जगन्नाथपुरीजवळचा निळा निळा सागर पाहून हा माझा मेघश्याम कृष्णच पसरला आहे असे मनात येऊन त्या समुद्रात बाहू उभारून नाचत नाचत फिरू पाहणारे थोर बंगाली वैष्णव वीर चैतन्य ! विषाचा पेला पिणारी, कृष्णसर्पाला शालिग्राम मानणारी, भक्तिप्रेमाने नाचणारी मीरा ! स्वामिकार्यार्थ स्वत:च्या पुत्राचे बलिदान करणारी पन्ना !

दिवसाच्या चोवीस तासांऐवजी पंचवीस असते तर प्रजेचे कल्याण आणखी करता आले असते असे म्हणणारा विश्वभूषण राजा अशोक !
प्रत्येक पाच वर्षांनी सर्व खजिना वाटून देऊन केवळ अकिंचनत्वाने शोभणारा राजा हर्ष !
रानांत कंदमुळांवर जगणारा व गवतावर झोपणारा स्वातंत्र्यसूर्य राणा संग !
प्रजेने लाविलेल्या झाडासही हात लावू नका असे आज्ञापत्र काढणारे व परस्त्री मातेप्रमाणे मानणारे थोर शिवछत्रपती !
धन्याच्या फळबागेतील एक फळ हातून तोडले गेले, म्हणून स्वत:चा हात छाटू पाहणारे दादोजी कोंडदेव !
"मी पाच तोफा ऐकल्या; आता सुखाने मरतो !' असे म्हणणारे बाजी !
"आधी लग्न कोंडाण्याचे, मग रायबाचे !' असे म्हणणारा महात्मा वीरमणी तानाजी !
धर्मासाठी राईराईएवढे तुकडे करून घेणारा शौर्यमूर्ती संभाजी !
स्वामिकार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडो बल्लाळ !
"बचेंगे तो और भी लढेंगे', म्हणणारा शूर दत्ताजी !
"तोंडातील कफ शौचाच्या द्वारा पडेल असे करा, म्हणजे माझे तोंड रामनाम घ्यावयास मोकळे राहील', असे वैद्यांना विनवणी करणारे पुण्यमूर्ती पेशवे पहिले माधवराव !
"तुम्हाला देहान्त प्रायश्चित्तच पाहिजे', असे राघोबाला सांगणारे थोर रामशास्त्री !
प्रजेला त्रास देणा-या स्वत:च्या पुत्राचाही त्याग करणारी देवी अहिल्याबाई !
"माझ्या देहाला मरताना परस्पर्श होऊ देऊ नका', असे सांगणारी रणरागिणी राणी लक्ष्मी !
"मी योग्य तेच केले. खुशाल फाशी द्या.' असे सांगणारा तात्या टोपे !
अशी ही भारतीय परंपरा आहे, अशी ही ध्येयपूजा आहे ! भारताच्या प्रांताप्रांतांत अशी ध्येयपूजक नरनारीरत्ने सतत निघाली आहेत.

भारतवर्ष आजही कांही वांझ नाही. या पारतंत्र्याच्या सर्वभक्षक काळातही भारताने सदैव हृदयाशी धरावी, अशी ध्येयनिष्ठ माणसे येथे झाली आहेत.

"मला फाशी दिले तरी चालेल, परंतु बंडवाल्या फडक्याचे वकीलपत्र मी घेणार', असे म्हणणारे स्वदेशीचे आचार्य सार्वजनिक काका ! पुत्र प्लेगाने आजारी असतानाही शांतपणे 'केसरी लिहिणारे लोकमान्य !' आज दोन तपे केवळ ध्यानात रमणारे अरविंद ! 'सरकारी धोरणाप्रमाणे पत्र चालवा, म्हणजे तुम्हाला मदत देऊ', असे बंगालचा गव्हर्नर सांगत असता 'देशात एक तरी प्रामाणिक संपादक नको का ?' असे म्हणून निघून जाणारे 'अमृतबझार पत्रिकेचे' आद्य संपादक बाबू शिशिरकुमार घोष ! नागपूरच्या 1920 मधील राष्ट्रीय सभेत असहकारिता ठराव मांडीत असता 'अहो, तुम्ही अजून बॅरिस्टरी चालवीत आहात !' असे श्रोत्यांतून कोणी म्हणताच 'चित्ररंजन जे बोलतो ते करतो' असे गर्जणारे व दुस-याच दिवशी सर्वस्व त्याग करणारे देशबंधू ! एके दिवशी मनात विषयवासना आली म्हणून स्वत:वर संतापून तापलेल्या तव्यावर जाऊन बसणारे स्वामी विवेकानंद ! आईने बोलावले, परंतु साहेब जाऊ देत नाही, असे पाहताच राजीनामा देणारे व वाटेत प्रचंड पूर आला असताही नदीत आईच्या नावाने उडी टाकणारे ईश्वरचंद्र विद्यासागर ! 'माझ्या पत्नीकडे गेली वीस वर्षे मी माता म्हणूनच पाहात आहे', असे सीलोनमध्ये सांगणारे महात्माजी ! 'चलाव तेरी गोली' असे म्हणून गुरखा शिपायासमोर आपली विशाल छाती उघडी करणारे स्वामी श्रध्दानंद ! 'गांधी टोपी काढ, नाही तर गोळी झाडतो', असे पिस्तूल रोखून सांगितले जात असताही अविचल राहणारे सोलापूरचे वीर तुळशीदास जाधव ! मोटरीखाली चिरडून घेणारा हुतात्मा बाबू गेनू ! गीतेचे स्मरण होताच, रामनाम मनात येताच, तनू पुलकित होऊन ज्याच्या डोळयांतून घळघळ अश्रुधारा वाहू लागतात, असे ते वर्ध्याचे ज्ञान-कर्म-भक्तीची मूर्ती पूज्य विनोबाजी ! 'जगातील कोणती शक्ती माझ्या मोटरीवरचा झेंडा काढते बघू दे', असे गर्जणारे निर्भयमूर्ती ध्येयरत जवाहरलाल !

किती ज्ञान-अज्ञात नावे ! भारतीय संस्कृती मेली नाही. स्वातंत्र्य व पारतंत्र्य या लाटा आहेत ! कधी जय वा कधी पराजय ! परंतु राष्ट्राचे चारित्र्य मरता कामा नये. पूर्वजांनी जे चारित्र्यधन मिळविले ते गमावता कामा नये. ते चारित्र्य वाढविले पाहिजे. ते चारित्र्य जोपर्यंत वाढत आहे, तोपर्यंत भारतवर्ष जिवंत आहे. ते चरित्र्य जोपर्यंत जिवंत आहे, प्रकट होत आहे, तोपर्यंत भारतीय संस्कृती जिवंत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel