जीवनात हेच मुख्य काम आहे. सर्व इंद्रिये, सर्व वृत्ती यांना एका महान ध्येयाच्या भजनी लावणे, जीवनात स्थिरता आणणे. नदी सागराकडे जाणार, पतंग आकाशाकडे जाणार; भुंगा कमळाकडे वळणार, मोर मेघाकडे वळणार. आपल्या सर्व वृत्ती, सारी शक्ती कोणत्या तरी एका ध्येयाकडे घेऊन जाणे हे कार्य असते.

श्रीकृष्ण हे काम करतो. सर्व प्रवृत्तींना खेचून ध्येयाकडे त्यांना तो वळवितो. यामुळे जीवनातील अशांती लयाला जाते. एकच सूर हृदयात घुमू लागतो. परंतु हे काम सोपे नाही. हृदयात ऐक्याची मुरली वाजू लागण्यापूर्वी कृष्णाला कितीतरी काम करावे लागते.

अहंकाराच्या कालिया नाहीसा करावा लागतो. आपला अहंकार सारखा फूत्कार करीत असतो. आपल्या आजूबाजूस कोणी येऊ शकत नाही. मी मोठा, मी श्रेष्ठ, इतर सारे मूर्ख, असल्या अहंकाराच्या शेजारी कोण राहणार ?

"समस्तांसि भांडेल तोचि करंटा'
अशा सृष्टीत सर्वांशी भांडत जाणारा हा अहंकारी एकटा जीव कधी मुक्त होणार ?
श्रीकृष्ण या अहंकाराच्या फणेवर उभा राहतो. जीवन-यमुनेतून या कालियाला तो हाकलून देतो.
या जीवन-गोकुळातील द्वेषमत्सरांचे वणवे कृष्ण गिळून टाकतो. दंभ, पाप यांचे राक्षस नाहीसे करतो.

अशा प्रकारे जीवन शुध्द होते. एक ध्येय दिसू लागते. त्या ध्येयाचा ध्यास जीवाला लागतो. जे मनात तेच ओठांत, तेच हातात. आचार, उच्चार व विचार यांत ऐक्य येते. हृदयातील गडबड थांबते. सा-या तारा ध्येयाच्या खुंटीला नीट बांधल्या जातात. त्यांतून दिव्य संगीत स्त्रवू लागते.
गोकुळात कृष्णाची मुरी केव्हा वाजू लागली ?

शरद ऋतु उदय चंद्राचा
वनिं वृंद उभा गवळणिंचा
सुगंध सुटत पवनाचा
ये वास मलयगिरीवरचा


अशी ती प्रसन्न पावन वेळा होती. हृदयाकाशात शरद् ऋतू पाहिजे. हृदयात वासना-विकारांची वादळे आता नाहीत. स्वच्छ आकाश आहे. शरद्र ऋतूमध्ये आकाश निरभ्र असते. नद्यांतील खळमळ खाली बसून स्वच्छ शंखासारखे पाणी वाहात असते. आपले जीवन असे झाले पाहिजे. आसक्तीचे ढग जमा होता कामा नयेत. अनासक्त रीतीने केवळ ध्येयभूत कर्मांतच जीव रंगून गेला पाहिजे. शुध्द आचार व शुध्द विचार रात्रंदिवस होत राहिला पाहिजे.

शरद् ऋतू आणि शुक्लपक्ष आहे. प्रसन्न चंद्र उगवला आहे. चंद्र म्हणजे मनाची देवता. चंद्र उगवला आहे; म्हणजे मनाचा पूर्ण विकास झाला आहे. सद्भाव फुलला आहे. सद्विचारांचे स्वच्छ चांदणे पडले आहे. अनासक्त हृदयाकाशात शीलाचा चंद्र शोभत आहे. प्रेमाची पूर्णिमा आली आहे.

अशा वेळेस सा-या गोपी. जमतात. सा-या मन:प्रवृत्ती कृष्णाभोवती जमतात. हृदयात व्यवस्था लावणारा, गोंधळातून सुंदरता निर्माण करणारा तो श्यामसुंदर कोठे आहे, अशी त्यांना तळमळ लागते. त्या ध्येयगोपाळाची मुरली ऐकावयास सा-या वृत्ती अधीर होतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel