आपले मन म्हणजे जणू उकिरडा ! सा-या जगाची घाण जणू तेथे येऊन पडलेली असते. आपले मन म्हणजे जणू चावडी किंवा चव्हाटा. सर्वांची चर्चा या मनात सदैव चाललेली. अमेरिकेतील निसर्गप्रेमी थोरा याने एके ठिकाणी असे म्हटले आहे : 'Our mind is like a bar-room !"- वकिलांच्या बैठकीत सा-या जगाच्या उठाठेवी चालतात, तसे आपल्या मनाचे आहे.

परंतु या मनाला स्वत:च्या आत्म्याची ओळख नसते. त्याला स्वत:च्या जीवनात काही आनंदच नाही. आनंदाचा झरा आत आहे याची जाणीव त्याला नाही. त्याचा आनंद परवश आहे. वर्तमानपत्र वाचले नाही की चुकल्यासारखे होते. कोणाचे पत्र आले नाही म्हणजे वाईट वाटते. ज्याचे टपाल रोज पुष्कळ येते, त्याला वाटते आपण केवढे मोठे ! जगाशी किती संबंध !

परंतु हा मोठा मनुष्य दरिद्री असतो ! त्याला त्याच्या आत्म्याचे एकही पत्र मिळत नसते. त्या आत्म्याची एकही हाक त्याला ऐकू येत नसते. या आत्म्याची पत्रे ज्याला येऊ लागली, त्याच्याहून भाग्यवान कोण ? या आत्म्याची नेहमी उपेक्षा होत असते. तुरुंगात ज्याप्रमाणे कैद्याची उपेक्षा हेते, परंतु तुरुंगाच्या भिंतीची प्रत्येक क्षणी पाहणी होते, लिंपालिंपी होते, त्याप्रमाणे या देहातील कैदी जो आत्मा त्याची उपेक्षा होते. परंतु या देहाची मात्र कोण काळजी ! तो कैदी आत मरत आहे ! अरे, त्याची जरा गाठ घे.

एकान्ताची ज्याला सवय आहे, त्याची पटकन एकाग्रताही होते. एकाग्रतेची आपणांस फार आवश्यकता असते. कोणताही प्रश्न सोडविताना मन एकाग्र करता आले पाहिजे. संसार वा परमार्थ, त्या त्या वेळच्या महत्त्वाच्या गोष्टी उलगडताना जर मनाची, बुध्दीची एकाग्रता करता आली नाही, तर प्रश्न सुटत नाही. आपण गोंधळून जातो. महात्माजींच्यासारखे महापुरुष पटकन चित्त एकाग्र करून सर्व परिस्थितीचे आकलन करून घेऊ शकतात.

एकान्तात आपणांस सामर्थ्य मिळते, आशा मिळते. जणू देवाघरी जाऊन ताजेतवाने होऊन येतो. एकान्त म्हणजे एक प्रकारे मरण. मरणानंतर जसा पुन्हा नवीन जन्म, त्याप्रमाणे एकान्तातून जणू पुनर्जन्म होऊन आपण बाहेर पडतो.

आपल्या सर्वांच्या घरात देवघर असते. ती एकान्ताची जागा. तेथे जाऊन सारे काही विसरावयाचे. देवाजवळ उघडे व्हावयाचे. त्याचा हात सर्वांगावरून फिरवून घ्यावयाचा. केवढे समाधान ते असते ! केवढी शांती !

देवाजवळ क्षणभर बसून आलेला मग दानवांना भारी होतो. अपार चैतन्य त्याच्याजवळ असते. दुर्दम्य आशावाद तो घेऊन येतो. श्रध्देचे सामर्थ्य घेऊन येतो. एकान्त म्हणजे संजीवनसिंधू मिळविण्याची जागा. एकान्तात हसण्यासाठी रडणे असते. उड्डाण करण्यासाठी संकोच असतो. कर्माचा जोरदार वेग निर्माण करण्यासाठी कर्मशून्यच असते. एकान्त म्हणजे सर्व सामर्थ्यांचा साक्षात्कार !

एकान्त म्हणजे माणूसघाणेपणा नव्हे. जगाला तुच्छ लेखणे नव्हे. जगाला विटणे नव्हे. एकान्त म्हणजे स्वत:चे बरबटलेले जीवन धुऊन टाकण्याची जागा. चिखलाने अत्यंत भरलेले वस्त्र ज्याप्रमाणे एका बाजूला जाऊन आपण धुतो, त्याप्रमाणे अत्यंत मलिन झालेले जीवन एकान्तात जाऊन धुवावयाचे. समाजाची सेवा अधिक उत्कटतेने व आशेने, अधिक सामर्थ्याने व श्रध्देने करता यावी म्हणूनच एकान्त सेवावयाचा. मरण म्हणजे सर्वांत मोठा एकान्त !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel