''जेवायला काय काय आहे, श्याम?'' आजीने विचारले
''भात, भाजी, भाकरी सारं आहे,'' मी म्हटले.
''कुठे आहे भात? कुठे आहे भाकरी?'' तिने विचारले
''खाऊन झालं. आता भाजी राहिली आहे,'' मी म्हटले.
''खोटं सांगतोस का रे श्याम? भाताचं भांड नाही, तवा तर तिथे उपडा घातलेला दिसतोय,'' म्हातारी म्हणाली.

''आजी, आज गवारीचीच भाकरी, गवारीचीच भात, गवारीचीच भाजी, सारं गवारीचं केलं होतं. एक ब्रम्हाचा जसा सारा पसारा, तसं एका गवारीचं सारं काही,'' मी म्हटले.

''जनाबाईच्या अभंगात आहे, 'देवचि खावा । देवचि प्यावा ॥' सारं देवचं,'' म्हातारी म्हणाली.

मित्रांनो, त्या म्हाता-या आजीने जनाबाईचा जो अभंग सांगितला, तो प्रसिध्द ओ. त्या अ अभंगातील थोर विचार कोणाला कळणार? एकदा पुणे शहरात एक मिशनरी आला होता, तो आपल्या व्याख्यानात म्हणाला, ''हिंदू धर्मात देवाबद्दल आदर नाही. देवाबद्दल भय-भीती नाही. संत देवाबद्दल वाटेल ते लिहितात, वाटेल ते बोलतात. तुमची जनाबाई म्हणते, 'मी देवाला खाईन, देवाला पिईन' देव म्हणजे का बिस्कीट, का चहाचा कप! त्या थोर परमेश्वराचा असा उपमर्द ख्रिस्ती धर्मात नाही.''

परंतु एका सहृदय व विचारवंत वक्त्याने त्या अभंगातील परम गोडी जेव्हा विशद करुन सांगितली, तेव्हा तो मिशनरी डोलू लागला. त्याने आपली चूक कबूल केली. परमेश्वरांशी तन्मय झाल्याची ती खूण आहे, हे त्याने कबूल केले. जेथे भीती आहे. तेथे भक्ती नाही. ईश्वर काही वृक-व्याघ्र नाही, तो परम दयाळू आहे. तो मानवाला काही कमी पडू देत नाही. तुम्ही कसेही वागा. त्याचा पाऊस, त्याचे वारे, त्याचे तारे, त्याचे चंद्र-सुर्य तारे तुमच्यासाठी आहे. तुम्ही एक दिवस चांगले व्हाल, ह्या खात्रीने परमेश्वर तुम्हांला सदैव प्रेम देत असतो. परमेश्वराचे प्रेम बांधणारे नाही, स्वातंन्नय देणारे आहे. परमेश्वर निष्ठुर नाही. नरकातील यमयातनांची वर्णने वाचून परमेश्वर इतका का कठोर असेल,असे वाटते.

एकदा एक शेतकरी रशियातले महर्षी टॉलस्टॉय हयांच्याकडे गेला व म्हणाला, ''महाराज, देव खरंच का असे हाल-हाल करीत असले? ''टॉलस्टॉय म्हणाले, ''तुझ्या मुलाने अगदी भयंकर गुन्हा केला समज, तर तू त्याला आगीत टाकशील का?'' तो शेतकरी म्हणाला, ''नाही नाही ! असं कसं करीन महाराज?'' टॉलस्टॉय म्हणाले, ''मग देव तुझ्यापेक्षा का कमी दयाळू आहे? आपण सारी त्याची लेकरं''

मनुष्याने इतरांना छळण्याच्या अपरंपार युक्त्या शोधल्या आहेत. त्याला वाटते, देवही असाच असेल. देव म्हणजे सर्वात मोठा छळणारा, अधिक कठोर शिक्षा देणार! भक्त देवाला भीत नाही. तो त्याच्या पायांना मिठी मारील. ख-या भक्ताला देवाशिवाय दुसरे-तिसरे रुचत नाही, सुचत नाही. न्यूटनचे खाताना गणिताकडे लक्ष असे. केरुनाना छत्रे जेवताना ताटात ग्रहांच्या आकृत्या काढीत! ध्येय म्हणजेच महात्म्यांचे सर्वस्व असते.
मी त्या म्हाता-या आजील म्हटले, '' जनाबाईचा अभंग किती गोड आहे!''

''श्याम, तुझ्याजवळ पैसे नाहीत होय?'' तिने एकाएकी विचारले.
''आजी, मी गरीब आहे. इथे सरकारी बोर्डिंग आहे. तिथे मोफत जेवण मिळतं, असं ऐकून मी इथे आलो. परंतु ह्या वर्षापासून

निराळा नियम इथे झालाय. संस्थानबाहेरच्या सर्वात मोफत जेवण बंद करण्यात आलं आहे. घरी तरी पैसे कसे मागू? घरी गरिबी आहे. वडिल तर 'नोकरी कर' म्हणतात, पण मला शिकायचं आहे. कष्ट करुन मी शिकेन,'' मी म्हटले.

''तुकाराम तुला पीठ देईल. तुला चिंता नाही ते पीठ घेत जा. नको म्हणू नकोस. ते पीठ व्यापा-यांच असतं. गोरगरिबांचं थोडंच असतं? काही पाप-अन्याय नाही,'' ती म्हणाली.

माझी भाजी संपली, मी शाळेत जायला निघालो
सायंकाळी शाळा सुटल्यावर मी घरी आलो. म्हातारबाय घरी होती.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel