स्त्री-स्वरूप

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूकसेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप्रमाणे भारतीय स्त्रिया कुटुंबात सतत कष्ट करून, निमूटपणे श्रम करून आनंद निर्माण करीत असतात. प्रत्येक कुटुंबात तुम्ही पाहा. पहाटेपासून रात्री अकरा वाजेपर्यत राबणारी ती कष्टाळू मूर्ती तुम्हाला दिसेल. क्षणाची विश्रांती नाही, फारसा आराम नाही.

सीता-सावित्री, द्रोपदी-गांधारी हे त्यांचे आदर्श आहेत. त्यागमूर्ती व प्रेममूर्ती अशी ही भारतीय स्त्रियांची दैवते आहेत. सीता म्हणजे चिरयज्ञ. भारतीय संस्कृतीत स्त्रीचे जीवन म्हणजे पेटलेले होमकुंड आहे. लग्न म्हणजे यज्ञ. पतीच्या जीवनाशी संलग्न झाल्यापासून स्त्रीच्या जीवनयज्ञास आरंभ होतो आणि हा यज्ञ मरणानेच शान्त होतो.

स्त्री म्हणजे मूर्त कर्मयोग. तिला स्वतंत्र अशी जणू इच्छाच नाही. पतीच्या व मुलांच्या इच्छा म्हणजेच तिची इच्छा. पतीला आवडेल ती भाजी करा, पतीला आवडेल तो खाद्यपदार्थ करा, मुलांना आवडेल ते पक्वान्न करा. ज्या दिवशी घरात पती जेवावयास नसतो. त्या दिवशी पत्नी स्वत: भाजी वगैरे करणार नाही. पिठले ढवळील, नाही तर लोणच्याची चिरी घेईल. स्वत:साठी काहीएक नको. पतीला आवडणारे लुगडे नेसणे. पतीला आवडणारे पुस्तक वाचणे, पतीला आवडणारे गाणे गाणे, पतीसाठी विणणे, पतीसाठी शिणणे, त्याचे कपडे स्वच्छ ठेवणे. त्याच्या प्रकृतीस जपणे. पती हेच पत्नीचे दैवत.

“चरणांची दासी” हे त्याचे भाग्य! कबीर ईश्वराला म्हणतो:
“मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा। तू साहिब मेरा।”

भारतीय स्त्री न कळत, न वळत पतीला हेच म्हणत असते. ती सर्वस्व पतीला अर्पण करते. सर्वस्वाने त्याची पूजा करते.

भारतीय स्त्रीने स्वत:ला पतीत मिळवून टाकिले आहे; परंतु पतीने काय केले आहे? भक्त देवाचा दास होतो. परंतु देवही मग भक्ताच्या दारात तिष्ठत उभा असतो. नारद एकदा विष्णूच्या भेटीसाठी गेले, तेव्हा भगवान विष्णू पूजा करीत होते! नारदाला आश्चर्य वाटले. सारे त्रिभुवन ज्याची पूजा करते तो आणखी कोणाची पूजा करीत बसला आहे? भगवान विष्णू बाहेर येऊन म्हणाले:

“प्रल्हादनारदपराशरपुंडरीक
व्यासाम्बरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ।।
रूक्माङ्गदार्जुनवसिष्ठबिभीषणादीन् ।।
पुण्यानिमान् परमभागवतान् स्मरामि ।। ”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel