सत्पुत्र सत्कुळात निर्माण होतो यातील अर्थ हाच होय. तपस्येच्या पोटी सदंकुर निर्माण होतात. ज्या समाजात तपस्या आहे, तळमळ आहे, धडपड आहे, ध्येयाचा ध्यास आहे, त्या समाजात महात्मे अवतीर्ण होतात. भगवान बुध्द जन्माला येण्यापूर्वी भारतात प्रचंड वैचारिक चळवळ सुरू होती. हे खरे का ते खरे, याचे वाद उत्कटपणाने ठायी ठायी चालले होते. ठिकठिकाणी चर्चा व अभ्यासमंडळे दिसत होती. अशा त्या प्रचंड वैचारिक खळबळीतून भगवान बुध्द जन्माला आले. त्या वैचारिक लाटेवरचा शुध्द-स्वच्छ फेस म्हणजे हा महान सिध्दार्थ !

आपल्या अनंत धडपडींना वळण देणारा, आपल्या अपरंपार प्रयत्नांना अर्थ प्राप्त करून देणारा असा महापुरुष पाहिला, म्हणजे हृदय उचंबळून येतो. आईला आपल्या नऊ मास वाहिलेल्या कष्टांचे व प्रसववेदनांचे प्रत्यक्ष गोरेगोमटे साजिरेगोजिरे फळ पाहून जसे प्रेमाचे भरते येते, तसेच जनतेला होते. जनता महापुरुषाची जननी असते. या महापुरुषाच्या नामाचे उच्चारण करताना जनतेला अपूर्व स्फूर्ती येते.

नाम जपण्यात काय अर्थ आहे, असे आपण सहज म्हणतो. परंतु नाम जपनात अपार सामर्थ्य आहे, 'वन्दे मातरम्' मंत्राचा जप करीत लहान मुले फटके हसत खातात ! 'भारतमाता की जय' म्हणत हुतात्मे फाशी जातात ! 'महात्मा गांधी की जय' म्हणत स्त्रिया लाठीमार शिरावर घेतात ! 'इन्किलाब जिंदाबाद' म्हणत क्रांतिकारक गोळीसमोर उभे राहतात !

नामजपन म्हणजे ध्येयाचे जपन. महात्मा गांधी म्हणजे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य ! रामनाम म्हणजे रावणाचे निर्दालन व पददलितांचे उध्दरण. गोपाळकृष्ण म्हणजे भेदातीत प्रेम, स्त्री-शूद्र-वैश्यांस प्रेमाने समान लेखणे. कार्ल मार्क्स की जय, लेनिन की जय, म्हणजे सर्व श्रमजीवी लोकांचे महान वैभव. त्या एकेका नावात अनंत अर्थ असतो, त्या एका नामोच्चारणात अपार स्फूर्ती असते. माझ्या ध्येयाचे ते मूर्तिमंत स्मरण असते. ते स्मरण माझ्या मरणावर स्वार होते.

अवतारी पुरुष तरी निर्भय का असतो ? त्याच्या ठिकाणी ती वज्रालाही वाकविणारी शक्ती कोठून येते ? अवतारी पुरुषाला माहीत असते, की मी एकटा नाही. मी म्हणजे हे लाखो लोक. या लाखो लोकांचे मी प्रतीक आहे. लाखो लोकांशी मी जोडलेला आहे. लाखो लोकांचे लाखो हात माझ्याभोवती आहेत. माझ्या अंगाला हात लावणे म्हणजे लाखो लोकांच्या अंगाला हात लावणे आहे. माझा अपमान करणे म्हणजे लाखो लोकांचा तो अपमान आहे.

आज महात्मा गांधी का एकटे आलेत ? लाखो चरख्यांवर सूत कातणारे लाखो लोक त्या सुताने त्यांच्याशी चिरबध्द झालेले आहेत. ग्रामसेवा करणारे हजारो लोक महात्माजींशी जोडलेले आहेत. हरिजनसेवा करणारे शेकडो बंधू महात्माजींशी जोडलेले आहेत. हिंदु-मुस्लिम ऐक्य करू पाहणारे, जातीय तंटे मिटविणारे, दारूबंदी करू पाहणारे, सारे महात्माजींशी जोडलेले आहेत. या कोट्यवधी लोकांची ही जनताजनार्दनाची सुदर्शनशक्ती महात्माजींच्या भोवती फिरत आहे.

आणि जवाहरलाल का एकटे आहेत ? पददलितांची बाजू घेणारे, मदोन्मत्तांचा व खुशालचेंडूंचा नक्षा उतरू पाहणारे, श्रमाची महती ओळखणारे, शेतकरी-कामकरी लोकांसाठी बलिदान करू पाहणारे, त्यांची संघटना करणारे, मानव्याचा खरा धर्म ओळखणारे, बाकी सारे दंभ दूर भिरकावून देणारे असे हजारो लोक जवाहरलालांभोवती उभे आहेत, आणि ज्यांच्यासाठी जवाहरलाल जळफळत आहेत, तडफडत आहेत ते कोट्यवधी हिंदु-मुसलमान भाई त्यांच्याशी जोडलेले आहेत. म्हणून जवाहरलाल यांच्या शब्दात तेज आहे, वाणीत ओज आहे, दृष्टीत तेजस्विता आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel