मी पाच रूपयांची नोट त्याला दिली. तो गृहस्थ गेला. गर्दीत घुसला. मी नळावर जाऊन पाणी प्यालो. पंढरपूरला जाऊ आणि विठ्ठल-विठ्ठल म्हणत बसू, असे मनात मी ठरवे लागलो. चंद्रभागाचे स्नान करावे, भिक्षा मागावी, विठ्ठल-विठ्ठल म्हणावे. अगदी लहानपणचे विचार पुन्हा जोराने उसळले. मी विचार करीत बसलो. मी तो मुशाफर वगैरे सारे विसरून गेलो.

इतक्यात घणघण घंटा झाली. मी भानावर आलो. तो तिकीट काढून आणणारा कोठे आहे? कधी येणार तो? अजून कसा आला नाही? मी तिकिटाच्या खिडकीजवळ गेलो. तेथील घोळक्यात तो मनुष्य दिसेना. मी इकडे तिकडे पाहू लागलो. त्याचा पत्ता नाही. का बरे देव मला असा रडवीत आहे? मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विचारात होतो. परंतु पांडुरंग एकाकडून माझी फसवणूक करवीत होता. माझी का जगात सर्वत्र फजितीच व्हायची आहे? कोठेही मला यश मिळायचे नाही. असेच का माझ्या नशिबी आहे? मी माझ्या ट्रंकेजवळ आलो. मी रडू लागलो; परंतु रडुन काय होणार? औंधच्या गाडीची वेळ होत आली. मजजवळ जेमतेम औंधला जाण्यापुरते पैसे होते. सखाराम जवळून दहा रूपये उसनं घेतले होते. कोठून देऊ आता मी पैसे? उगीच जाणे-येणे झाले.  हे पाच रूपये पांडुरंगार्पण झाले, कसे होणार माझे? मी अगदी अगतिक झालो. मी रहिमतपूरचे तिकीट काढले. सदर्न मराठा गाडीत जाऊन बसलो. निघाली गाडी. मी नेहमीप्रमाणे खिडकीतून तोंड बाहेर काढून बसलो होतो. गार वारा येत होता. गार वारा म्हणजे माझा परमानंद. तो वारा आपल्या शीतल स्पर्शाने माझ्या तप्त मस्तकाला शांत करीत होता. माझ्याजवळ पलटणीतले दोन-चार शिपाई बसले होते.

''खिडकी बंद कर,'' एक शिपाई मला म्हणाला.
''मी बंद करणार नाही,'' मी म्हटले.
''बंद कर,'' तो ओरडून म्हणाला.
''नाही करणार,'' मीही गर्जलो.
तो शिपाई रागाने उठला व खिडकी बंद केली. मी ती पुन्हा उघडली.
''अरे भाई, बंद कर. माझी प्रकृती बरी नाही,'' तो म्हणाला.

मी त्याच्याकडे बघत होतां. मी क्रोधाने थरथरत होतो. सारे जग जणू आपल्याविरूध्द कट करीत आहे, असे मला वाटले. मी पुल्हा खिडकीतून बाहेर पाहू लागलो. थोडया वेळाने काय असेल असो, मी खिडकी बंद केली.

''आता का बंद केलीस?'' त्याने विचारले.
''तुमचा हट्ट कमी झाला म्हणून,'' मी म्हटले.
''अरे, आम्ही सरकारचे शिपाई. आमची प्रकृती नीट राह्यला हवी. आम्हांला उद्या लढायचंय. शिपायांची काळजी आधी घेतली पाहिजे.'' तो म्हणाला.

''शिपायांशिवाय तुमचं कसं चालेल?'' दुसरा म्हणाला.
''तुम्ही लेखणीवाले काय उपयोगाचे? तिसरा म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel