साम्यवाद तरी आणा, नाही तर संततिनियमनाचा तरी प्रचार गोरगरिबांत करा. तो प्रचार करणे म्हणजे आज महान धर्म आहे. परंतु हे दोन्ही महान धर्म न करता त्या दोन्ही गोष्टींना अविवेकाने नावे ठेवणे हे जडत्वाचे लक्षण आह. हृदये दगड झाल्याची ती खूण आहे. यात ना धर्म, ना माणुसकी, ना बुध्दी, ना शास्त्र हा राक्षसीपणा आहे.

स्त्रियांच्या मानाची तर कोणीच काळजी घेत नाही. बिचारीला पोटभर खायला नाही, विश्रांती नाही; आणि पुन:पुन्हा बाळंतपणे. आसन्नप्रसवा अशी स्त्री अपार कष्ट करताना पाहून कोणाचे डोळे भरून येणार नाहीत? स्त्रियांची विषयनिवृत्ती होते, परंतु पुरुषाची होत नाही. एक थोर माता माझ्याजवळ म्हणाली, ''आपल्या लेकी-सुनांची मुले पाळण्यात असताना स्वत:च्या मुलांचेही पाळणे शेजारी असावेत, याची मला लाज वाटते. परंतु काय करायचे? त्यांच्यासाठी सारे सहन करायचे. त्यांचे पाऊल वाकडे पडू नये म्हणून जपायचे!''

ते उद्गार मी कधी विसरणार नाही. स्त्रियांना विसावाच पुरुष देत नाहीत. स्त्रियांनाही कामवासना असते. परंतु कामवासनेचे नियमन जोपर्यंत करता येत नाही. आणि समाजातही जोपर्यंत विषमता आहे, तोपर्यंत संततिनियमन करुन भोग भोगणे हाच मर्यादित धर्म ठरतो.

समाजात रोगी मुले उत्पन्न होऊ नयेत. याची धर्ममय कामशास्त्र काळजी घेईल. आपण पशूंची अवलाद चांगली व्हावी म्हणून खटपटी करीत आहोत; पंरतु माणसांची अवलाद चांगली निघावी म्हणून कोण शास्त्रीय दृष्टीने खटपट करणार? एकदा गोरक्षणाच्या सभेला अध्यक्ष व्हा म्हणून विवेकानंदांना सांगण्यात आले. ते म्हणाले, ''मानवरक्षणाच्या सभेचा मी अध्यक्ष होईन. '' याचा अर्थ ते गोरक्षण कमी मानीत होते असे नाही. परंतु माणसे पशूसारखी झाली आहेत, याची कोणी काळजी घ्यावयाची?

म्हणून जर्मनीत नालायक पुरुषांची कायद्याने खच्ची करण्यात आली. समाजाच्या कल्याणासाठी मनुष्य स्वत:वर विवेकाचे बंधन जर न घालील तर कायद्याने बंधन त्याच्यावर लादावे लागेल. घोड्याला लगाम द्यावा लागतो. त्याचप्रमाणे कायद्याचा काटेरी लगाम मनुष्यरूपी पशूला घालणे आवश्यक होईल! प्रेम, विवके, संयम या गोष्टी मनुष्याला शेवटी कायद्याने शिकवाव्या लागणार का?  मनुष्याने सर्वांसाठी झिजले पाहिज;  परंतु तो झिजत नाही, मग कायद्याचे व क्रांतीचे साम्यवादी सरकार येते आणि कायद्याने झिजवायला लावते. जे रोगी आहेत त्यांनी संतती निर्माण करू नये. परंतु ते ऐकत नाहीत. मग कायद्याने त्यांना खच्ची करणे भाग पडते.

म्हणून आपल्या स्मृतीतून विवाह करण्याच्या आधी वधूवरांची भिषग्रत्नांकडून नीट परीक्षा केली जावी असे सांगितले आहे.

''स्त्रीत्वे पुस्त्वे परीक्षित:''

वधू गर्भधारणक्षम आहे ना, काही दोष नाही ना. काही रोग नाही ना, हे आधी परीक्षून घ्यावयाचे. तसेच वर नपुंसक नाही, रोगी नाही, उत्कृष्ट शक्तीने संपन्न आहे, तपासून घ्यावयाचे, आणि मग लग्न लावावयाचे. तरच ते लग्न समाजाच्या कल्याणाचे व वधूवरांनाही आनंद देणारे होईल, परंतु मला कितीतरी उदाहरणे माहित आहेत. की क्लीब पुरुषांनी पुन:पुन्हा लग्ने केली आहेत! परंतु क्लीबाने शतदा लग्ने केली म्हणून का संतती होणार आहे?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel