चि. प्रिय सुधास,

सप्रेम आशीर्वाद.

तुझे पत्र वेळेवर मिळाले. अरुणाचा ताप थांबला आहे असे वाचून किती बरे वाटले. यंदा दर वर्षांपेक्षा उन्हाळा अधिक आहे. जिकडे तिकडे तापसरी आहे, खोकला आहेत. देशातील जनतेचे एकंदर जीवनमानच नि:सत्त्व झाले आहे. जनतेत त्राण नाही. हिंदी जनतेला पौष्टिक आहारच मिळत नाही. जनता कोठवर टिकाव धरणार? आपल्या देशातील जनता केव्हा धष्टपुष्ट होईल, केव्हा मुलेबाळे गुबगुबीत दिसतील असे मनात येते. देशातील श्रमणारी जनता, तसेच मध्यमवर्गीय पांढरपेशे लोक यांची आज फार दुर्दशा आहे. गेल्या आठ पंधरा दिवसांत मी जेथे जेथे गेलो तेथे कोणी ना कोणी आजारी आहे. वाईट वाटे. आपण करणार तरी काय?

परंतु उन्हाळा आता लौकरच संपेल. वैशाख महिना संपून ज्येष्ठाला सुरुवात होईल. मे महिना अर्धा झाला. आणखी पाच-दहा दिवसांनी रोहिणी नक्षत्र लागेल आणि जूनच्या सात तारखेच्या सुमारास मृग लागतील. आकाश काळेभोर दिसू लागेल. मेघमाला गोळा होतील. विजा चमकू लागतील. गडगडणे ऐकू येऊ लागेल. मुले अंगणात येऊन केव्हा अंगावर चार थेंब पडतील म्हणून आकाशाकडे बघत राहतील. अंगावरची घामोळी मावळतील, उन्हाळयाने आलेला थकवा जाईल. तरतरी वाटेल, थोडे दिवस थांबा. येणार, सर्वांना नवजीवन देणारा पाऊस येणार!

सुधामाई, मी गेल्या आठवडयात बेळगावकडे गेलो होतो. मित्र भेटले. आनंद झाला. बेळगावची हवा थंड. मध्येच पाऊस पडतो. परंतु उन्हाळयात बेळगावात पाण्याचा तुटवडा. एवढे मोठे शहर, परंतु पाण्याची योजना नाही. मला ही गोष्ट माहीत नव्हती. विहिरी आटून गेल्या आहेत. रात्रभर बायका माणसे दुरून घागरी भरून आणीत असतात, मला वाईट वाटले. या म्युनिसिपालिटया करतात तरी काय? तुम्हांला इतक्या वर्षांत पाण्याची व्यवस्था नाही करता आली? येथे एक डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या विहिरीला पंप लावून पाणी खेळवले आहे. घराबाहेर गुरांसाठी हौदात पाणी भरून ठेवतात. एक टांगेवाला म्हणाला, ''डॉक्टरसाहेबांना आमचे घोड़े, गायीगुरे किती दुवा येत असतील?'' खरोखर भुकेलेल्यास अन्न व तहानलेल्यास पाणी देणे यासारखे पुण्य नाही. इतर सर्व गोष्टी राहोत; परंतु आधी पाणी तरी द्या.

आठवडयाच्या बाजाराला लोक येतात. ऊन मी म्हणत असते. परंतु त्यांना पाणी मिळण्याची सार्वजनिक सोय नसेल, तर त्या लोकांना किती त्रास होत असेल? लहानपणी मी एका गावी एक चाल पाहिली होती. गार पाण्याचे माठ त्या गावात दोनचार ठिकाणी बाहेर झाडाखाली भरून ठेवलेले असत. येणारे जाणारे पाणी पीत; दुवा देत. त्या सदिच्छेहून अधिक गोड दुसरे काय आहे?

आजकाल सहानुभूतीचे झरे का सुकले? आमची मानवता का कमी झाली? दुस-याचा विचारच मनात येईनासा झाला आहे. सुधा, मला कधी कधी फार वाईट वाटते. सरकारची ख्याती पाहिली तर ती भ्रष्ट. स्थानिक स्वराज्ये पाहिली तर ती भ्रष्ट. जनतेतील दिलदारीही लोप पावत चाललेली. या पेशाचे कसे व्हायचे? सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर ते राष्ट्र टिकणार कसे?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel