धर्ममय अर्थशास्त्र, त्याचप्रमाणे धर्ममय कामशास्त्र. भारतीय संस्कृती कामाला गाडू पाहात नाही. काम म्हणताच कानांवर हात ठेवू पाहणारी ती नाही. मानवी विकारांची व्यवस्था लावणारी ही संस्कृती आहे. विकारातून विकास करू पाहणारी ही संस्कृती आहे. श्रीमद्भगवद्गीता म्हणते:

''धर्माऽविरूध्दो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ।''

ज्या कामाचा धर्माशी विरोध नाही तो मर्यादित काम म्हणजे माझेच स्वरूप. तो मर्यादित काम म्हणजे मी परमेश्वर. ती माझीच एक दिव्य विभूती!  भारतीय संस्कृतीने कामालाही धर्माचे अधिष्ठान दिले. आणि धर्म म्हणजे समाजाचे धारण, मानवजातीचे धारण. माझ्या विषयभोगाने समाजाचे स्वास्थ्य बिघडता कामा नये, समाजात अशांती उत्पन्न होता कामा नये, समाजात दु:ख, दैन्य, दास्य, द्रारिद्रय उत्पन्न होता कामा नये, माझा विषयभोगही समाजाला सुखकर झाला पाहिजे.

काम या शब्दांत पंचेंद्रियांचे जरी भोग असले, तरी मुख्यत: स्त्री-पुरुष-संबंधच आपल्या दृष्टीसमारे उभा राहतो. आणि स्त्री-पुरुषसंबंध ही महत्त्वाचीच गोष्ट आहे. या संबंधावर समाजोच स्वास्थ्यच नव्हे. तर समाजाचे अस्तित्तवही अवंलबून आहे.

'अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ।'

सदैव विषयातच जो रमला, तो दीन-दुबळा होणार. त्याला उत्साह राहणार नाही. मग समाजाची सेवा तो काय करणार? स्वत:चे कर्म नीट कसे पार पाडणार? समाजाचे कर्म नीट पार पाडता यावे म्हणून आपण मर्यादितच विषयसुख घेतले पाहिजे.

स्त्री; पुरुषांचे  परस्परसंबंध प्रेमाचे हवेत. स्त्री म्हणजे काही सत्तेची एक वस्तू नाही. तिला हृदय आहे, बुध्दी आहे, तिला भावना आहेत. तिला स्वाभिमान आहे. तिला आत्मा आहे. तिला सुख-दु:ख आहे. या सर्व गोष्टीची जाणीव पुरुषाने ठेविली पाहिजे. स्त्री म्हणजे जगातील महान शक्ती. या शक्तीशी वागणा-या पुरुषाने शिव झाले पाहिजे. शिव व शक्ती यांच्या प्रेमावर सर्व समाजाचा प्राण अवलंबून आहे. शिव व शक्ती यांच्या प्रेममय परंतु संयममय संबंधापासूनच कर्तृत्ववान कुमारांचा संभव होत असतात. शौर्य-धैर्याचे सागर, विद्येचे आगर असे सत्पुत्र जन्माला येतात.

मनुष्याने नेहमी आपल्या कृतीचा परिणाम काय होईल याचा विचार करुन त्या कृतीला आरंभ केला पाहिजे. स्त्री-पुरुषसंबंधापासून मुलेबाळे जन्मणार. एक मूल जन्माला घालणे म्हणजे एक देवाची मूर्ती निर्माण करणे होय. या देवाची आपणांस नीट काळजी घेता येईल का, याचा विचार आईबापांनी करावयास हवा. नाही तर घरात खंडीभर मुले चिरचिरी, रोगी दिसत आहेत, त्यांना ना शिक्षण, ना संरक्षण. अशाने सुखाचा संसार कसा होणार, आणि तो समाजही कसा तेजस्वी राहणार? त्या समाजाचे धारण कसे होणार?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel