''मी सर्व राष्ट्राची आहे; लोकांचे भिन्न प्रवाह जोडणारी, त्यांचा संगम करणारी आहे.'' हे ध्येय आज ज्याच्या डोळ्यांसमोर असेल, तदर्थ जो रात्रं-दिवस धडपडत असेल, तो भारताचा सत्पुत्र, तो भारतीय संस्कृतीचा खरा उपासक. बाकीचे केरकचरा फोलकट होते. एखादे वेळेस वाटते की, नवभारताची मुलेमुली हजारोंनी उठावीत व ऐक्याची उदात्त गाणी गात हिंडावीत. दहादहा-वीसवीस मुलांच्या टोळ्या कराव्या. दिवसभर त्यांनी गावसफाई करावी. इतर काही काम करावे. रात्री गाणी, संवाद कार्यक्रम करून पुढे जावे. प्रचाराचा, नवविचारांचा, उदार कल्पनांचा पाऊस पाडायला हवा. परंतु आहे कोणाला स्फूर्ती? ती एक मिशनरी ज्वाला पेटल्याशिवाय कोणतेही कार्य होणार नाही. जात्यंधांच्या संघटना विषे पेरीत आहेत. हिंसक लोकांच्या संघटना आगी लावीत आहेत. अग, माझे एक मित्र नगर जिल्ह्यात काम करतात. त्यांनी त्यांच्या तालुक्यात सहकारी पध्दतीने केवढे काम केले, जनतेचे, शेतक-यांचे केवढे कल्याण केले, काळ्या बाजारात किती आळा बसविला; परंतु त्यांचा वाडा परवा हिंसकांनी भस्म केला. माझे हे मित्र हिंसक आगलावे! गरळ ओकणारे, धर्महीन, धर्मान्ध यांच्याविरुध्द प्रत्यक्ष सेवेने नि सद्विचार प्रसाराने झगडत होते. त्यांच्या सेवेमुळे आपला प्रभाव पडत नाही, आपली टाकी टुपत नाही असे पाहून दुष्टांनी आग लावून त्यांचा वाडा भस्म केला; परंतु बंगालमध्ये, पंजाबमध्ये अशा हजारो आगी गेल्या दोन-तीन वर्षांत लागल्या. व्यक्तीच्या सुखदु:खाने ऐतिहासिक मूल्ये, ऐतिहासिक घडामोडी अजमावयाच्या नसतात. स्वत:च्या वैयक्तिक जीवनाची फूटपट्टी घेऊन महान आंदोलने मोजता कामा नये. प्राचीन काळापासून एकीकडे आसुरी वृत्तीचे लोक व दुस-या बाजूला उदार वृत्तीचे नम्र; परंतु निर्भय असे दैवी वृत्तीचे लोक यांचा लढा चालत आला आहे; तो आजही चालू आहे. यात अनेकांच्या आहुत्या पडतील, अनेकांचे संसार रसातळास जातील. जगन्नाथाच्या रथाखाली चुरडून घेतल्याशिवाय नवनिर्मिती कोठली?

परवा मी हिंदी साहित्यसम्राट प्रेमचंद यांच्या पत्नीने लिहिलेले स्मृतिरम्य चरित्र वाचीत होतो. मराठीत हे पुस्तक यायला हवे. अग, प्रेमचंद मानवधर्माचे उपासक होते. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते, म्हणून त्यांनाही धर्महीन धर्मान्ध लोक 'मुल्ला', म्हणून उपहासाने म्हणत. तुझ्या अण्णालाही धुळ्याच्या काही लोकांनी मागे मुल्ला म्हणून संबोधिले होते. निदान एका बाबतीत तरी त्या थोर साहित्यिकाशी माझे नाते जडले म्हणून मला अपार आनंद झाला.

माझा एक मारवाडी तरुण मित्र आहे. तो अमेरिकेतून शिकून आला. आता एका गिरणीत मोठा अधिकारी आहे. पाच-सातशे रुपये पगार आहे. त्याच्या बहिणीचे मला पत्र आले आहे की, त्याला आंतरजातीय लग्न करायचे आहे. एखादी सुशिक्षित वधू पाहा. मी कुठे जाणार वधू-संशोधन करीत? परंतु मला माझ्या या तरुण मित्राचे कौतुक वाटले. सा-या देशभर आंतरजातीय विवाह सुरू व्हायला हवे आहेत. राष्ट्र धांडुळून निघो. सारी सरमिसळ होवो. त्यातून चैतन्यमय नवभारत उभा राहील. लोक अजून तयार होत नाहीत. त्या त्या जातीत नवरे मिळत नाहीत, नव-या मिळत नाहीत. शेकडो लग्ने अडून राहतात. अशा वेळेस सीमोल्लंघन करणे हाच विजयाचा मार्ग असतो; परंतु आमच्या मुर्दाड जडजरठ लोकांना हे सारे अब्रह्मर्ण्य वाटते, आणि त्याच त्या संकुचित क्षेत्रात रडके संसार मांडीत बसतात.

सुधा, माझ्या मनात जे जे उसळते ते तुला लिहितो. भारतातील नवीन विचारांची दिशा तुला कळायला हवी. स्वतंत्र बुध्दीची तेजस्वी मुलगी तू हो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel