नाना प्रकारचे खेळ भारतवर्षात होते. साधे सुटसुटीत सांघिक खेळ. हुतूतू, हमामा, सुरपाट्या, कितीतरी प्रकार होते. श्रीकृष्ण खेळांचा भोक्ता होता. बाळगोपाळ जमवून तो खेळ मांडी. खेळासारखी पवित्र वस्तू नाही. निवेदितादेवींनी एके ठिकाणी म्हटले आहे, 'कृष्णाने खेळांना दिव्यता दिली.'--' 'कृष्ण म्हटले की त्याची क्रीडा आठवते. कृष्ण म्हणजे ज्याप्रमाणे गायीची आठवण; त्याचप्रमाणे कृष्ण म्हणजे नदीतीरावरचा खेळ.

खेळात आपण अनेक गोष्टी शिकतो. लहान-थोर सारे विसरतो. आसक्ती विसरतो. विरुध्द पक्षात माझा मित्र किंवा भाऊ असला, तरी तो आता माझा भाऊ किंवा मित्र नाही. त्यालाही धरावयाचे; पकडावयाचे. खेळ म्हणजे निष्ठा, खेळ म्हणजे सत्यता; खेळ म्हणजे स्वत:चा विसर.

मुलांच्या खेळाप्रमाणे मुलींचेही खेळ होते. नाना प्रकारच्या फुगड्या, नाना प्रकारचे पिंगे. यांमुळे शरीरास सौष्ठव येई. अंगात चपळाई येई. नागपंचमीच्या वगैरे दिवशी मुले-मुली झोके घेतात. टिप-यांचा खेळ मुलेही खेळतात, मुलीही खेळतात.

निरनिराळ्या प्रकारची आसने शरीराच्या आरोग्यार्थ शोधण्यात आली आहेत. आसनांनी थोडक्या वेळात भरपूर व्यायाम होतो. आसनांमध्ये प्राणायामाचीही जोड असते. भुजंगासन, गरुडासन, कुक्कुटासन, शीर्षासन, वगैरे पाच-दहा आसने दररोज नियमित केली, तर प्रकृती निकोप राहिल्याशिवाय राहणार नाही.

काम करताना मिळणारा व्यायाम हा सर्वोत्कृष्ट होय. व्यायाम हासुध्दा काही तरी निर्माण करणारा असावा. शाळेतील मुलांना बागेत पाणी घालावयास लावावे; खणावयास सांगावे; व्यायामापरी व्यायाम होतो व सृष्टीत फुलेफळेही निर्माण होतात. कण्वाच्या आश्रमात शिकावयास असलेल्या प्रियंवदा, अनसूया वगैरे विद्यार्थिनी झाडांना पाणी घालीत आहेत, असे शाकुंतलात दाखविले आहे. पाणी घालून शकुंतला दमते व घामाघूम होते.

स्वत:चे कपडे धुवावेत, स्वत:ची खोली स्वच्छ करावी, स्वत:चे भांडे घासावे, घरात पाणी भरावे, अशा रीतीने सहज व्यायाम होतो. आपल्याकडे जुने लोक असेच श्रमाचे भोक्ते होते. ते पोश्ये नव्हते. श्रमांचा कमीपणा त्यांना वाटत नसे.

सांदीपनींच्या आश्रमातील विद्यार्थी पाणी भरीत, लाकडे फोडीत, जंगलात जाऊन मोळया आणीत. हा विद्यार्थी श्रीमंत व हा गरीब असा भेद नसे. गरीब सुदामा व सुखी कृष्ण रानात बरोबर जात. गुरूजवळ सारे समान. सारे श्रम करीत. गरिबांचे काय, श्रीमंतांचे काय, शरीर निरोगी हवे. आरोग्य सर्वांना हवे. प्राचीन भारतीय आश्रमांत विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना काटक बनविण्यात येईल. थंडी असो, वारा असो, ऊन असो, पाऊस असो, त्याची त्यांना चिंता वाटत नसे. अंगाला वारा लागला पाहिजे, ऊन लागले पाहिजे. पाऊस पडू लागला म्हणजे मुलांना सुट्टी द्यावी; असे मनुस्मृतीत सांगितले आहे. नाचू दे पावसात. पहाटे मुले उठत. नदीवर स्नानास जात. तेथे डुंबत, पोहत. मग नमस्कार घालीत. त्यानंतर दूध पीत. असा भारतीय संस्कृतीचा प्रकार आहे.

आपण जुने लोक पाहिले तर त्यांची शरीरे निरोगी दिसतात. साठी उलटली तरी डोळ्यांस आरशी नाही. दात सारे बळकट, कान तीक्ष्ण, पचनेन्द्रिये चांगली, हातपाय बळकट. पाच-दहा कोस सहज चालतील असे दिसतात. तशाच जुन्या बाया..

परंतु हल्ली शरीरे म्हणजे सापळे झाले आहेत. बसके गाल, खोल गेलेले डोळे; हातापायांच्या काड्या, डोळे मंद झालेले, दात किडलेले, शौचाची सदैव तक्रार, असा सर्वत्र देखावा दिसेल. सारे पोषाखी सरदार ! पाऊस लागला की आले पडसे, थंडी लागली की आला हिवताप; ऊन लागले की आली भोवळ; असे आपण झालो आहोत. वरच्या पांढरपेशांची ही अशी दैना आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel