वामनांच्या कवितांतील सुंदरता हा लहानशा पत्रात कशी दाखवू? लहान प्रल्हादाला त्याचा गुरू देवाची निंदा करायला शिकवितो. प्रल्हाद ऐकत नाही. आणि -

हे तो गुरू पापतर म्हणावे

हा तेजस्वी चरण वामनांच्या प्रतिभेतून बाहेर पडतो. आजही भारतीय मुलांना धर्मान्ध व जात्यन्ध शिकवण देणारे गुरू पाहिले म्हणजे मला हे चरण आठवतात. भीष्मप्रतिज्ञेतील ''असा येता देखे'', किंवा ''ये रथावरि झणी यदुराया'', किंवा ''मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा'' इत्यादी गोड श्लोक कितीदा गुणगुणलो, तरी तृप्ती होत नसते. मी कधा एकटा असलो म्हणजे दे ''वामना श्लोक'' म्हणताना रंगून जातो. तू म्हणशील 'अण्णाने हे 'काव्यपुराण' आज काय लावले आहे.' ज्या वेळेस जे मनात येते ते बाळ, मी तुला लिहितो. तुझे जीवन एकांगी न होवो. काव्याने जीवनात सहृदयता येते. भावनांचा परिपोष होतो. सारी सृष्टी म्हणजेच महाकाव्य आहे. आपले जीवन म्हणजेही एक काव्यच आहे. कवी तुमच्या आमच्या मनांतील भावनांना शब्दांनी प्रकट करतो. कवी मानवी हृदयाचा, मानवी मनाचा प्रतिनिधी असतो. आदर्श बदलतात, ध्येय बदलतात, परंतु त्या त्या आदर्शासाठी; ध्येयांसाठी जीवनात प्रकट झालेली जी उदात्तता असते, ती चिरसुंदरच असते. म्हणून रामायणातील, महाभारतातील अनेक प्रसंगावरील कविता आपल्याला अजूनही उचंबळवितात. आजच्या रवीन्द्रनाथांनीही कच-देवयानी, गांधारी, कर्ण यांच्यावर उदात्त कविता लिहिल्याच की नाही? ते विषय त्यांना जुने नाही वाटले.

अप्पाच्या पत्रात अरुणाच्या गंमती होत्या. पाटी घेऊन गणित करीत बसते. जणू बेरीज करण्यासाठी बोटे मोडते. तू वाचायला बसलीस म्हणजे तीही कोणते तरी पुस्तक उलटे वा सुलटे धरून भराभर वाचते. ''हिंदुस्थान स्वतंत्र झाला'' वगैरे आपल्या मनचे वाचते. मुलांची सारी गंमत. ती जी खूण करतील ती खूण वाटेल त्या आकड्यांची होते. त्या पुस्तकांतून आपल्याला हवे ते ती वाचतात. आपण मोठे होतो व ही गंमत गमावून बसतो. लहानपणच बरे का?

तुझ्या शाळेत वाचनाची व काव्यगायनाची चढाओढ होऊन काव्यगायनात मुलींचा नंबर पहिला आला म्हणून तू लिहितेस. मुलीचा आवाज जात्याच जरा गोड असतो. फुशारून नको काही जायला. परंतु वाचनात कोणाचा नंबर आला?

सर्वांस स. प्र. चि. अरुणास व आनंदास, अरुणाच्या छोट्या मित्रास स. आ.


अण्णा

साधना, २९ एप्रिल १९५०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel