गुरू म्हणजे एक प्रकारे आपले ध्येय. आपल्याला ज्या ज्ञानाची तहान आहे, ते ज्ञान अधिक यथार्थपणे ज्याच्या ठिकाणी आपणांस प्रतीत होते. तो आपला गुरू होतो. गुरूभक्ती म्हणजे एक प्रकारे ध्येयभक्ती. गुरू या शब्दाऐवजी ध्येय शब्द योजा. म्हणजे गुरूभक्ती मग वेडगळपणा वाटणार नाही. फुललेल्या कमळातील रस पिण्यासाठी, रुंजी घालीत, अधीर होऊन ज्याप्रमाणे भुंगा येतो, अलगत त्या कमळाजवळ बसतो, त्या कमळातील रस पिता पिता तल्लीन होतो, -तसेच सच्छिष्याचे गुरुजवळ होते. गुरूला तो लुटतो. गुरूला सोडीत नाही. गुरूला रिकामे करण्यासाठी तो तडफडतो. परंतु गुरूला तेव्हाच रिते करता येईल, जेव्हा शिष्य स्वतः रिकामा असेल. स्वतःच्या जीवनाचे भांडे जितके मोठे व खोल, त्या मानाने गुरूपासून आपणांस घेता येईल.
समर्थांनी लिहिले आहे, ‘नेणतेपण सोडूं नये।’ आपण नेणेते आहोत, आपण अजून रिकामे आहोत, अजून भरपूर आपणांस शिकावयाचे आहे, असे सदैव वाटले पाहिजे. आणखी पुढे, असे सदैव म्हटले पाहिजे. हाच विकासाचा मार्ग आहे. मी सारे समजलो, सारे शिकलो, असे म्हणताच विकास थांबतो.
ध्येय सदैव वाढतच असते. ध्येयरुपी गुरू अनंत आहे. त्याची सेवा किती केली तरी ती अपुरीच आहे. जन्मोजन्मी त्याची भक्ती करावी लागेल, तेव्हा कदाचित परिपूर्णता लाभेल. न्यूटन म्हणणार, “माझे ज्ञान सिंधूत बिंदू आहे.” सॉक्रेटिस म्हणणार, “मला काही समजत नाही, एवढेच मला समजते.”
त्या त्या शास्त्रातील अनंत ज्ञानासाठी कसे तडफडावे, कसे वेडे व्हावे, हे गुरू शिकवीत असतो. गुरू म्हणजे अनंत ज्ञानाती मूर्ती असे शिष्याला वाटते. गुरू म्हणजे एक प्रतीक होते. गुरु म्हणजे मूर्त ज्ञानपिपासा, गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ. गुरू म्हणजे सत्याच्या प्रयोगाची उत्कटता. माझ्या गुरूला आदी नाही, अंत नाही. माझ्या गुरूला पूर्व नाही, पश्चिम नाही. माझा गुरू म्हणजे परिपूर्णता.
अशा गुरूला काही द्यावे लागत नाही. त्याला कितीही दिले तरी ते थोडे आहे. कितीही दिले तरी ते पुष्कळ आहे. मनुस्मृतीत सांगितले आहे, “अरे, तुझ्याजवळ द्यावयास काहीच नसेल तर खडावांचा एक जोड दे. एक उदककुंभ भरुन दे. एक फूल दे.” शिष्याने किती दिले हे पाहावयाचे नसते. जे दिले त्यात कृतज्ञतेचा सागर भरलेला असतो. सारे हृदय त्यात ओतलेले असते.
युरोप खंडात मी अमक्याचा शिष्य, मी अमक्या गुरूच्या पायाशी बसून शिकलो, असे सांगण्यात मोठा अभिमान बाळगतात. सॉक्रेटिसाचा शिष्य म्हणवून घेण्यात प्लेटोला धन्यता वाटे. प्लेटोचा शिष्य म्हणवून घेण्यात अॅरिस्टॉलला कृतार्थ वाटे. इब्सेनचा अनुयायी म्हणवून घेण्यात शॉला मोठेपणा वाटे. तर मार्क्सचा शिष्य म्हणवून घेण्यात लेनिनला गौरव वाटला असेल.
आपण कोणाचे तरी आहोत ही भावना फार थोर आहे. त्या भावनेत कृतज्ञता आहे. मी जगात एकांडा शिलेदार नाही. जगात सहकार्य आहे. त्याचा मला आधार, माझ्या पुढच्याला आधार. जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही. प्रत्येकजण पूर्वीच्या लोकांच्या खांद्यावर उभा राहतो व आणखी दूरचे पाहतो. ज्ञानाचा इतिहास म्हणजे सहकार्याचा इतिहास, अखंड परंपरेचा इतिहास.
खरा गुरू आपल्या पुढे जाणा-या शिष्याचे कौतुकच करतो. शिष्याकडून पराजय होण्यात गुरूला अपार आनंद होतो. कारण शिष्याचा विजय हा गुरूचाच विजय असतो. गुरूने जे पेरले त्याचाच तो विकास असतो. गुरू ज्या ज्ञानाची उपासना करीत होता, त्या ज्ञानाचीच ती पूजा असते. त्या ज्ञानाचेच ते वाढते वैभव असते. अण्णासाहेब पटवर्धन लोकमान्यांना शत आशीर्वाद देत व गोखले गांधीची स्तुतिस्त्रोत्रे गात.