चाबूक वाजला. घोडे निघाले. मित्र माघारे गेले. रात्रीची वेळ होती. पाऊस चांगलाच पडू लागला. झड सुरु झाली मेणकापडाचे पडदे सोडण्यात आले, तरी पाणी आत येतच होते, मी गारठून गेलो. देवाने सारे मंगल करावे, म्हणून मी मनात गणपती अथर्वशीर्ष म्हणू लागलो. जणू आपले मंगल कार्य त्या सर्वज्ञ ईश्वराला कळतच नाही!
आपण सारे वेडे आहोत. आमच्या प्रार्थनांनी का देव आपले विचार बदलील? प्रत्येकाची प्रार्थना जर देव मान्य करु पाहील, तर अनवस्था प्रसंगच यायचा. कुत्री म्हणतील, 'देवा, हाडांचा पाऊस पाड'. डुकरे म्हणतील, 'विष्ठेचा पाऊस पाड. हंस म्हणतील मोत्यांचा पाऊस पाड' बेडूक म्हणतील चिखलावा पाऊस पाडं' 'देवाने करावे तरी काय? शेवटी रहिमतपूर स्टेशन आले. पहाटेच्या सुमाराम गाडी होती. तसाच ओलेत्याने मी बसलो होतो.
ओले कपडे मला कधी बाधत नाहीत. पहाट झाली. आगगाडी आली. मी गाडीत बसलो. माझे आले कपडे शेजारच्या गृहस्थांच्या अंगाला लागले. ते रागावले.
'जरा दूर बसा हो. ओले कपडे नि खेटून काय बसता?'' ते म्हणाले.
''गर्दी आहे महाराज. खेटून बसण्याची माझी इच्छा नाही. तुमचे ते इस्तरीचे कपडे माझ्या अंगाला लागावेत, अशीही माझी इच्छा नाही,'' मी म्हटले.
'' तिथे दारात उभा राहा,'' ते म्हणाले
''तिथेही गर्दी आहे,'' मी म्हटले.
''जाऊ द्या हो राव. काय दटावता त्या मुलाला?'' कोणीतरी त्या पोषाखी सरदाराला म्हटले. पोषाखी सरदार काहीतरी पुटपुटले. मी खिडकीच्या बाहेर तोंड काढून बसलो.लहानपणी माझ्या डोळयात कण गेला होता, ते आठवले. माझ्या डोळयातील कण प्रेमाने काढणारा तो माधव आठवला. आगगाडीत भेटलेला तो माधुर्यमूर्ती माधव! त्या वेळेस माधव भेटला, आज हे पोषाखी सरदार भेटले. माधवची आठवण येऊन मला भरुन आले. पूर्वेकडे तांबडे फटत होते. हळूहळू सूर्य वर येत होता. माझ्या स्मृतीतून माधव वर येत हातो, माधव आठवला, अहंमद आठवला. औंधचे मित्र डोळयासमोर आले. मी माझ्या मित्रांची प्रेमस्मरण भूपाळी प्रात:काळी म्हणत होतो.
मी औंधला गेलो होतो, त्या वेळेस रात्र होती. आता सकाळ होती. मी प्रदेश पाहात होतो. जेजुरीचा खंडोबा गाडीतून दिसला. मी प्रणाम केला.
आठादिशी आदितवार । नाहिं मला आठवला ।
देव भंडारा खेळला । जेजूरीचा ॥
ही बायकांची ओवी पुण्याला मामाकडे असताना मी ऐकली होती. जेजुरीच्या जवळच मोरगाव हे गणपतीचे पवित्र स्थान. लहानपणाचा श्लोक मला आठवला.
करेच्या तिरीं क्षेत्र तें मोरगाव
तिथें नांदतो मोरया देवराय ।
तयाचें जपे नाम जो नित्य वाचे
सदा पूर्ण होतात हेतू तयाचे ॥