचे मांगल्य हवे ; कर्मात ज्ञान हवे ; कर्माचा मला बोजा न वाटता आनंद वाटायला हवा. याला म्हणतात सच्चिदानंदाची पूजा.

भारतीय संस्कृती जय वा पराजय, सिद्धी वा असिद्धी, यश वा अपयश यांच्याकडे लक्ष देत नाही. समुद्राच्या लाटा वर उसळतात व खाली पडतात. वर चढतो व खाली पडत समुद्र तीराला गाठतो. समुद्राला भरती येते व ओहोटी येते. परंतु त्याची धीरगंभीर गर्जना कधी थांबत नाही, त्याचे कर्म चालले आहे. जीवन वा मरण, संपत्ती वा विपत्ती, दास्य वा स्वातंत्र्य, जय वा पराजय, इकडे लक्ष न देता ध्येयाकडे सदैव जावयाचे. चारित्र्य ही मुख्य वस्तू आहे. माझा स्वतःचा विकास ही मुख्य वस्तू आहे. तिच्यासाठी मी आहे. जयापजयाच्या लाटांशी झुंजत मी पुढे जाईन. जयाने हुरळणार नाही, पराजयाने होरपळून जाणार नाही. संपत्तीत गर्वान्ध होणार नाही, विपत्तीत निस्तेज होणार नाही. मी माझे कर्म हातात घेऊन पुढे जात राहीन. भारतीय संस्कृती केवळ विजयाचे तत्त्वज्ञान सांगत नाही. केवळ विजयावरच जर ती उभारलेली असेल, तर जगातील निम्म्या अनुभवांवरच ती उभारलेली आहे असे होईल. सदैव सुखाच्या स्वर्गात राहशीव अशी लालूच भारतीय संस्कृती दाखवीत नाही. विजयामुळे उतूमातू नकोस ; पराजयामुळे कष्टी, हताश होऊ नकोस ; हा भारतीय संस्कृतीचा महान संदेश आहे. जयापजयांना छाटीत, काटीत आपण पुढे जावयाचे. जयाचे व पराजयाचे साक्षी व्हावयाचे. ख्रिस्ताला क्रॉसवर जाण्याची वेळ आली तरी तो महापुरुष म्हणाला, “प्रभो ! जशी तुझी इच्छा !” कर्म करीत असताना फास मिळो ना सिंहासन मिळो, हार मिळोत, यश मिळो वा अपयश मिळो, माझा आत्मा मलिन होणार नाही. अशी ख-या कर्मवीराची श्रद्धा असते. अदृष्ट फळ त्याला दिसत असते. शेवटी सत्याचा विजय होईल, हे त्याच्या दृष्टीला दिसत असते. विजयाचे नगारे वाजवू नकोस. पराजयाची रडगाणी गाऊ नकोस. दोहोंच्यावर स्वार होऊन, निर्द्वंद्व होऊन, सदैव स्वकर्म करीत राहा. त्यात तन्मय हो. तोच तुझा मोक्ष, तीच पूजा, तोच खरा महान धर्म, असे भारतीय संस्कृती सांगत आहे. पण ऐकणार कोण !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel