परिशिष्ट

१. काळाची कल्पना
भारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापध्दती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस ! या कल्पनेत मोठे स्वारस्य आहे. मनुष्य जितका विशाल दृष्टीचा, तितकी त्याची काळाची कल्पनाही विशाल असते. महात्माजी म्हणाले, 'मी सहा महिन्यांतच स्वराज्य देतो.' परंतु हे महात्माजींचे सहा महिने. पन्नास वर्षांत राष्ट्राला स्वराज्य मिळाले, तरी ते सहा महिन्यांतच मिळाल्यासारखे आहे. राष्ट्राच्या आयुष्यात शतके म्हणजे क्षण असतात. व विश्वाच्या इतिहासात युगे म्हणजे क्षण असतात.

महापुरुष या दृष्टीने पाहात असल्यामुळे ते निराश होत नसतात. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की जातो तो क्षण महत्त्वाचा मानावयाचा नाही. याच क्षणी कार्य झाले पाहिजे असा तर निश्चय हवा. परंतु त्याबरोबरच, एकनिष्ठ प्रयत्नाबराबर काळ अनंत आहे ही कल्पना जवळ असावी. जगात काही फुकट जाणार नाही. प्रयत्नवाद व आशावाद या दोहांचा समन्वय भारतीय संस्कृती करते.

२. श्राध्द
पूर्वजांबद्दल अत्यंत आदर पौर्वात्यांत आहे. चीन व जपान या देशांत वृध्दपूजा हा धर्मच झाला आहे. भारतीय संस्कृती वृध्दांबद्दल आदर शिकविते. तुम्ही भारतात कोठेही जा, तेथे वृध्दांबद्दलची पूज्यबुध्दी दिसेल. खेड्यांत तुम्ही जा. म्हाता-या मंडळींस मोठ्या आदराने तेथे वागवितात. म्हातारा मनुष्य भेटताच 'या दाजी' असे म्हणून घोंगडी पसरतात.

घरातही वृध्दांना फार मान. काही समारंभ असो, आधी त्यांना नमस्कार. त्यांना लोडाशी बसवितील, त्यांचा आशीर्वाद घेतील. त्यांचे पाय चेपतील, त्यांच्या गोष्टी ऐकतील.

वृध्दपूजा म्हणजे ज्ञानपूजा. ज्ञानपूजा म्हणजे अनुभव. अनुभव म्हणजे ज्ञान.

त्या शुभ्र केसांत अनुभवाचे शुध्द ज्ञान असते. त्या वाकलेल्या पाठीवर अनुभवांचे मौल्यवान गाठोडे असते. त्या सुरकुतलेल्या शरीरावर कित्येक वर्षांचा इतिहास असतो. पूर्वीची परंपरा वृध्दांना माहीत असते. त्यांनी तो परंपरेचा दीप स्वत: पाजळून नवीनांच्या हातांत दिलेला असतो.

भारतीय संस्कृतीत श्राध्ददिन आहे. श्राध्द म्हणजे पूर्वजांबद्दल आदर. महात्म्यांचे श्राध्द सर्वांनी करावयाचे. श्रीरामचंद्र किंवा श्रीकृष्ण यांचे आपण श्राध्द करीत नसतो, परंतु त्यांची जयंती करीत असतो. ज्यांना आपण अवतार मानिले, त्यांची जयंती करावयाची. कारण जन्मच मंगलासाठी असतो.

भवेहि लोकाभ्युदयाय तादृशाम ।

ते जन्मताच दिशा प्रसन्न होतात, वारे मधुर वाहतात. परंतु इतर लोकांचे तसे नाही. इतर लोक कसे होते हे ते मेल्यावर कळते. त्यांची सारी आयुर्मर्यादा पाहून मग त्यांचे मोल ठरवावयाचे असते. श्रीज्ञानदेव, श्रीतुकाराम, श्रीशिव छत्रपती यांची आपण पुण्यतिथी साजरी करतो. कारण जन्मत:च त्यांचा मोठेपणा ज्ञात नव्हता तो पुढे ज्ञात झाला. श्रीशिवछत्रपतीही पुढे अवतार समजले जाऊ लागले व त्यांची जयंती करण्यात येऊ लागली.

थोर महात्मे हे कोण्या जातीचे, कोण्या गावाचे नसतात. ते सर्वांचे असतात. म्हणून त्यांच्या श्राध्दांत सर्वांनी गोळा व्हावयाचे. काही महात्मे जगाचे असतात. काही देशाचे असतात. काही प्रांताचे असतात. काही गावाचे असतात. त्यांचे त्यांचे उत्सव त्या त्या मानाने साजरे होतात.

परंतु आपले आई-बाप आपल्याला मोठेच आहेत. आपले पूर्वज आपणांस पूज्यच आहेत. ते जगाला माहीत नाहीत, परंतु आपणांस माहीत असतात. त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. कृतज्ञतेसारखी मधुर वस्तू क्वचितच असेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel